eating food is celebration of connection. | जेवण करणं हा सोहळा आहे. तो कसा?
जेवण करणं हा सोहळा आहे. तो कसा?

-गिरिजा मुरगोडी

काही निमित्तानं एका आश्रमात जाण्याचा योग आला. जेवणाची वेळ झाली होती. मुलांची पंगत बसली होती. आणि मुलं हात जोडून म्हणत होती
‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे 
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म..’
खूप दिवसांनी कानावर पडला हा श्लोक आणि मन कितीतरी वर्षं मागे जाऊन पोहचलं.
शेणानं सारवलेली स्वच्छ जमीन, दोन्ही बाजूनं  अंथरलेल्या पंगतीच्या चटया, काही पाटं, समोर मांडलेली केळीची पानं/पत्रावळ्या किंवा पितळेची लख्ख ताटं, शेजारी पाण्याचा तांब्या-भांडं, चटया/ पाटांवर बसलेली घरातली लहानथोर मंडळी, सुग्रास भोजनाचा दरवळ आणि एका सुरात म्हटलेले श्लोक, स्तोत्रं. हे सगळं मनात जागं झालं. अशा पद्धतीनं होणारं जेवण निश्चितच तुष्टीपुष्टी आणि समाधान देणारं असे. आणि अशा श्लोकांमधून तर कितीतरी चांगले संस्कार नकळतच होत जात.

आपण जे अन्न ग्रहण करतोय त्यामागे कितीतरी लोकांचे कष्ट आहेत. त्या सर्वांप्रति कृतज्ञताभाव मनात ठेवून विनित राहून प्रत्येक घास घेतला पाहिजे. हे अन्न आपल्याला मिळतंय हे आपलं सुदैव आहे याची जाण ठेवणं, भान ठेवणं त्यासाठी परमेश्वराचं स्मरण करणं.

आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आत जे यज्ञकुंड कार्यरत आहे त्यात आपण एकेका घासाची समिधा अर्पण करत असतो. त्या समिधांचं हवन श्रीहरीच्या स्मरणानं सहजपणे होऊ शकतं. 

खरं तर यामागे भावना ही आहे की, जेवताना शांत असावं. देवाचं नाव घेणं म्हणजे मन हळूहळू शांत करणं. वातावरण चांगलं असेल तर खाल्लेला प्रत्येक घास अंगी लागतो. नुसतं भरण नव्हे तर पोषण होतं. म्हणूनच पूर्वीपासून सांगितलं गेलंय की सावकाश जेवा, जेवताना वाद घालू नका, पदार्थाला नावं ठेवू नका. पानात वाढलेलं आनंदानं, मनापासून आणि मन लावून शांतपणे खा. अशा अन्न सेवनानंच तर ख-या अर्थानं जीवन करी जीवित्वा हे साधलं जाऊ शकतं ! 
 अन्न हे पूर्णब्रह्मच! खरंच अन्नाशिवाय आपण नाही जगू शकत. शास्त्रीयदृष्ट्या नाहीच; पण मानसिक दृष्ट्याही नाही. अन्न ही आपली गरज आणि खरं तर हौसही असते. या पूर्णब्रह्मशी निगडित वस्तू तरी किती. आणि त्यांच्याशी निगडित आठवणीही असंख्यच. अगदी बालपणी भातुकलीच्या सेटपासून ते लग्नानंतर पाठवणी करताना आईनं दिलेल्या संसारापर्यंत, कितीतरी! पूर्वी पत्र्याच्या मजबूत ट्रंकेतून नवरीबरोबर सासरघरी येणारी हरप्रकारची भांडी असोत, वा आता ऑनलाइन प्रकारची आधुनिक भांडी असोत. त्यामागच्या भावनांमध्ये आणि गुंतलेपणामध्ये फार फरक नसतो. 
अर्थात पूर्वीची आत्यंतिक भावनिकता आणि तीव्रता यांचं प्रमाण थोडंसं कमी झालं असेल कारण आजच्या गृहिणीची व्यवधानं अनेकविध असतात आणि त्यामुळे अवधानही विभागलेलं असतं. पण या सर्वांशी तिचं अगदी मर्मबंधातलं नातं असतंच.

या पूर्णब्रह्मशी निगडित एक मनभावन भाग म्हणजे बहारदार भाज्या आणि फळं. कधी एखाद्या भाजीच्या मळ्यात किंवा फळांच्या बागेत जाण्याचा योग आला तर ते दृश्य इतकं थंडावा देणारं असतं. डोळ्यांना आणि मनालाही. सर्वदूर पसरलेली हिरवीगार भाजीची रोपं, त्यावरच्या कोवळ्या कोवळ्या भाज्या, पालेभाज्यांचे वाफे, काकडी, दोडकी, घोसाळ्यांच्या नाजूक वेली, फुलकोबी-पानकोबीचे भरगच्च मळे, जमिनीवर पसरलेल्या वेलींवरचे गोल मटोल भोपळे. हे सगळं कसं पाहात राहावं असं !

