Easy search on net... But not good for brain | नेटवरून आयती शोधाशोध..बुध्दीला घातकच!
नेटवरून आयती शोधाशोध..बुध्दीला घातकच!

-डॉ. सुनील आणि डॉ. अश्विनी गोडबोले

4 सप्टेंबर 1998 म्हणजे शिक्षक दिनाच्या एक दिवस आधी, वीस वर्षांपूर्वी एक नवा शिक्षक जन्माला आला.  
'‘गूगल गुरु’! आज सारं जग या गुरुचे शिष्य झालं आहे! कुठलीही माहिती हवीय- करा गूगल. कुठला पत्ता शोधायचाय- करा गूगल! ट्रॅफीकची माहिती घ्यायचीय- करा गूगल! आकाशापासून पाताळापर्यंत वाट्टेल ती माहिती क्षणार्धात पोहोचवणारे गूगल इतकं  लोकप्रिय झालंय की ‘गूगल ही एक कंपनी आहे’ हे विसरून ‘करा गूगल’ हे एक क्रियापद झालंय! 

 सुरुवातीला संगणकापुरतं मर्यादित असलेलं गूगल आता मोबाइल क्रांतीमुळे आपल्या हातात येऊन बसलंय. 

पाठोपाठ गूगल जे काही विस्मयकारक शोध (उदा. गूगल ग्लासेस- ज्याच्यामुळे समोर जे दिसतंय त्याची माहिती क्षणार्धात समजू लागते) लावत आहे, त्यामुळे गूगल हळूहळू माणसाचा ताबा घ्यायला लागलंय! आणि इथंच गूगल एका जुन्या इंग्रजी चित्रपटाप्रमाणे ‘गूड (चांगलं)’, बॅड (वाईट) आणि अगदी (अतिवाईट/किळसवाणं) व्हायला लागलंय!

गूगल किती चांगलं आहे हे तर आत्ता छोटं मूलसुद्धा सांगेल. कारण बाळाचा डायपर कुठला चांगला हे गूगललाच ठाऊक आहे! पाठोपाठ बाळाचं नाव काय ठेवायचं यासाठीचे शेकडो पर्याय गूगलचं पुरवतं! मग शाळेत गेल्यावर शाळेचे प्रकल्प करायचे म्हणजे एकेकाळी आईवडिलांना धडकी भरायची. 

कुठे संदर्भ ग्रंथ धुंडाळा, ग्रंथालयं पालथी घाला, वर्तमानपत्रांची कात्रणं सांभाळा असले सगळे उद्योग एकेकाळी कष्टानं केले जायचे! आता प्रकल्प म्हटलं की फक्त गूगलवर ‘सर्च’ करायचं! माहिती ‘डाउनलोड’ करायची आणि त्यातल्या त्यात कष्टाचं काम म्हणजे ‘कट-कॉपी-पेस्ट’ करायची आणि प्रिंट काढायची! मुलानं प्रकल्प केलाय म्हणण्यासाठी फारतर त्याचं नाव, अनुक्रमांक, इयत्ता आणि शाळेचं नाव त्याच्या हस्ताक्षरात लिहायचं म्हणजे प्रकल्प तयार! गंमत म्हणजे ‘गूगलपासून टेबलपर्यंत’ जाणारी ही माहिती मुलांच्या डोक्याला ‘बायपास’ करून जात असली तरी त्याबद्दल ना पालकांना दु:ख ना शाळेला प्रश्न! 

मुलं थोडी मोठी झाली की, ‘गूगल त्यांचा जिवाभावाचा मित्र (का मैत्रिण?) होतो! मग अभ्यासाच्या पलीकडची माहिती म्हणजे सिनेमा कुठला चांगलाय, कुठल्या हॉटेलमध्ये काय चांगलं मिळतं, त्यातले घरी काय मागवता येतंय इथपासून वाट्टेल ती माहिती सहज मिळत असते. 

आपण मोठ्ठेसुद्धा ‘गूगल असिस्टंट’चा आपला खासगी सेवकासारखा वापर करत असतो; पण चांगल्याबरोबर वाईटही येतंच!  गूगल गुरु जेव्हा ज्ञान देतो तेव्हा निरपेक्ष बुद्धीनं चांगल्याबरोबर वाईटही उदार हस्ते देतो! न कळत्या वयातील मुलांना आणि कळत असूनही कळून न घेणा-या मोठय़ांना गूगलवरून येणारी ही नको ती माहिती नको त्या पातळीवर घेऊन जाते. 

गूगल गुरू माणसाची चंद्रावरची स्वारी जितक्या आकर्षक पद्धतीनं शिकवितो तितक्याच, किंबहुना त्याहूनही वाईट पद्धतीनं हिंसापाठही शिकवतो. 
गूगल जगातली जितकी माहिती देतं तितकी जगाची माहिती पोटात साठवतंही. 

ही माहिती प्रचंड प्रमाणात साठवण्याची क्षमता ‘अतिवाईट’ ठरू शकते. एखाद्या माणसाची माहिती, त्याच्या सवयी, खर्च करण्याची वृत्ती, भावनांना बळी पडण्याची शक्यता या सगळ्याची माहिती त्या व्यक्तीच्या नकळत प्रत्येक गूगल सर्चबरोबर गूगलला कळत असते! दुर्दैवानं ही माहिती विकलीही जात असते! तुमच्या नकळत (जे सगळ्यात वाईट आहे) तुमची वरवरची माहिती तर असतेच, पण त्याबरोबरीनं तुमची गोपनीय माहितीही गूगल गोळा करत असतं. 

तेव्हा गूगलसारखं साधन आंधळेपणानं नव्हे तर डोकं जागेवर ठेवून हाताळावं. डोक्याला चालना मिळेल इतकंच वापरावं.  डोकं बंद पडेल एवढा गूगलचा वापर लहानांपासून मोठय़ापर्यंत कोणीही केला तरी बुद्धीचा तोटाच होणार!

(लेखक हे बालविकास तज्ज्ञ आणि लेखिका बालआहार तज्ज्ञ आहेत)

suneel.godbole@gmail.com


Web Title: Easy search on net... But not good for brain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.