The first day of London | लंडनमधले ते पहिले दिवस
लंडनमधले ते पहिले दिवस

-शुभांगी गबाले


स्थलांतर ही संकल्पना माणसाच्या उत्क्रांतीसोबतच उत्क्रांत होते आहे. अनेक अर्थानं ही संकल्पना माणसाच्या जगण्या- रुजण्याशी घट्ट सांधली गेली आहे.   कोणतीही स्थलांतरं निव्वळ शारीर कधीच नसतात. त्याहून कितीतरी मानसिक,  भावनिक स्थित्यंतरं ती आपल्यासोबत वागवत असतात.  पैकी काही स्थलांतरं  तात्पुरती, क्षणभर विसावा देणारी, काही वर्षागणिक लांबत जाणारी अन् मागे फिरायला वावच न ठेवणारी.  जिथून आलो तिथं पोचूच न देणारी अशी. 

‘स्थलांतर’ हा शब्द तसा लहानपणापासून अनेक वाटा-वळणं घेत मला भेटत राहिला आहे. कधी  वडिलांच्या नोकरीमुळे तर कधी शिक्षणासाठी छोट्या गावांतून निमशहरात, शहरात मी स्थलांतर करत आलेय. आणखी एक स्थलांतर लग्नानंतरचं.  कुणाही बाईच्या  आयुष्यातलं तेही एक मोठं विस्थापनच असतं, नाही का?   जुन्या जागा दुरावणं अन् नव्या जागेवर अपार पोरकं वाटत राहणं यातून उठणारी कळ अगदी कालपरवापर्यंत - इंग्लंडला येईस्तोवर - मी पुन्हा पुन्हा अनुभवली आहे. म्हणूनच कदाचित या शब्दाची एक खास ओल माझ्या आत सतत झिरपत असते.            

स्थलांतरातून व्यक्ती किती काय काय मागे सोडते, गमावून बसते. भौतिक साधनं तर झालीच. पण  आजवर  जपलेली माणसांची, नात्यांची, झाडा-अंगणाची दृश्य-अदृश्य  सोबत.. सगळं एकदम मिटून जातं धाडदिशी आपला बाड-बिस्तरा घेऊन निघालं की.. आणि आठवणींच्या एका ठिपक्याशी जमा होत राहतं . हे खूप  दुखणारं असतं.  यामुळे स्थलांतर अन् स्थलांतरित या  अक्षरांना माझ्या  जगात विशेष  आस्था आहे. जागोजागी भटकत राहणार्‍या, अस्थिरता भोगत जगणा-या प्रत्येकाच्या जगात ती असणारच. 
माझा नवरा आयटी क्षेत्रातला असल्यानं परदेश प्रवास त्याला खुणावत होतेच कधीपासून. मग एके दिवशी त्याने विचारलं,
यूकेच्या प्रोजेक्टची ऑफर आहे, जाऊया का? 
- त्या प्रश्नाक्षणी माझ्या नजरेसमोर उभं राहिलं ते आजवर न पाहिलेलं पण  चिक्कार ऐकलेलं, वाचलेलं लंडन. एक्साइटमेण्टची पहिली प्रतिक्रि या ओसरल्यावर  जाणीव झाली ती माझ्या नोकरीची. प्रकाशन संस्थेतल्या  संपादकीय जबाबदारीतून अनेक पुस्तकांवर मी काम करत होते. काही अर्धीअधिक निपटत आलेली तर काहींची नुकतीच सुरुवात झालेली. तशातच गरोदरपण,  डिलिव्हरी ही स्री कर्तव्यं आटपून एका वर्षाच्या सणसणीत ब्रेकनंतर काही महिन्यांपूर्वीच मी नोकरीवर पुन्हा रुजू झालेले.  आणि आता यूकेला निघायचं म्हणून पुन्हा एक भलामोठा ब्रेक. इथं निर्णय काहीसा अडखळू लागला. दुसर्‍या  बाजूला  पाय मात्र  लंडनसाठी अधीर झालेले. हातात फक्त तीन आठवडे. कधीही बॉस म्हणून न वावरलेल्या डायमंडच्या नीलेश सरांशी केव्हाही खूप मोकळेपणानं बोलता येत असे, पण त्यादिवशी मात्र  त्यांना हे कसं सांगावं समजेना झालेलं. उत्साहानं हाती घेतलेली पुस्तकं काही सुचू देत नव्हती. मग ती कामं कशी मार्गी लावायची याचा नीटच विचार करून सरांशी बोलले. तेव्हा चर्चेतून ठरलं की एकदोन महत्त्वाच्या पुस्तकांची फायनलला आलेली कामं  मी लंडनहूनच पूर्ण करायची. हुश्श झालं खरोखर. 
 

