Lokmat Sakhi >Fitness > कितीही ठरवलं तरी आपण बारीक का होत नाही?

कितीही ठरवलं तरी आपण बारीक का होत नाही?

आपण खातो किती कॅलरी आणि व्यायाम करुन खर्च किती कॅलरी करतो याचं गुणोत्तर जमलं ना तर बारीक होण्याचं कोडं सहज सुटेल, पण ते गणित कळतं पण वळत नाही असं आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 07:49 PM2021-03-08T19:49:58+5:302021-03-08T20:17:10+5:30

आपण खातो किती कॅलरी आणि व्यायाम करुन खर्च किती कॅलरी करतो याचं गुणोत्तर जमलं ना तर बारीक होण्याचं कोडं सहज सुटेल, पण ते गणित कळतं पण वळत नाही असं आहे!

No matter how much you decide, why don't you get thinner? | कितीही ठरवलं तरी आपण बारीक का होत नाही?

कितीही ठरवलं तरी आपण बारीक का होत नाही?

Highlightsआपण ज्या प्रमाणात कॅलरीज खातो त्या प्रमाणात ज्या व्यायामाने खर्च करणं ही काही सोपी गोष्ट नाही.

-गौरी पटवर्धन

बारीक होण्याचा संबंध असतो तरी कशाशी? म्हणजे काय केलं तर पटापट बारीक होता येतं हा प्रश्न अगदी आम आहे.तर त्याचं उत्तर हेच की, वजन कमी होण्याचा संबंध अनेक बाबींशी असतो, पण त्या सगळ्या घटकांचा विचार केला तरी ती शेवटी एक वजाबाकी असते.आपण खाल्लेल्या कॅलरीज - आपण खर्च केलेल्या कॅलरीज = शरीरात राहून गेलेल्या कॅलरीज म्हणजेच वाढलेलं वजन.

आता या प्रकारची आकडेवारी समजावून घेऊया. आपण जेव्हा एक तास भरभर गतीने चालतो तेव्हा आपण किती कॅलरीज खर्च करतो?

भरभर म्हणजे ताशी साडेपाच ते सहा किलोमीटर्स या वेगाने. म्हणजे आपण थोडा उशीर झाल्यावर बस पकडायला ज्या वेगाने चालत जातो तसे.
तर आपण जर का एक तास भरभर चाललो तर आपण किती कॅलरीज खर्च करतो? तर सुमारे २०० ते ३००. बैठी जीवनशैली असणारी एखादी स्त्री दिवसाला (व्यायाम न करता) किती कॅलरीज खर्च करते? तर सुमारे १८०० ते २०००. असं बघितलं तर वाटतं, की २००-३०० कॅलरीज म्हणजे बऱ्याच झाल्या की…

आता आपण आत जाणाऱ्या कॅलरीजचा विचार करू. एक चहाचा चमचा साखरेत किती कॅलरीज असतात? तर साधारणतः वीस. आपण एक कप चहात किती साखर घालतो? सामान्यतः २ चमचे. म्हणजे ४० कॅलरीज. असा आपण दिवसाकाठी किती कप चहा पितो? तर सकाळी दोन, दुपारी एक आणि दिवसभरात काम करतांना अजून दोन असे एकूण पाच कप. म्हणजे ४० गुणिले ५ = २०० कॅलरीज.
म्हणज़ेच, आपण पाऊण तास चालून जे काही पुण्य कमावलेलं असतं ते आपण दिवसभर चहा पिऊन खर्च करून टाकतो. मग त्याशिवाय दिवसभरात आपण इतर अनेक पदार्थात साखर किंवा गूळ घालतो, विकतच्या पदार्थांमध्ये साखर किंवा कॉर्नस्टार्च असतो त्यातून येणाऱ्या जास्तीच्या कॅलरीज कुठे जातील? चॉकलेट, पेस्ट्री, आईस्क्रीम, ऑफिसमध्ये कोणीतरी दिलेला पेढा, चहाबरोबर खाल्लेली बिस्किट्स, सॉफ्ट ड्रिंक्स, सरबत… या सगळ्यातून ज्या कॅलरीज आपल्या शरीरात जातात त्या जर आपण खर्च केल्या नाहीत तर त्या शरीरात चरबीच्या रूपात साठवल्या जातात…
तेच ते! चरबी! फॅट! वाढलेलं वजन…

अशा आपण दिवसभरात उगीच खात असलेले पदार्थ कॅलरी स्वरूपात बघितले तर आपलं वजन इतकं कसं काय वाढतं त्याचं उत्तर मिळतं.
गुलाबजाम -१२५ कॅलरीज
पावभाजी -४०० कॅलरीज
एक प्लेट भेळ - ३०० कॅलरीज
अर्थातच हे काही एक्झॅक्ट आकडे नाहीत. कारण यात बरेच घटक बदलणारे आहेत. गुलाबजाम किती मोठा? पावभाजीत किती बटर? भेळेत किती बटाटा आणि किती चिंचेची चटणी? त्या चटणीत किती खजूर आणि किती गूळ? पण तरीसुद्धा आपल्याला या आकड्यांवरून साधारण अंदाज येतोच. आणि कसंही मोजलं तरी निष्कर्ष हाच निघतो की आपण ज्या प्रमाणात कॅलरीज खातो त्या प्रमाणात ज्या व्यायामाने खर्च करणं ही काही सोपी गोष्ट नाही.
दोन प्लेट चाट खाल्लं तर दोन तास चालायला लागेल. ते कसं जमणार? आणि मग असं प्रत्येक बाबतीत कॅलरी मोजत जगायचं का? ते शक्य तरी आहे का?

पण खाणं कसं बंद करणार?
मग व्यायाम करा..

सोपं नाही बारीक होण्याचं हे गणित!

Web Title: No matter how much you decide, why don't you get thinner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.