Lokmat Sakhi >Food > टोमॅटो महाग झाले, पावभाजीचा बेत रद्द करताय? ही घ्या बिन टोमॅटोची चविष्ट पावभाजी

टोमॅटो महाग झाले, पावभाजीचा बेत रद्द करताय? ही घ्या बिन टोमॅटोची चविष्ट पावभाजी

Pavbhaji Recipe: टोमॅटोशिवायही करता येते बरं का झकास आणि चटपटीत पावभाजी (yummy and tasty)... त्यामुळे टोमॅटो महागले म्हणून पावभाजीचा बेत अजिबातच रद्द करू नका. उलट या नव्या पद्धतीने, टोमॅटोशिवाय पावभाजी करून पहा ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 05:21 PM2021-11-24T17:21:04+5:302021-11-24T17:22:06+5:30

Pavbhaji Recipe: टोमॅटोशिवायही करता येते बरं का झकास आणि चटपटीत पावभाजी (yummy and tasty)... त्यामुळे टोमॅटो महागले म्हणून पावभाजीचा बेत अजिबातच रद्द करू नका. उलट या नव्या पद्धतीने, टोमॅटोशिवाय पावभाजी करून पहा ..

Food- Recipe: How to make Spicy delicious Pavbhaji without tomato | टोमॅटो महाग झाले, पावभाजीचा बेत रद्द करताय? ही घ्या बिन टोमॅटोची चविष्ट पावभाजी

टोमॅटो महाग झाले, पावभाजीचा बेत रद्द करताय? ही घ्या बिन टोमॅटोची चविष्ट पावभाजी

Highlightsटोमॅटो न वापरता, त्याच्या ऐवजी दुसरा एक सिक्रेट पदार्थ वापरला तरी पावभाजी तेवढीच छान आणि चवदार करता येते. 

पावभाजी हा बहुसंख्य लोकांचा आवडीचा पदार्थ. सगळ्यात जास्त चालणारं भारतातलं स्ट्रीट फूड (street food) म्हणजे पावभाजी. बाहेर गाड्यावर जाऊन पावभाजी खाण्याचा आनंद म्हणजे आहाहा... निव्वळ स्वर्गीय सुख.. पण असं नेहमीच गाड्यावरची पावभाजी खाणं बरं नाही. त्यामुळे मग महिन्यातून एक- दोनदा तरी हमखास घरी पावभाजी करण्याचा बेत आखण्यात येतोच. शिवाय घरी केलेली पावभाजी कशी मनसोक्त आणि पोटभर खाता येते. रात्रीची भाजी उरली तर फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला तडका मारूनही खाता येते... त्यामुळे घरी केलेल्या पावभाजीचं सूख हे वेगळंच..

 

पावभाजी हा शब्द उच्चारला किंवा पावभाजीचा फोटो पाहिला तरी अनेक पावभाजी लव्हर्सच्या (pavbhaji lovers) तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे अगदी आठवड्यातून एकदा पावभाजीचा गाडा गाठणारीही अनेक मंडळी आहेत. पण पावभाजीचा एक मुख्य घटक असलेल्या टोमॅटोचे भाव सध्या खूपच वाढले आहेत. अगदी २० ते २५ रूपयांना पावशेर या दराने टोमॅटोची विक्री होत आहे. एवढे भाव वाढलेले असताना टोमॅटोशिवाय केलेल्या भाज्या खाण्यास आपण प्राधान्य देतो आणि टोमॅटोचे दर कमी होण्याची वाट पाहतो. पण टोमॅटोचे भाव वाढले म्हणून तुम्ही मात्र तुमचा पावभाजी करण्याचा बेत अजिबातच रद्द करू नका किंवा पुढेही ढकलू नका. पावभाजी करण्यासाठी महागडे टोमॅटो खरेदी करा, असंही मुळीच म्हणायचं नाही बरं का.. सांगायचं फक्त एवढंच आहे की टोमॅटो हा पावभाजीचा अविभाज्य भाग आहे, असे फक्त आपल्याला वाटते. टोमॅटो न वापरता, त्याच्या ऐवजी दुसरा एक सिक्रेट पदार्थ वापरला तरी पावभाजी तेवढीच छान आणि चवदार करता येते. 

 

ही घ्या रेसिपी टोमॅटोशिवाय तयार झालेल्या पावभाजीची....
pavbhaji without tomato
पावभाजी करण्यासाठी लागणारे साहित्य

- १ टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट, ३ मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, ३ बटाटे, ३ सिमला मिरची, १ मध्यम आकाराचे गाजर आणि १ लिंबू, अर्धी वाटी भिजवलेले वटाणे, मीठ, २ टेबलस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार तिखट, बटर आणि तेल..... हे पदार्थ पावभाजी करण्यासाठी गरजेचे आहेत. याशिवाय तुम्ही भोपळा, फ्लॉवर, पत्ताकोबी अशा भाज्याही पावभाजी करण्यासाठी वापरू शकता. 
- आपल्याकडे टोमॅटो नाहीत. त्यामुळे भाजीची चव बदलू नये म्हणून आपण लिंबू आणि गाजर हे दोन पदार्थ त्याऐवजी टाकणार आहोत. 

 

अशी करा पावभाजी
- कांदा, सिमला मिरची या दोन भाज्यांव्यतिरिक्त पावभाजी बनविण्यासाठी तुम्ही ज्या कोणत्या भाज्या घेणार आहात, त्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून उकडून घ्या.
- आता मोठ्या कढईमध्ये एक टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून बटर घ्या.
- तेल, बटर तापल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, थोडा गरम मसाला, थोडा लाल तिखट टाका.
- मसाला आणि तिखट जळणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे हे साहित्य टाकल्यानंतर त्यात लगेचच अगदी बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा खूप बारीक चिरता आला नाही, तर तो मिक्सरमधून थोडासा जाडसर फिरवून घ्या.
- यानंतर कांदा चांगला परतला गेला की त्यात अद्रक लसून पेस्ट टाका.  


- पावभाजीला चांगला स्वाद येण्यासाठी आपण सिमला मिरची कच्चीच वापरणार आहोत. त्यामुळे सिमला मिरचीही खूप बारीक- बारीक चिरून घ्या आणि अद्रक लसून पेस्ट परतल्या गेली की त्यात सिमला मिरची घाला.
- सिमला मिरची आणि कांद्याचा कच्चा वास गेला की आता त्यात मध्यम आकाराचे दोन लिंबू पिळा.
- यानंतर यात दोन टेबलस्पून पावभाजी मसाला टाका. मसाला चांगला परतला आणि त्याचा सुवास सुटला की मग कढईत बटाटा आणि इतर उकडलेल्या भाज्या घाला.
 - आता पावभाजी स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घ्या. भाज्या उकडण्यासाठी जे पाणी वापरले, तेच उरलेले पाणी पावभाजीत घाला.
- चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि एक टेबलस्पून चाट मसाला घाला.
- भाजी उकळायला आली की त्यात एक टेबलस्पून बटर घाला तसेच कोथिंबीर चिरून घाला. 
- गरमागरम पावभाजी झाली तयार ..... 

 

Web Title: Food- Recipe: How to make Spicy delicious Pavbhaji without tomato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.