हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गाजराचा हलवा, लोणचं, भाजी नेहमीच आपण करतो. पण या हिवाळ्यात तुम्ही गाजर कोफ्ता करी नक्कीच ट्राय करून बघा. हा पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तुमच्या जेवणाला खास बनवेल आणि हिवाळा(Winter Special Recipe) संपेपर्यंत तुम्ही आणखी चार-पाच वेळा तरी हा बेत कराल याची खात्री आहे. पाहूया गाजर कोफ्ता करीची रेसिपी.
कोफ्ते करण्यासाठी साहित्य :
किसलेले गाजर १ कप
किसलेले पनीर (ऐच्छिक) १/४ कप
बेसन (Binding साठी) २ ते ३ मोठे चमचे
आले-लसूण पेस्ट १/२ छोटा चमचा
बारीक चिरलेली हिरवी मिरची १ छोटा चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा
जिरे पावडर १/२ छोटा चमचा
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेलआवश्यकतेनुसार
ग्रेव्ही करण्यासाठी साहित्य :
टोमॅटो प्युरी १ कप
कांदा पेस्ट १/२ कप
आले-लसूण पेस्ट १ मोठा चमचा
काजू पेस्ट (किंवा मगज बी पेस्ट) २ मोठे चमचे
हळद, लाल तिखट प्रत्येकी १/२ छोटा चमचा
धने पावडर, जिरे पावडर प्रत्येकी १ छोटा चमचा
गरम मसाला १/२ छोटा चमचा मीठ आणि साखर चवीनुसार
तेलआवश्यकतेनुसार
गाजर कोफ्ता बनवण्याची कृती
एका मोठ्या भांड्यात किसलेले गाजर, पनीर (असल्यास), आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ एकत्र करा.
हे मिश्रण चांगले मिसळा. त्यात बेसन घालून मिश्रण एकत्र करा. (बेसन फक्त बाइंडिंगसाठी वापरा, मिश्रण घट्ट नसावे. जास्त बेसन वापरल्यास कोफ्ते कडक होतात.)
या मिश्रणाचे हाताने छोटे-छोटे गोळे (कोफ्ते) तयार करा.
मध्यम आचेवर कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर, कोफ्ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
तळलेले कोफ्ते टिश्यू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.
ग्रेव्ही करण्यासाठी -
कढईत २ मोठे चमचे तेल गरम करा. त्यात कांदा पेस्ट घालून सोनेरी होईपर्यंत परता.
त्यात आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परता.
आता टोमॅटो प्युरी घाला. तेल सुटेपर्यंत चांगले शिजू द्या.
हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि मीठ घालून मसाले व्यवस्थित परतून घ्या.
मसाले परतल्यावर त्यात काजू पेस्ट घाला. ग्रेव्हीला उकळी येण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घाला.
ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यावर गरम मसाला आणि थोडी साखर (ऐच्छिक) घालून मिक्स करा.
गरमागरम ग्रेव्ही एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा.
कोफ्ते ग्रेव्हीत लगेच घालू नका, अन्यथा ते मऊ पडून तुटू शकतात.
वाढण्यापूर्वी, कोफ्ते ग्रेव्हीत घाला आणि लगेच कोथिंबीर आणि ताज्या मलईने (Cream) सजवून गरम नान, चपाती किंवा जीरा राईस सोबत सर्व्ह करा.
महत्त्वाच्या टिप्स:
कोफ्ते तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर असावे. जर तेल कमी गरम असेल, तर कोफ्ते तेल शोषून घेतील आणि जास्त गरम असल्यास बाहेरून लगेच जळतील.
तसेच कोफ्त्याच्या मिश्रणात बेसन कमी प्रमाणात ठेवा. जास्त बेसन वापरल्यास कोफ्ते कडक होतात.
