Have you ever experienced the solitination of the process of rejuvenation? | नवनिर्मितीच्या प्रक्रियेतला सुखावणारा एकांत कधी अनुभवला का?
नवनिर्मितीच्या प्रक्रियेतला सुखावणारा एकांत कधी अनुभवला का?

-अनिता पगारे

मला स्वत:ला फिरायला खूपच आवडतं. मी कुठल्याही कारणानं फिरायला निघू शकते आणि कुठेही निघू शकते. त्या नियमाप्रमाणे मी आमच्या आदिवासी भागात खूपच फिरले. 

इथलं जगणं रोजच मला काहीतरी शिकवत आहे आणि मीही मोठय़ा आनंदानं ते स्वीकारते आहे. कुठलाही आदिवासी समूह पहिल्यांदा तुम्हाला स्वीकारत नाही. नकळत तुमची परीक्षा घेतो. त्यात तुम्ही खरे उतरलात तर मात्र तुमच्यासाठी ही माणसं काहीही करायला तयार होतात. सध्या मी याचे गमतीशीर अनुभव घेते आहे.
आता आमच्याकडे जमीन हिरवीगार दिसायला सुरुवात झाली आहे. अजून पावसाळ्याचा पाऊस सुरू व्हायचाच आहे. खरं तर पहिल्या तुरळक पावसानंही आमच्याकडे छान तरोटा आला आहे. आमच्याकडच्या पावसाची सुरुवात थोडी नाजूक असते; पण एकदा का पाऊस स्थिरावला की चांगलाच जोम धरून यायला लागतो. मग आमच्या अंगात फक्त शेतीचं काम शिरतं. भाताची शेती, त्यानंतर नागलीची शेती एवढा एकच विषय डोक्यात असतो. दुसरं काही सुचतच नाही किंवा निसर्ग तसं सुचूही देत नाही. इथला प्रत्येक माणूस या काळात कामात अखंड बुडालेला असतो.

आमच्या गावांमध्ये एक प्रथा आहे. शास्त्राच्या अंगानं विचार कराल तर ती अंधश्रद्धाच वाटेल; पण ही अंधश्रद्धा इकडची माणसं अगदी मनोभावे जोपासतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावातले काही जोडपे पाच मंगळवार उपवास करतात. पाऊस सुरू झाला की सर्व गाव एकत्र  येतं आणि हा उपवास सोडवला जातो.

उपवास सोडवायच्या दिवशी आख्खा गाव हजर असतो. प्रत्येक वर्षी कोणी उपवास करायचा हे गाव ठरवतं. त्यामुळे यावर्षी माझ्या एका सहकारी मैत्रिणीचा यात नंबर लागला. या उपवासानं काय फायदा होणार आहे, खरंच पाऊस येणार आहे का? असे उपवास केले नाही तर पाऊस येणार नाही का? असे अनेक प्रश्न आम्ही तिला दर मंगळवारी विचारायचो.  एरवी तिला भूक सहन होत नाही; पण गावाच्या भल्यासाठी तिची भूक बरोबर मंगळवारी शहाणी व्हायची.
बाहेर कितीही पाऊस असला तरी घर कोरडं असलं पाहिजे आणि बाहेरून गच्च भिजून आल्यानंतर शेकण्यासाठी लाकूडफाटा हवाच, यासर्वांची तयारी आता जवळ जवळ झाली आहे.
आता शाळाही सुरू झाल्या आहेत. ज्या शाळांमध्ये पाण्याची चांगली व्यवस्था नाही, सुटीत पाणी भरायला कोणी नव्हतं, म्हणून टाक्या खालीच राहिल्या. त्या शाळांनी लेकरांना ‘लगेच पहिल्याच सोमवारी शाळेत येऊ नका’, असा निरोप पाठवला.

आता एकदा का चांगला पाऊस झाला, सर्व कचरा धुऊन गेला की गावाच्या नद्या येतील आणि आम्ही गावातच बंद होऊन जाऊ. इकडे पाऊस बक्कळ पण त्याला धरून ठेवायला तेवढी माती आमच्याकडे नाही. आमचा सगळा डोंगर हा बेसॉल्ट या प्रकारचा आहे, जो पाणी फार झिरपू देत नाही. जेवढं पाणी पडतं तेवढं सगळं पाणी खळाळत वाहात पुढे पाठवणारा हा दगड आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडणार्‍या भागांच्या यादीत आमचं नाव वरती आहे; पण दुष्काळाच्या यादीत, टँकरनं पाणीपुरवठा करण्याच्या यादीतही आमच्या गावाचं नाव वरच असतं ते या दगडामुळे. आमचे सर्व पाणी पुढे गुजरातमध्ये जातं आणि गुजरातची जमीन हिरवीगार होते.

खास पावसाळ्यात येणा-या भाज्या यायला सुरुवात झाली आहे. काल मी माझ्या एका सहकार्‍याच्या घरी सकाळी जरा लवकर गेले होते. सहकारी मस्त  ‘मॉर्निंग वॉक’ला गेला होता म्हणून मी तिथेच वाट पाहात मुकणे राजाच्या महालाकडे पाहत बसले होते. त्यांच्या घरातून अगदी सहज तो महाल दिसतो. माझा तो सहकारी जेव्हा फिरून आला तेव्हा त्याच्या हातात काहीतरी वेली, पाला होताच.
या माझ्या सहका-याला अशा जडीबुटीची ब-यापैकी समज आहे. त्याने मस्त शेवळ, कार्टुलाचा वेल आणि असा बराच पाला आणला होता. थोड्या वेळानं गावात आले आणि भाजी आणायला गेले तर तिथेही हा सर्व पाला, वेली विकायला होत्या.

नुसती शेवळ भाजी करून खाल्ली तर घशाला खाज येण्याची शक्यता असते म्हणून त्यात जंगलात येणारी पानं टाकतात. ही पानंही त्या नुसत्या पेपरवर अंथरूण दुकान लावलेल्या ठिकाणी मिळत होती.

आमच्या या आदिवासी भागात आजूबाजूला किंवा निसर्गात जरा काही बदल झाला, कशाची नव्यानं सुरुवात झाली की लगेच समजतं. पावसाळ्याच्या तोंडावर इथला प्रत्येकजण आता नवनिर्मितीसाठी कष्टाच्या कोशात जायला आसूसला आहे. मलाही या भागातला नवनिर्मितीसाठीचा एकांत अनुभवायचा आहे. त्यामुळे ही भेट आटोपती घेते.

नवनिर्मितीचा हा एकांत खरं तर आपण सगळ्यांनीच अनुभवायला हवा. या नवनिर्मितीनंतरची वाडीवस्ती समजून घ्यायला ताज्या दमानं परत भेटू !

(लेखिका जव्हारस्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

pagare.anita@gmail.com


Web Title: Have you ever experienced the solitination of the process of rejuvenation?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.