Lokmat Sakhi >Health >Adolescence > वयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या 5 गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच...कारण..

वयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या 5 गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच...कारण..

वयात येणार्‍या मुलींना आई बाबांनी काही गोष्टींची जाणीव करुन देणं , काही गोष्टी समजावून देणं, काही बाबतीत त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागा करणं आवश्यक आहे. हे घडलं तर मुली खूप समजूतदारपणे वयात येण्याचा टप्पा पार पाडतात आणि तारुण्याला आत्मविश्वासानं सामोर्‍या जातात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:56 PM2021-06-22T16:56:24+5:302021-06-22T18:47:47+5:30

वयात येणार्‍या मुलींना आई बाबांनी काही गोष्टींची जाणीव करुन देणं , काही गोष्टी समजावून देणं, काही बाबतीत त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागा करणं आवश्यक आहे. हे घडलं तर मुली खूप समजूतदारपणे वयात येण्याचा टप्पा पार पाडतात आणि तारुण्याला आत्मविश्वासानं सामोर्‍या जातात.

Mother's need to tell these 5 things to young girls to face them with confidence! | वयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या 5 गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच...कारण..

वयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या 5 गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच...कारण..

Highlightsमुलगी आहे म्हणून मुलांपेक्षा तू कशातच कमी नाही हा विश्वास तिला द्यायला हवा. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याबद्दल बोलायला हवं ही जाणीव मुलींमधे निर्माण करायला हवी. जी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, मान्य नाही तिला ठामपणे नकार देणं हा तुझा हक्क आहे हे मुलींना या वयातच कळायला हवं.

मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं म्हणजे केवळ त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं, त्यांच्या अभ्यास आणि खेळाकडे लक्ष देणं नसतं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पालक म्हणून आई बाबा मुलांना मानसिक आधार आणि विश्वासही देत असतात. त्यांच्या मनाची घडण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलांचं लहानपण जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं असतं त्यांचं वयात येणं. हा टप्पा पालकांना अतिशय हळुवार हाताळावा लागतो. स्वित्झर्लण्डमधील संशोधकांनी केलेला एक अभ्यास सांग्तो की वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मुलांना मुला-मुलींमधलं अंतर समजायला लागतं. आणि वयात येण्याच्या टप्प्यात तर त्यांच्या मनावर ज्या बाबी ठसतात त्या त्यांची मानसिक घडण करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच वयात येणार्‍या मुलींना आई बाबांनी काही गोष्टींची जाणीव करुन देणं , काही गोष्टी समजावून देणं, काही बाबतीत त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागा करणं आवश्यक आहे. हे घडलं तर मुली खूप समजूतदारपणे वयात येण्याचा टप्पा पार पाडतात आणि तारुण्याला आत्मविश्वासानं सामोर्‍या जातात.

वयात येणार्‍या मुलींना  सांगायला हवं!


1 मुलगा आणि मुलगी यात फरक नसतो

मुला मुलींमधला फरक अनेकजणींन घरातूनच कळायला लागतो. आपण मुलगी आहोत ही कमीपणाची भावना अनेकींना घरातूनच मिळते. पुढे समाजात वावरताना मुलगी आणि स्त्री म्हणून ती दुय्यम भूमिका घेऊ लागते. हे होऊ नये म्हणून वयात येण्याच्य आधीपासून मुलांमधे आणि मुलींमधे काहीच फरक नसतो हे तिच्या मनावर ठसवायला हवं. मुलगी आहे म्हणून मुलांपेक्षा तू कशातच कमी नाही हा विश्वास तिला द्यायला हवा. हा विश्वास जेव्हा मुलींना पालकांकडूनच मिळतो तेव्हा त्या आत्मविश्वासानं घराच्या बाहेर वावरतात. आणि संधीचा विचार करताना आपण मुलगी आहोत असा विचार कधीही त्यांच्या डोक्यात येत नाही.

2 जे मनात येईल ते बोल

एखादी गोष्ट पटली नाही तर त्याबद्दल बोलायला हवं ही जाणीव मुलींमधे निर्माण करायला हवी. त्याची सुरुवात घरातूनच करायला हवी. मुलगी काही बोलत असेल तर तिला तिचं म्हणणं मांडू देणं, तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणं, तिच्या बोलण्याला प्रतिसाद देणं, एखाद्या गोष्टीवर तिला स्वत:हून तिचं मत विचारणं या गोष्टी झाल्या तर कोणत्याही बाबतीत गप्प बसायचं नाही, बोलायचं , व्यक्त व्हायचं ही गोष्ट मुलींच्या मनावर ठसते.

3 जे पटत नाही त्याला नकार दे

 जी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, मान्य नाही तिला ठामपणे नकार देणं हा तुझा हक्क आहे हे मुलींना या वयातच कळायला हवं. नाही म्हणण्यात आपली स्वत:ची ¸मर्जी असते, आपला स्वत:चा विचार असतो याची जाणीव त्यांना होते. या नकाराच्या अधिकारातूनच आपल्याला निर्णय स्वातंत्र्य असल्याची जाणीव त्यांना होते. त्या आपला होकार नकार वापरायला शिकतात. त्यांची निर्णय क्षमता विकसित व्हायला सुरुवात होते.

 4 वयात येतांना हे असं होतं

वयात येताना शरीरात आणि मनात होणार्‍या बदलांमुळे मुली गोंधळतात, लाजतात, बिचकतात. शरीरातील बदलांमुळे, वयात येण्याचा चेहेर्‍यावर होणार्‍या परिणामांमुळे कधी कधी त्यांच्यात न्यूनगंडही निर्माण होतो आणि तो कायम त्यांच्या मनात घर करुन बसण्याची शक्यता असते. तेव्हा वयात येण्याच्या टप्प्यातील बदलांबद्दल मुलींशी मोकळेपणानं बोलायला हवं, या टप्प्यात शरीर आणि मनात होणारे बदल स्वाभाविक आहेत याची जाणीव त्यांना द्यायला हवी. वयात येताना आपल्या हार्मोन्समधे होणारे बदल, मासिक पाळी, मासिक पाळीत शरीराची स्वच्छता या प्रत्येक गोष्टीतले बारकावे मुलींना विश्वासात घेऊन सांगायला हवेत.

5 स्वत:चं रक्षण करता यायला हवं

वयात येणार्‍या मुलींची मानसिक ताकद वाढवण्यासाठी स्वत:ची सुरक्षा स्वत: करण्याची जाणीव त्यांच्यात निर्माण करायला हवी. प्रलोभन, मोह, स्पर्शातला फरक याबाबतीत त्यांच्याशी सविस्तर बोलायला हवं. या जाणीवेमुळे मुली भावनिक दृष्ट्या कणखर होतात. बाहेर अवघड प्रसंगी न घाबरता सामोरं जाण्याचं मोठं धैर्य या जाणीवेतून त्यांच्यात निर्माण होतं. 

Web Title: Mother's need to tell these 5 things to young girls to face them with confidence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.