Fruit bowl | फळभाज्या कुंडीत
फळभाज्या कुंडीत
मंदार वैद्य
 
फळभाज्या लावणं म्हणजे अतिशय नाजूक काम. पण अस्सल गावराण चवीच्या फळभाज्या खायच्या तर इतके कष्ट तर घ्यावेच लागतील!
---------------
आमचे आजोबा गावाहून शहरातल्या आमच्या घरी यायचे, पण पुन्हा गावी परत जाण्याची त्यांना खूप घाई असायची. ते म्हणायचे, इथल्या पाण्याला आणि भाजीला काही चवच नसते. मला त्यावेळी त्यांचं हसू यायचं. मला वाटायचं, पाणी आणि भाज्या  सगळीकडे सारख्याच, त्यात चवीचं ते काय? पण मी जसजसा मोठा होत गेलो तसतसं मला समजत गेलं की, गावाकडच्या भाज्यांना खरंच एक चव होती. फक्त मीठ आणि मसाल्यात शिजवलेल्या त्या भाज्या पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटत. आता लक्षात येतंय की,  तो गुण त्या भाज्यांच्या वाणाचा आणि मातीचा होता. पूर्वी मिळणारा गोलमटोल टमाटा, हिरवी काटेरी वांगी, थोडीशी पोपटी पिवळसर भेंडी पुन्हा मिळाली तर; जेवणाची रंगतच वाढेल! हे सगळं शक्य आहे, आपल्या हिरव्या कोप:यात! पुण्यात राहणा:या अनघानं एकच गावठी वांग्याचं रोप लावलं. एकावेळी तिच्या त्रिकोणी कुटुंबाला पुरतील एवढी तीनच वांगी मिळायची. पण त्या वांग्याची भाजी एवढी चविष्ट व्हायची की, एकेक वांगं खाऊन कुणाचं मन भरत नसे!  
आपल्या हिरव्या कोप:यात अशी फळभाज्यांची शहरी शेती करणं सहज शक्य आहे. पण त्यासाठी अनुभवातून थोडंसं शिकावं लागतं. ती तयारी असली की मग काहीच अशक्य नाही. 
फळभाज्यांच्या वनस्पती थोडय़ा जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे कुंडीतील पोषणद्रव्यांचा ताळमेळ थोडा जरी बिघडला किंवा वातावरणात सूक्ष्म जरी बदल झाला तरी फळभाज्यांच्या वनस्पतींवर त्याचा लगेच परिणाम होतो. त्यात मिरची, वांगी, टमाटा या प्रत्येक वनस्पतीचा स्वभाव वेगवेगळा. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी निगा राखावी लागते. 
त्यामुळे सुरुवात मिरची, वांगी यापासून करावी. सरावातून शिकून घेतलं की मग टमाटे, ढोबळी मिरची यासारख्या नाजूक पिकांकडे वळावं. साधारणत: 12 ते 14 इंची कुंडय़ांमधे सर्व फळभाज्या उत्तम येतात. आपल्या शहरापासून थोडंसंच लांब गेलं तर फळभाज्यांच्या रोपांसाठी पॉली हाउसमध्ये केलेल्या नर्सरी सहज दिसतात. तिथून चांगल्या वाणाची रोपं आणून कुंडीत लावणं सर्वात सोपं. पण आपल्याला जर गावराणच वाण लावायचं असेल तर मात्र त्यांची लागवड स्वत:च करावी लागते. प्रत्येक शहरात पारंपरिक बियाणांचं एखादं तरी दुकान असतंच. तिथून आपल्याला हवं असलेलं गावराण भाज्यांचं बियाणं मिळवता येतं.  
 कुंडी भरताना त्यात जैविक काडीकचरा, संजीवक माती यांसह किमान 25 टक्के गांडूळ खत व नीम पेंडचं मिश्रण जरूर वापरावं. रोप लावताना चमचाभर राखही मातीत मिसळावी. आपलं रोप बाल्यावस्थेत असताना दर आठवडय़ास एक या गतीनं फुटवा येत राहिल्यास आपल्या कुंडीतील माती उत्तम आहे असं समजावं. आणि तसं होत नसल्यास नीम पेंडीचं प्रमाण थोडंसं वाढवावं. 
आपल्या वनस्पतीवर किडींचा हल्ला तर होत नाही ना? याचं सातत्यानं निरीक्षण करावं. वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढवत राहण्यासाठी गोमूत्र, नीमअर्क याची आठवडय़ातून किमान दोनदा फवारणी करावी. आपल्या वनस्पतींवर काळा-पांढरा मावा किंवा मिली बग दिसल्यास रोगट पानं छाटून घरापासून दूर नेऊन टाकावीत किंवा ब्रशनं कीड झटकून टाकावी. बाजारात कृषी सेवा केंद्रांमध्ये तयार दशपर्णी अर्कमिळतो, त्याची फवारणी केल्यास सर्व रोग नियंत्रणात येण्यास मदत होते. दोन कुंडय़ांमधे किमान सहा इंचाचं अंतर राखल्यास कुंडय़ांची निगा तर नीट राखता येतेच, पण किडीचा प्रादुर्भावही टाळता येतो.   
वनस्पती तारु ण्यावस्थेत असताना फुलं येण्यास सुरु वात होते. या अवस्थेत सेंद्रिय खताची 80 ते 100 ग्रॅम मात्र प्रत्येक कुंडीस महिन्यातून एकदा देणं गरजेचं आहे. त्या बरोबर अर्धा चमचा राखही घालाच. अशी सेंद्रिय खताची मात्र देताना तेच तेच खत वापरू नये. कधी शेणकाला, कधी गांडूळ खत आणि नीम पेंडीचं मिश्रण, तर कधी कोंबडी खत अशी खतांची अदलाबदल करावी. 
कोणतंही फळ झाडावरच पिकू देण्याची वाट पाहू नये, त्याची वेळेत तोडणी करावी. जसं माणसांचं असतं तसंच वनस्पतींचंही असतं. जीवनचक्र संपताना वनस्पतीही  निस्तेज दिसू लागतात. असं झाल्यास मग पुढील लागवडीची तयारी करावी. 
 
mandarcv@gmail.com
(पुढील लेखात हिरव्या कोप:यात फुलवायच्या वेलवर्गीय भाज्या.)
---------------------------------------
‘हिरवा कोपरा’ वाचून, आपणही काहीतरी करावं असं तुम्हाला वाटलं असेल, घरातल्या हिरव्या कोप:यात काम करताना काही प्रश्न पडत असतील, तर जरूर पाठवा.  ईमेल करा किंवा सखीच्या पत्त्यावर लिहून पाठवा.
 
पत्ता- संयोजक सखी, लोकमत भवन, 
एमआयडीसी एरिया, अंबड, नाशिक-422010
 
 
 

 


Web Title: Fruit bowl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.