भारतीय आहारात डाळ (Dal Tadka) एक अविभाज्य घटक आहे. डाळीत फक्त पौष्टीक मुल्यच नसते तर योग्य फोडणीमुळे तिची चव वाढते (3 Type Of Dal Tadka). डाळीला तुम्ही कोणत्या पद्धतीनं फोडणी देता यावर डाळीची चव कशी असेल ते अवलंबून असते. वरण कोणत्या पद्धतीनं केल्यास त्याची चव वाढते. डाळीला फोडणी देण्याच्या पद्धती कोण कोणत्या आहेत समजून घेऊ. (3 Types Of Tadka Add A Burst Of Flavour To Dal)
तुपाची फोडणी
डाळीला सर्वोत्तम अस्सल चव देण्यासाठी शुद्ध तुपाची फोडणी सर्वात उत्तम मानली जाते. तुपाचा मंद सुगंध आणि त्याची पोषक तत्व डाळीला एक शाही चव देतात. गरम तुपात जिरं, मोहरी, तडतडू द्या. त्यानंतर हिंग आणि कढीपत्ता घालून सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. शेवटी लाल तिखट किंवा गरम मसाला घालून लगेच फोडणी डाळीत मिसळा. ही फोडणी तूर किंवा मूग डाळीला चांगली लागते.
लसणाची फोडणी
डाळ तडका किंवा पंजाबी पद्धतीच्या डाळीसाठी लसणाची फोडणी आवश्यक असते. तेलात किंवा तुपात लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. यामुळे डाळीला एक तीव्र आणि खमंग चव येते. या फोडणीत अख्ख्या लाल मिरच्या वापरल्यास लूक आणि चव दोन्ही वाढते.
डबल तडका फोडणी
डाळ शिजवताना साध्या पद्धतीनं जिरं, हिंग, हळद घातली जाते. दुसऱ्यांदा फोडणी देताना डाळ सर्व्ह करण्यापूर्वी वेगळ्या पळीमध्ये तूप-तेल घेऊन त्यात लसूण, बारीक चिरलेलं आलं, कसूरी मेथी, लाल तिखट घालून ही खमंग फोडणी गरम डाळीवर ओतली जाते. यामुळे डाळीचा सुगंध आणि चव अधिक तीव्र होते.
फोडणीसाठी खास टिप्स
फोडणीसाठी मसाले जळू नयेत म्हणून गॅसची आच मंद ठेवा. हिंग आणि कढीपत्ता फोडणीचा सुगंध वाढवतात. त्यांचा वापर आवश्यक आहे. लाल तिखट नेहमी शेवटी घाला आणि लगेच डाळीत मिसळा. अन्यथा ते जळून त्याची चव कडवट होते. डाळीच्या प्रकारानुसार जसं की मसूर, तूर, मूग,चणा फोडणीचे घटक बदलल्यास डाळीला नेहमी एक नवीन आणि उत्तम चव येते.
