कडाक्याच्या थंडीत गरम वाफाळलेला चहा पिण्याचा आनंद काही औरच असतो. परंतु असा चहा त्यावेळची चहाची तलफ भागवण्यासोबतच, आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असेल तर अधिक फायदेशीर ठरते. हिवाळा सुरू झाला की शरीराला उष्णता देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या मसाल्यांची गरज अधिक भासते. अशावेळी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा खडा मसाल्याचाच एक प्रकार म्हणजे जावित्री. जावित्री मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक उपयुक्त आणि गुणकारी पदार्थ आहे. जावित्री तिच्या ऊबदार आणि औषधी गुणधर्मामुळे हिवाळ्यासाठी एक उत्तम उपाय आहे(health benefits of drinking javitri tea during winter).
हिवाळ्यामध्ये बदलत्या हवामानामुळे होणारा सर्दी - खोकला, कमकुवत पचनशक्ती आणि मंदावलेली ऊर्जा यांसारख्या समस्यांवर जावित्रीचा चहा एक रामबाण उपाय ठरतो. जावित्रीचा सुगंध, उष्ण गुणधर्म आणि औषधी घटक हिवाळ्यातील अनेक तक्रारींपासून संरक्षण करतात. विशेष म्हणजे जावित्रीचा चहा हा थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासाठी, सर्दी - खोकला कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उत्तम घरगुती उपाय ठरतो. जावित्रीचा खास चहा फक्त शरीराला ऊब देत नाही, तर अनेक आरोग्यदायी फायदे देतो, ज्यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसांतही निरोगी राहू शकता. आरोग्याचा खजिना असलेल्या जावित्रीचा चहा (best tea for winter season) कसा तयार करायचा आणि थंडीच्या दिवसांत त्याचे तुमच्या शरीराला कोणते अद्भुत फायदे मिळू शकतात ते पाहूयात...
जावित्रीचा खास चहा तयार करण्याची सोपी रेसिपी...
जावित्रीचा खास चहा तयार करण्यासाठी आपल्याला कपभर पाणी, जावित्री, दालचिनीचा छोटा तुकडा, १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
जावित्रीचा चहा नेमका कसा करायचा ?
एका भांड्यामध्ये एक कप पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात जावित्रीचा एक छोटा तुकडा घाला. यासोबतच आपण यात दालचिनीचा एक छोटा तुकडा देखील घालू शकता. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर चांगले गरम करून घ्या, जेणेकरून जावित्रीचा संपूर्ण स्वाद पाण्यात मिसळून जाईल. चहा गाळून कपात ओतून घ्यावा. चवीनुसार, आपण यात मध किंवा लिंबाचा रस मिसळू शकता. जवित्रीचा गरमागरम चहा पिण्यासाठी तयार आहे.
कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक-टळेल धोका...
हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...
जावित्रीचा चहा पिण्याचे फायदे...
१. पचन सुधारते :- जावित्री गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून आराम देते. जेवणानंतर किंवा थंडीच्या दिवसांत हा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
२. रोगप्रतिकारशक्ती वाढते :- जावित्रीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात. हवामान बदलत असताना हा चहा शरीराला आतून मजबूत ठेवतो.
३. सूज कमी करते :- जावित्रीमध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे सांधेदुखी आणि शरीराची सूज कमी होण्यास मदत होते.
४. रक्ताभिसरण सुधारते :- हा चहा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो. तसेच, रक्तदाब संतुलित ठेवण्यासही मदत करतो.
५. भूक वाढवते :- ज्या लोकांना कमी भूक लागते किंवा वजन वाढवण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी हा चहा फायदेशीर मानला जातो.
६. मन शांत करते :- जावित्रीमध्ये शरीराला आराम देणारे अनेक गुणधर्म असतात. जे स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि उत्तम झोपेसाठी मदत करू शकतात.
जर तुम्हाला पचनाशी संबंधित अनेक समस्या असतील, थंडीच्या दिवसांत शरीराला ऊबदारपणा हवा असेल, अपचन, गॅस जडपणाने तुम्ही त्रस्त असाल, किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल आणि तणावापासून आराम हवा असेल, तर जावित्रीचा चहा पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही हा चहा तुमच्या डेली रुटीनचा भाग बनवून एकाच वेळी हे सर्व फायदे मिळवू शकता.