सगळीच अनिश्चितता अन् काहीसं भांबावलेपण घेऊनच यूकेतल्या लीड्स या शहरात  पोचलो. आमच्या दोन वर्षांच्या मुलासकट. आम्ही पोचलो तेव्हा कडक हिवाळा होता. मध्यरात्री विमानतळाबाहेर येऊन टॅक्सी पकडेपर्यंत अंगावर आलेला कडकडीत गारठा आजही शहारा आणतो. सकाळी सकाळी खिडकीचे पडदे बाजूला करताच तांबूस पिवळ्या पानांनी लगडलेल्या  मेपलची रांग पाहून  अवाक् व्हायला झालं. शाहरूख, ऐश्वर्याच्या  ‘मोहब्बते’  सिनेमाने या ऑटम लिव्हज तथा मेपलच्या लालकेशरी पानांचं वेड मनात भरून ठेवलेलं कधीपासून. खाली उतरून पटापट ती पानं गोळा करायचा मोह कसातरी आवरून धरला.  तपकिरी चॉकलेटी रंगांच्या  इमारतींच्या पार्श्वभूमीवर भलीमोठाली ही रंगीन मेपलची झाडं अन् त्यातून डोकावणारं अफलातून ब्रिटिश आर्किटेक्चर. जागोजागी फुलांची आकर्षक सजावट. रस्त्यातून कोट, जॅकेट घालून शांतपणे नाकासमोर चालत राहणारी सफेद सुंदर ब्रिटिश माणसं. माणसापासून वास्तू अन रस्त्यापर्यंत सारं काही विलक्षण आखीवरेखीव.

इंग्लंडची अशी पहिली वहिली नजरभेट घडवणारा हॉटेलसमोरचा तो रस्ता मनात कायमचा कोरला गेला.  घर असो वा ऑफिस,  एकाच रंगाढंगातल्या सर्व सुबक इमारती, बाजूनं भरपूर हिरवाई अन  माथ्यावर शब्दश: निळं निळं स्वच्छ आभाळ हे नंतर कितीही सवयीचं झालं तरी अजूनही तितकंच मोहक वाटतं. दोन-अडीच आठवडे हॉटेलवरच राहून केलेली घराची शोधाशोध इंग्लंडचे पुष्कळ धडे देत राहिली. संध्याकाळी पाचनंतर रस्ते ओस होत जायचे अन् दुकानं चिडीचूप. घरं दाखवणार्‍या  ब्रिटिश एजंट्सचा वेळांचा शिरस्ता तर अंत बघणाराच. इथल्या ब्रिटिश प्रोफेशनलीझमचे सुरुवातीचे पाठ त्यांनीच घालून दिले. एक झालं, यातून  साहेबांच्या  देशातली  कडक शिस्त तिथे पोचताच अनुभवायला मिळाली. दुसरीकडे, जिकिरीने शोधून काढलेल्या इंडियन रेस्टॉरण्टमधले   ब्रिटिश-इंडियन फ्यूजनमधून तयार होणारे  बेचव पदार्थ घराची आठवण आणखी तीव्र करत राहायचे.  तुलनेनं सॅण्डविच अधिक आवडू लागलं मग. अजून चविष्ट भारतीय रेस्टॉरण्टचा शोध लागायचा होता आम्हाला.  आणखी म्हणजे जेव्हा केव्हाही टॅक्सी पकडावी तर तो ड्रायव्हर पाकिस्तानीच असायचा. आम्हा इंडियन फॅमिलीला पाहून दिलखुलास हसायचा. टॅक्सीत  भारतीय हिंदी सिनेमातली नवी-जुनी गाणी कायम वाजत असायची. ही हिंदी गाणी मला एकाच वेळी भारताशी अन् पाकिस्तानशी जोडून घेत राहायची. सर्वांशी आमच्या छान गप्पा व्हायच्या. ब्रिटिश टॅक्सी ड्रायव्हरचा असा अनुभव क्वचित आला.   त्यांचं हॅलो आणि थँक यू ही देवाणघेवाण मस्ट पण. 

अशाच एका टॅक्सी प्रवासात रफिक भेटला.  ‘हम तो ब्रदर कंट्रीसे है भाई’ म्हणत आम्हाला इतके दिवस हॉटेलवर राहावं लागतंय म्हणून हळहळला.   ‘फिकर मत करो’ म्हणत टॅक्सी बाजूला थांबवून फटाफट घराच्या चौकशीसाठी कुणाकुणाला फोन करू लागला.  ‘‘आम्ही कोण’ असं पलीकडच्याला सांगताना त्याच्या खास पाकिस्तानी लहेजामध्ये तो म्हणे,
‘अपनी इंडिअन फॅमिली है एक. छोटा बच्चा भी है. अपने एरिया में कूछ होतो बोल फटाफट. अर्जंट चाहिये.’

