उरलेली पोळी कशी संपवावी यासाठी अनेक पदार्थ आहेत. त्यामध्ये काही रेसिपी तिखट आहेत तर काही गोड आहेत. पण कधी उरलेल्या चपातीची मिठाई खाल्ली आहे का ? एकदा हा पदार्थ नक्की करुन पाहा. अगदी सोपी रेसिपी आहे. (Sweets made from stale chapati, here's a simple recipe for sweets that will melt in your mouth)खाणाऱ्याला शिळ्या पोळ्या खातोय असे वाटणारही नाही. फार सोपी रेसिपी आहे. मऊ आणि खमंग असते. करताना फक्त काही जळणार नाही आणि जास्त शिजवले जाणार नाही याची काळजी घ्या. पाहा पोळीची मिठाई कशी करायची.
साहित्य
पोळी, बदाम, खजूर, तेल, साखर, दूध
कृती
१. कढईत तेल घ्यायचे. त्यात दोन पोळ्या तळून घ्यायच्या. रंग बदलेल आणि कुरकुरीत होतील अशा तळायच्या. त्यात थोडे बदामही तळायचे. तसेच थोडे खजूरही तळायचे. सगळे पदार्थ छान खमंग तळून झाल्यावर काढून घ्यायचे. गार करायचे आणि गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून त्याचा चूरा तयार करायचा.
२. एका पॅनमध्ये साखर घ्यायची. मंद आचेवर साखर गरम करायला सुरवात करायची. साखरेचे कॅरेमल तयार करायचे. ते घट्ट झाले आणि साखर पूर्ण विरघळून त्याची पेस्ट झाली की त्यात दूध घालायचे. दुधात कॅरेमल लगेच मिक्स होत नाही. ते घट्ट होते, मात्र पाच मिनिटे ढवळल्यावर छान मिक्स होते. साखर आणि दूध एकजीव झाल्यावर त्यात तयार केलेला चूरा घालायचा. ढवळत राहायचे आणि मिश्रण जरा घट्ट होऊ द्यायचे.
३. बदामचे लांब काप करायचे. तयार झालेले मिश्रण एका भांड्यात लावायचे. त्यावर बदामाचे काप लावायचे आणि गार झाले की छान सेट होऊ द्यायचे. गार झाल्यावर त्याचे तुकडे करायचे.
