हातगाडीवर मंच्यूरियन खाताना जी तिखट-आकर्षक लाल चटणी मिळते, तिचा स्वतःचा वेगळाच जादुई स्वाद असतो. मंच्यूरियनचा पहिला घास घेताच ती चटणी मनाला आनंद देते. ना फार घट्ट, ना अगदी पातळ पण तिची तिखट, लालसर, चमचमीत चव संपूर्ण पदार्थाला उठाव देते. अनेकांना ही चटणी म्हणजे शेजवान चटणीत पाणी घातलेली वाटते. मात्र तसे नसून तिची रेसिपी फार वेगळी आहे आणि गंमत म्हणजे ही चटणी घरीदेखील अगदी तशीच तयार करता येते.
घरच्या घरी तयार करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तिचा तिखटपणा, गोडवा आणि आंबटपणा आपल्या आवडीनुसार करु शकतो. तरीही तिची बेसिक चव तशीच लागते. गरमागरम मंच्यूरियन खाताना विकतची चटणी अजिबात आठवणार नाही पाहा कशी करायची.
साहित्य
हिरवी मिरची, लसूण, आलं, रेड कलर, कॉर्नफ्लावर, पाणी, तेल, मीठ, रेड चिली सॉस
कृती
१. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचे तुकडे करायचे. सात ते आठ मिरची घेतल्या तर लसणाच्या पंधरा पाकळ्या घ्या. आल्याचा वापर आवडीनुसार करा. चव जास्त उग्र लागणार नाही याची काळजी घ्यायची.
२. एका पॅनमध्ये चमचाभर तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात तयार केलेली पेस्ट घालायची आणि खमंग परतून घ्यायची. परतून झाल्यावर त्यात थोडे पाणी घालायचे आणि मीठ घालायचे. ढवळून घ्यायचे आणि उकळी येऊ द्यायची. त्यात अगदी थोडा खाण्याचा लाल रंग घालायचा. एका वाटीत चमचाभर कॉर्नफ्लावर घ्या. त्यात पाणी घालून पेस्ट तयार करायची. ती पेस्टही मिश्रणात ओतायची आणि ढवळायचे.
३. चटणी जरा घट्ट व्हायला लागली की त्यात थोडा रेड चिली सॉस घालायचा. छान मिक्स करायचा आणि चटणी उकळवायची. गार झाली की जरा घट्ट होईल. कॉर्नफ्लावर जास्त वापरु नका. म्हणजे चटणीला घट्टपणा जेवढा हवा तेवढाच येईल.