-  मग रफिकने आमचा फोन नंबर घेतला. स्वत:चा दिला अन सोबत  ‘तुम्हाला दोन दिवसात घर मिळवून देतोच’ असं माणुसकीभरलं आश्वासनही. नंतरही रफिक स्वत:च फोन करून घर मिळालं का विचारायचा. घरं सुचवायचा नि म्हणायचा,  

‘ब्रिटिश भागात राहू नका, ते गोरे कधी मदतीला येत नाहीत. पाकिस्तानी भागात छान घर शोधून देतो. सब अपनेही लोग होते है. कभी भी मदद करने आ जाते है.’

- भारत पाकिस्तानातली सामान्य माणसं एकमेकांशी अशी आतून  जोडलेली आहेत अन धगधगत्या बॉर्डरआडून असा एक अदृश्य बंधुभाव जपताहेत, खरंतर याचा लख्ख धडाच रफिकनं घालून दिला. असेच एक शुभ्र दाढीतले किडकिडीत पाकिस्तानी चाचाही टॅक्सीतच भेटायचे अनेकदा. मनापासून बोलत राहायचे. त्यांचं पाकिस्तानी लहजातलं घरंदाज उर्दूमिश्रित हिंदी इतकं मधाळ वाटायचं की आम्ही त्यांना बोलू द्यायचो फक्त. अजिबात डिस्टर्ब न करता. अन या पार्श्वभूमीवर धीम्या सुरातल्या  दर्दभ-या  उर्दू गझला एक वेगळाच सुकून मनात उतरवत राहायच्या. चाचा पुन्हा पुन्हा भेटावेत असं आम्हा दोघांनाही वाटत राहायचं. हे बहुतेकजण मुंबईबद्दल खूप प्रेमानं बोलायचे. बोलतात. भारताचा आख्खा चेहरा लेऊन उभ्या असलेल्या मुंबईविषयी या पाकिस्तानी बांधवांना एक अनामिक ओढ आहे असं हळूहळू लक्षात आलं. नंतर आमच्या इंडियन मित्रांकडून समजलं, लीड्समध्ये पाकिस्तानी लोकसंख्या मोठी आहे. अन् सोबत त्यांचे सल्लेही की त्यांच्या एरियामध्ये घर घेऊ नका. सतत भांडणं मारामार्‍या  सुरू असतात तिकडे वगैरे वगैरे. 

अर्थात या गृहितकांच्या कुंपणापल्याड रफिक, दाढीवाले चाचा आणि त्यांच्यासारखेच  इतरही  अनेक टॅक्सी ड्रायव्हर जास्त सच्चे वाटत राहिले.  नुकतीच ओळखीची झालेली एक दक्षिण भारतीय मैत्रीण अन तिच्या ओळखीतली पाकिस्तानी आण्टी यांच्या साहाय्यानं अखेर घर मिळालं. पंजाबी  घरमालक असलेलं. आणि आमचा यूकेतला संसार सुरू झाला. जवळच असलेल्या पाकिस्तानी सुपरमार्केटनं कुठल्याच भारतीय वस्तूची कधी कमी जाणवू दिली नाही.  रत्नागिरी हापूस ते  गरमागरम समोश्यापर्यंत..  ग्लोबल होणं म्हणजे काय याची नेमकी  प्रचिती  यातून  येऊ लागली.

लायब्ररी, कॅफे, बस वा ट्रेनमधून फिरताना भेटणारी ब्रिटिश माणसं बोलत फार नाहीत पण हसून हाय, हॅलो स्वत:हून करत राहतात हा त्यांचा शिष्टाचार कळून आला. पाकिस्तानी मनातलं भारतीय आपलेपण अनुभवता आलं. नंतर मित्न बनलेले दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय यांच्या संस्कृती जवळून न्याहाळता येऊ लागल्या. एकमेकांसोबत खाण्या-खिलावण्यातून भाषा संस्कृतीचं शेअरिंग सहज होऊन गेलं. परक्या भूमीत रुजायला आणखी काय हवं असतं.. ग्लोबल बनण्याचा हा प्रवास असा सतत शिकवणारा, दृष्टी विस्तारणाराच ठरतो आहे अजूनही.. त्याबद्दलच या लेखांमधून काही लिहिणार आहे, दर पंधरा दिवसांनी!

(लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून निर्वासितांसाठी काम करणार्‍या संस्थेशी संलग्न आहेत)

shubhangip.2087@gmail.com


Web Title: The first day of London
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.