Lokmat Sakhi >Health >Infertility > बाळासाठी टेस्ट ट्युब बेबीचाही प्रयत्न फसला तर...

बाळासाठी टेस्ट ट्युब बेबीचाही प्रयत्न फसला तर...

मुलासाठी औषधोपचार घेणाऱ्यांना, टेस्ट ट्युब बेबीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तीव्र मानसिक आणि भावनिक चढउतार पार करावे लागतात. आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 01:16 PM2021-06-01T13:16:31+5:302021-06-01T13:17:49+5:30

मुलासाठी औषधोपचार घेणाऱ्यांना, टेस्ट ट्युब बेबीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तीव्र मानसिक आणि भावनिक चढउतार पार करावे लागतात. आणि...

test tube baby- IVF -what to do if it fails? | बाळासाठी टेस्ट ट्युब बेबीचाही प्रयत्न फसला तर...

बाळासाठी टेस्ट ट्युब बेबीचाही प्रयत्न फसला तर...

डॉ. शंतनू अभ्यंकर

टेस्ट ट्युब बेबी म्हणजे काही जादू नाही. दर वेळी यश मिळेलच असे नाही. यशाचे प्रमाण २५ टक्के अगदी खूप वेळा प्रयत्न केला तर ५० टक्के. ही आकडेवारी बऱ्याच जणांना सीमेवरून परत पाठवते. हा जुगार नकोच अशीच त्यांची मानसिकता होते. पण २५ ते ५० टक्के, ‘इतके यश तुला रग्गड’ हेच खरे. एरवी धडधाकट जनतेतही मुले होण्याचे प्रमाण आपल्याला वाटते त्यापेक्षा बरेच कमी असते. बीजोत्पत्ती होण्याच्या सुमारास जोडप्याचा एकदा सबंध आला तर दिवस राहण्याची शक्यता जेमतेम ८ टक्के असते. पण एरवी काही फरक पडत नाही, कारण दरवेळी आपल्याला त्यात लाख दीड लाख रुपये घालावे लागत नाहीत! ज्यांना टेस्ट ट्युब बेबी हा पर्याय सुचवला जातो, त्यांना उपचार न घेता दिवस राहण्याची शक्यता जेमतेम १ ते २ टक्केच असते. कित्येकांना ०% एवढी असते. म्हणजे जमलं तर टेस्ट ट्युब बेबीच्या मार्गानी अन्यथा नाहीच!

ह्यापेक्षा टेस्ट ट्युब बेबी करून २५ ते ५० टक्के यशाची शक्यता म्हणजे त्यांच्या दृष्टीने लय भारी!
अर्थात ही सगळी आकडेवारी झाली. अमुक एका जोडप्याला पुढे काय रिझल्ट येईल हे यात सांगता येत नाही. त्या त्या जोडप्यासाठी मूल झालं तर ते १०० टक्के यश असतं आणि नाही झालं तर ते १०० टक्के अपयश. तेंव्हा यशापयशाची आणि त्यातील आपल्याला लागू असलेल्या विशेष, भल्याबुऱ्या शक्यतांची, घटकांची, पर्यायांची, सविस्तर चर्चा करणे उत्तम. उगाच फार कल्पनेच्या भराऱ्या मारू नयेत. डोकं खांद्यावर आणि पाय जमिनीवर ठेवून विचार करावा. कुणी यशाची १०० टक्के खात्री देत असेल, तर त्याचे/तिचे औषध मुळीच घेऊ नयेप; कारण अशी हमी देणारा/री बनेल आहे हे स्पष्टच आहे.

अपयशाची चिंता आधीच केलेली बरी. असं झालंच तर मुळात टेस्ट ट्युब बेबीचा आग्रह धरणाऱ्या जोडीदाराला किंवा डॉक्टरला दोष देण्यात काही अर्थ नाही. निराशा, वैताग, स्वतःला बोल लावणे वगैरे भावनांशी दोन हात करून पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकणं, प्रसंगी अपत्यहीन राहावं लागेल, याचाही मनोमन विचार असणं गरजेचं आहे.
या प्रश्नांची उत्तर देणारा कोणताही फॉर्म्युला नाही. उपलब्ध पैसा, जोडीदाराचं पाठबळ आणि तुमचा मूल्यविवेक यावर उत्तर ठरणार. मुलासाठी औषधोपचार घेणाऱ्यांना तीव्र मानसिक आणि भावनिक चढउतार पार करावे लागतात. कधी कधी नात्यातला ओलावा संपतो. समागमही निव्वळ एक कर्मकांड म्हणून उरतो; त्यात ना उत्साह उरतो ना उत्स्फूर्तता. योगापासून संभोगापर्यंत सारं काही, अपत्यप्राप्ती या एकाच आसाभोवती भोवरत राहतं. अमुक दिवशी गोळ्या घ्या, तमुक दिवशी ‘जवळ या’, असल्या गद्य, न्यायालयीन फर्मानांनी दुसरं काय होणार? टेस्ट ट्युब बेबीची ट्रीटमेंट आणि त्यातील अपयश म्हणजे तर या साऱ्या तणावांची परिसीमा.

या साऱ्यातून बाहेर पडायचं तर थोडा शांतपणे विचार करायला शिकायला हवं. आपण शक्य ते उत्तम उपचार घेतले आहेत, प्रामाणिकपणे सर्व पथ्यपाणी पाळले आहे, हे जर तटस्थपणे विचार करता मान्य असेल, तर भविष्याचा विचार करायची उमेद वाढते. तुमच्या कल्पनेतला आदर्श भविष्यकाळ उजळणार नसेल कदाचित, पण जो काही असेल तो काही काळाकुट्टच असेल असंही नाही.
काही अनवट सुखं, त्यातही लपलेली असतीलच की.

स्वप्नातलं मूल सत्यात उतरलं नाही याचं दु:ख असतंच, अगदी प्रत्यक्षातलं मूल गेल्यावर असतं तितकंच तीव्र असतं. या दु:खालाही न्याय द्यायला हवा. खुलेआम शोक करायला हवा. मग कसं हलकं हलकं वाटतं. माझ्या एका पेशंटनी अंगणात एक झाड लावलं, एकीनी या न झालेल्या बाळाच्या स्मृत्यर्थ छान पेंटिंग केलं. या साऱ्याची मदत झाली त्यांना.
...आणि एकदा, ‘हा मार्ग बंद!’ असं मनोमन ठरल्यावर, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आपल्या जोडीदाराशी सूर जुळवून ठेवणं. तसंही आयुष्यातल्या एका अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून तुम्ही पार झाला आहात. यामुळेच रेशीमबंध कदाचित अधिक गहिरे झाले असतील, किंवा कदाचित नात्यांनी दुसरं टोकही गाठलं असेल, अगदी विशविशीत झालं असेल सारं. तेंव्हा या आघाडीवर लागेल ती डागडुजी करायला हवी. जेंव्हा आता पुरे असं ठरतं, तेंव्हा अचानक स्वतःसाठी खूप वेळ मिळायला लागतो. दारू सोडलेल्या दारुड्यासारखं, ‘वेळेचं करायचं काय?’ असा प्रश्न पडू शकतो. एका अग्निदिव्यातून तुम्ही तावून-सुलाखून निघालेले असता. स्वतःला अधिक ओळखू लागलेले असता. पुढे काय, या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला गवसतं.

 

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: test tube baby- IVF -what to do if it fails?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.