Lokmat Sakhi >Fitness > फिट व्हायला हवं असं म्हणणं सोपं, पण ते जमत नाही?- ही त्याची कारणं आणि उपायही

फिट व्हायला हवं असं म्हणणं सोपं, पण ते जमत नाही?- ही त्याची कारणं आणि उपायही

फिटनेस ही काही फक्त खेळाडूंची, सिनेअभिनेत्यांची गरज अगर श्रीमंतांनाच परवडणारी चैन नव्हे! आपल्या जीवनशैलीत साधेसोपे बदल घडवले तर आपल्यालाही आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं शक्य आहे. त्यासाठी हे साधेसोपे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 02:15 PM2021-04-05T14:15:59+5:302021-04-05T14:25:13+5:30

फिटनेस ही काही फक्त खेळाडूंची, सिनेअभिनेत्यांची गरज अगर श्रीमंतांनाच परवडणारी चैन नव्हे! आपल्या जीवनशैलीत साधेसोपे बदल घडवले तर आपल्यालाही आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं शक्य आहे. त्यासाठी हे साधेसोपे मार्ग

get fit, try these easy steps, change your attitude for better | फिट व्हायला हवं असं म्हणणं सोपं, पण ते जमत नाही?- ही त्याची कारणं आणि उपायही

फिट व्हायला हवं असं म्हणणं सोपं, पण ते जमत नाही?- ही त्याची कारणं आणि उपायही

Highlights#सहज शक्य

स्वप्नाली बनसोडे

२०२१ मध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाचं पटलं असेल तर ते म्हणजे आरोग्य! हेल्थ इस वेल्थ असं आपण म्हणतो, ते म्हणजे नक्की काय हा अर्थ आपल्याला उलगडला. आपली रोजची जीवनशैली आणि आपला आरोग्य याचा जवळचा संबंध आहे. आजकाल आपलं राहणीमान धावपळीचं झालं आहे, त्यात आपण काय खातोय किंवा काही व्यायाम अथवा शारीरिक हालचाल करतोय का, याच्याकडे कानाडोळा करण्याचे अनेक बहाणे आपल्याला सहज सापडतात. पण, खरंच रोजचा व्याप सांभाळून, नोकरी अथवा व्यवसाय, घर, कुटुंब किंवा बाकी सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आरोग्य सांभाळणं शक्य आहे का? - तर उत्तर आहे नक्कीच!

डायबेटिस, शुगर, थायरॉईड, पीसीओडी-पीसीओएस, ब्लडप्रेशर- असं खूप ऐकण्यात येतं आणि आपल्याला त्यात काही नवलही वाटत नाही. फार मागे नाही; पण काही शतकांपूर्वी हे सगळे प्रकार इतके सर्रास आढळून येत नव्हते. या सगळ्या गोष्टी इतक्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. वेगवान जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी, किरकोळ किंवा शून्य हालचाल अथवा व्यायाम, वैयक्तिक आणि व्आवसायिक तणाव अशा कित्येक कारणांमुळे हे लाइफ स्टाइल विकार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 
मी दैनंदिन आयुष्यात अशा कित्येक व्यक्तींसोबत काम करते आणि त्यांना त्यांची जीवनशैली सुधारण्यात मदत करते. अगदी छोटे आणि लॉन्ग टर्म टिकणारे बदल आपण सहजरीत्या दैनंदिन आयुष्यात आणू शकतो आणि फिटनेस ही खऱ्या अर्थाने नवीन जीवनशैली बनवू शकतो. अशा बदलाने वजन कमी होणे, स्ट्रेंग्थ आणि स्टॅमिना वाढणे, एवढंच नव्हे तर, लाइफ स्टाइल विकार नक्कीच कमी होऊ शकतात.
शक्यतो लोकांचा असा एक विचार असतो, की डाएट म्हणजे खूप कमी खायचं किंवा फक्त सॅलड आणि ज्यूस, असे बरेच गैसमज असतात. डाएट या शब्दाचा खरा अर्थ आहे ‘वे ऑफ लाइफ!’ जे आपण दैनंदिन जीवनात समाविष्ट करतो त्याने आपलं डाएट बनतं. अगदी छोटे बदल जसं की प्रत्येक जेवणात काहीतरी प्रोटीन असणं! प्रोटीन म्हणजे साहजिक डाळ किंवा मोड आलेली कडधान्यं नजरेसमोर येतात. आपल्या सामान्य भारतीय जेवणात उत्तम दर्जाच्या प्रोटीनचं प्रमाण सर्वसाधारणपणे कमी असतं. तुम्ही शाकाहारी असाल तर फारच! चांगल्या दर्जाचं प्रोटीन म्हणजे ज्यामध्ये ९ अत्यावश्यक अमिनो ॲसिड्‌स असतात, असे पदार्थ! दुग्धजन्य पदार्थ, पनीर, दही, चीज, सोया, चिकन, अंडी, मासे वगैरे. एखादं नवीन घर बांधताना विटा जशा घराला भक्कम बनवतात तसंच प्रोटीन आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. नवीन पेशी बनवणे, प्रतिकारशक्ती, शरीराचा बॅलन्स ढळू न देणे अशा कित्येक महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रोटीन आवश्यक आहे.
आपल्या डाएटमध्ये कर्बोदके, प्रथिने किंवा प्रोटीन आणि फॅट्स असतात, यांना मायक्रोन्यूट्रिअन्ट्स म्हणतात, म्हणजेच हे आपल्या जेवणात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. निरोगी आणि परिपूर्ण आरोग्यासाठी आपल्याला या सगळ्यांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. कर्बोदके आपल्याला ऊर्जा देण्यात मदत करतात, तर फॅट्स (म्हणजे चरबी) काही महत्त्वाच्या हॉर्मोन निर्मितीमध्ये, अंतर्गत अवयवांच्या सुरक्षेसाठी, काही महत्त्वाच्या व्हिटॅमिनची वाहतूक इत्यादींसाठी महत्त्वाचे असतात. डाएटमध्ये संतुलन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जर थोडे जागरूक होऊन योग्य आहार घेऊ तर फिटनेस खूप अवघड गोष्ट नाही. दिवसातून अर्धा तास तरी कोणताही शारीरिक व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष करून भारतात आपल्याला जागरूक होण्याची आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करण्याची खूप आवश्यकता आहे. कारण, वरचेवर लाइफ स्टाइल विकार वाढत आहेत आणि दैनंदिन जीवनात सतत आपल्याला वेगवेगळ्या ताणतणावांना सतत सामोरं जावं लागतं आहे.
छोटेछोटे आणि सातत्याने केलेले बदल हळूहळू सवयी बनतात. घरी बनवलेला परिपूर्ण आहार, बाहेर मिळणारे गोड आणि तळलेले पदार्थ टाळणं, छोटासा व्यायाम दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं या सगळ्यांनी आपण आपली जीवनशैली नक्कीच बदलू शकतो आणि ते सहज शक्य आहे. आपल्या आरोग्याची काळजी आज घेऊया म्हणजे उद्या आपल्याला औषधांवर आणि आजारपणावर खर्च नाही करावा लागणार. जशी आपण आर्थिक भवितव्याची काळजी घेतो आणि त्याची तयारी आज करतो तशीच उद्याच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी आरोग्य आणि फिटनेस ही आजची गुंतवणूक आहे... 

( लेखिका अमेरिकास्थित फिटनेस -डाएट तज्ज्ञ आहेत)

swapnalbansode@gmail.com

Web Title: get fit, try these easy steps, change your attitude for better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.