फळांच्या बागा तर अधिकच अपूर्वाईच्या. एका एका घडानं भारावलेली हिरवीकंच केळं असो, हिरव्या कै-या  वा पिवळसर केशरी आंब्यांनी लहडलेले भारदस्त आम्रवृक्ष असोत, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंबांनी खुलणा-या  परसबागा असोत का लालचुटुक स्ट्रॉबेरींची नितांतसुंदर शेतं असोत. ‘पाहाता किती पाहशील दो लोचनांनी’ अशी अवस्था होऊन जाते. मळे वा बागाच काय भाजी मंडई अन् फळबाजारात फिरतानासुद्धा माझं तर भान हरपून जातं. मला आठवतं, लहानपणी आमचे आप्पा दर रविवारी मंडईत भाजी आणायला जाताना कधी मला तर कधी माझ्या बहिणीला बरोबर घेऊन जायचे. सकाळी सकाळी मंडईतल्या त्या हिरव्यागार ताज्या भाज्यांचे ढीग बघताना हरखून जायला व्हायचं. आप्पा सांगायचे, ‘चल तुझ्या आवडीच्या भाज्या घे.’ बोलता बोलता भाज्या कशा बघायच्या, चांगल्या निवडून कशा घ्यायच्या इ. धडेही द्यायचे. त्या भाज्यांमधून फिरताना मजा यायची. अजूनही येते. एकूण काय, मळ्यात असोत वा मंडईत, या हिरव्यागार अन् रंगीबेरंगी ताज्या भाज्या आणि रसदार, रंगबहार अशी फळं किती आनंद देत असतात!

या सगळ्याचीच किमया अशी की, संत सावता माळी ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणत मळ्यात रमतात, तर कुणा आधुनिक गीतकाराला  ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे-पोहे’ वाटतात, तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या धीरूबेन मेहता  ‘किचन पोएम्स’ या सुंदर पुस्तकातून स्वयंपाकघराचं, पर्यायानं गृहिणीचंच अंतरंग उलगडून दाखवतात. आपल्या माणसांबद्दलच प्रेम आणि आपुलकी ओतून केलेला प्रत्येक पदार्थ तर एक प्रकारे प्रत्येकाचं भावविश्वही समृद्ध करत असतो. म्हणूनच आई, आजी, आत्या, मावशी कुणी कुणी निगुतीनं रांधलेल्या कितीतरी पदार्थांनी मनात कायमचं वास्तव्य केलेलं असतं ! असं हे पूर्णब्रह्म  वेगवेगळ्या प्रकारे आपल्या अस्तित्वाशी जोडलेलं  असतं. या श्लोकातील   ‘सहज हवन होते.’ या ओळीनं मनात आणखीही काही विचारतरंग उमटू लागले.

हवन हा भारतीय परंपरेत शुद्धिकरण विधी मानला गेला आहे. शुभकामना, स्वास्थ्य, समृद्धी यासाठीही हवन केलं जातं.
इथे हवन ‘मी’पणाचं, हवन काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह अशा षड्रिपूंचं करता आलं तर..! हे वेगळं अग्निकुंड, वेगळी आराधना. देहरूपी, मनरूपी, विचाररूपी अग्निवेदीवर सगळ्या नकारात्मक भावना, कल्पना आणि अनुभव यांचं हवन करून नव्या ऊर्जेचा लाभ मिळवायचा. 

हे हवनही श्रीहरीचं नाम घेता सुलभ होऊ शकतं . कारण नामस्मरणाचं महत्त्व याही मार्गावर अनन्यसाधारण असंच. 
 ‘वदनी कवळ घेता.’ कानावर पडलं आणि काय काय मनात जागं झालं. खूप आठवणींनीही मनात फेर धराला. त्या जेवणावळी आणि पंक्ती आठवल्या. तो आनंद आठवला. आता बदलत्या जीवनशैलीत हे सगळं जमणं कठीणच, काय जवळ जवळ अशक्य आहे हे तर खरंच; पण त्यातूनची सणासुदीला, कार्यासमारंभांना गावांमध्ये तरी या परंपरा अनुसरल्या जातात हेही आनंददायी आहे.

आधुनिक जीवनातल्या धकाधकीत काही प्रथा लोप पावल्या हे खरं. पण यामध्ये अभिप्रेत असलेले संस्कार मात्र रुजलेले असतात. ते संस्कार कोणत्या न कोणत्या प्रकारे पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्याची आसही मनात जागी असते. 

त्यामुळेच काही ठिकाणी या श्लोकांना नवं रूप देऊन आजही ते जपले जात आहेत. पुण्यातील ‘अक्षरनंदन’ शाळेत आणि अनेक ठिकाणी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांमध्ये एक फार सुंदर प्रार्थना म्हटली जाते -
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात 
श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात 
स्मरण करूनी त्यांचे अन्न सेवा खुशाल 
उदरभरण आहे चित्र होण्या विशाल
किती योग्य आणि सुरेख विचार! या जाणिवेचे संस्कार, ही रुजवणं मुलांच्या संस्कारक्षम वयात होते आहे हे खूप स्तुत्य, आश्वासक आणि आनंददायी आहे!

(लेखिका गोव्याच्या साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत)

gmmurgodi@gmail.com


Web Title: eating food is celebration of connection.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.