हिवाळा आला की आपल्या स्वयंपाकघरातील काही सुके मसाले आपोआप जास्त प्रमाणात वापरले जातात. भारतीय पाककृतीत तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, मिरी, जिरे असे असंख्य मसाले असतात. (Dry spices works like medicine in winter, see 5 benefits of including them in your daily diet.)पण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते, हे मसाले शरीराला नैसर्गिक उष्णता देतात आणि थंडीतील अजीर्ण, सर्दी-खोकला, अंगदुखी अशा तक्रारी कमी करण्यात मदत करतात. म्हणूनच हिवाळ्यात सुके मसाले हा एक प्रकारचा औषधी उपाय ठरतो.
तमालपत्र – थंडीमुळे कमी होणारे पचन सुधारते
तमालपत्राचे सुगंधी तेल पोटातील कफ कमी करते. हिवाळ्यात पचन मंदावते, भूक कमी होते आणि अन्न जड वाटते. या पानांमध्ये सौम्य अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरात उबदारपणा निर्माण करण्यास मदत करतात. सूप, कढी, भाजी अशा पदार्थांत हे टाकले की सुगंध वाढतोच पण पचनशक्तीही सुधारते.
दालचिनी – रक्ताभिसरण सुधारून शरीराला उब देते
दालचिनी हे हिवाळ्यातील सर्वात उपयुक्त मसाल्यांपैकी एक. यात असलेले सिनेमाल्डिहाइड हे दाहशामक आणि अँटी व्हायरल गुणधर्म देते. दालचिनी रक्ताभिसरण वाढवते, त्यामुळे थंडीमुळे हात-पाय थंड पडणे, सुस्ती येणे किंवा शरीर जड वाटणे कमी होते. हिवाळ्यात गरम दुधात किंवा चहात याचा हलका वापर खूप फायदेशीर ठरतो.
लवंग – थंडीमुळे होणाऱ्या खोकल्यावर नैसर्गिक उपाय
लवंग अत्यंत उष्ण, सुगंधी आणि अँटी-सेप्टिक मसाला मानला जातो. हिवाळ्यात खोकला, कफ, घसा बसणे अशी तक्रार सर्वांनाच असते. अशा वेळी लवंगातील युजेनॉल हा घटक घशाला आराम देतो, कफ पातळ करतो आणि श्वसनमार्ग स्वच्छ करण्यात मदत करतो. लवंगाचा चहा किंवा गरम पाण्यात दोन- तीन लवंग टाकून प्यायल्यास झटपट आराम मिळतो.
वेलची – उब देऊन पचन सुधारते
वेलची हे केवळ सुगंधी मसाला नाही तर शरीराला संतुलित उष्णता देणारे औषध आहे. थंडीत पोटफुगी, अजीर्ण किंवा जडपणा जाणवत असेल तर वेलची लगेच आराम देते. तिचा सुगंध मन शांत करतो. हिवाळ्यात ती चहा, दूध, खीर, गरम पाण्यात वापरल्यास पचन सुधारते आणि शरीर हलके वाटते.
काळी मिरी – शरीराचे तापमान संतुलित ठेवते
काळी मिरी गरम मसाल्यांपैकी सर्वात प्रभावी मानली जाते. यात असलेला पिपरीन हा घटक थंडीत मंदावलेले मेटाबॉलिझम पुन्हा जागा करतो. रक्ताभिसरण वाढवून शरीराला नैसर्गिक उष्णता देते. थंडीत होणारे स्नायूंचे दुखणे, थकवा कमी करण्यासाठी हिवाळ्यात काळी मिरी उत्तम काम करते.
त्यामुळे आरोग्यासाठी हे सुके मसाले अगदी फायद्याचे असतात. आहारात त्यांचा समावेश करुन घ्या. रोज त्यांचा वापर करा. हिवाळ्यात नक्कीच फायदा होतो.
