Do you want to avoid sweet? | गोड टाळायलाच हवं का?
गोड टाळायलाच हवं का?

 -वैद्य राजश्री कुलकर्णी

माणसाच्या जिभेला सहा चवी कळत असल्या तरी जन्मानंतर त्याची पहिली ओळख होते ती गोड चवीशी.  साधारण पहिले सहा महिने तरी त्याला फक्त गोडच चव माहीत असते ! पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मध चाटवायची पद्धत होती. नंतर हळूहळू खीर, शिरा असा हा गोडाचा प्रवास सुरूच राहतो ! याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मधुर रस आपल्या शरीराला सुरुवातीपासून मानवणारा रस आहे.

हल्ली मात्र  गोड पदार्थांविषयी पुष्कळ समज - गैरसमज पसरलेले दिसतात. वजन वाढणं आणि गोड, मधुमेह आणि गोड, इतकंच काय तळलेलं गोड आणि कोलेस्टेरॉल असे संबंध गोड म्हटलं की सारखे डोक्यात येत राहतात ! तरुण पिढीला तर  गोड पदार्थ म्हटले की आपलं वजन वाढेल असं वाटतं. पण हीच मुलं भरमसाठ प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स पिताना आढळतात ज्यात साखरेच्या पाण्याशिवाय काहीच नसतं, वरचेवर केक, पेस्ट्री मोठय़ा प्रमाणात खातात. 

गोडाचा गुणधर्म

मुळात वाढ करणं हा गोड चवीचा मुख्य गुणधर्म आहे. त्यामुळेच लहान वयात गोड पदार्थ खाऊन मुलं वजनानं आणि उंचीनं फटाफट वाढतात. कारण मधुर रस शक्तिवर्धक, बलवर्धक आहे. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, कृश व्यक्ती, जखमी लोकं, या सर्वांना हितकर आहे. सर्व पंचेंद्रियांची शक्ती वाढवणारा आहे. शरीराची झीज भरून काढणारा, शरीरातील महत्त्वाचा जीवरक्षक पदार्थ म्हणजेच ओज वाढवणारा, केस, शरीराचा वर्ण आणि आवाज यासाठी हितकारक आहे. ज्यांची प्रसूती नुकतीच झाली आहे अशा स्त्रियांचं अंगावरील दूध वाढवणारा आहे. तुटलेली हाडं लवकर भरून आणणारा आहे. आपलं आयुष्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी मधुर रस गरजेचा आहे.
 

अतिगोड घातकच !

मधुर रसाचे गुणधर्म अजिबात दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. कारण हे सगळे जवळ जवळ जीवनावश्यक आहेत; परंतु प्रत्येक ठिकाणी लागू होणारा ‘अति तिथे माती’ हा नियम इथेही लागू पडतो. काहीजण गोड पदार्थ आवडतात म्हणून प्रमाणाचा काहीच विचार न करता नेहमीच आणि खूप प्रमाणात खातात. परंतु गोड पदार्थ पौष्टिक असले तरी, पचायला जड असतात आणि पचनशक्तीवर विशेष ताण देणारे असतात. त्यामुळे  गोड पदार्थ योग्य प्रमाणात, माफक खाल्ले तरच उपयोगी पडतात अन्यथा नुकसान देतात.
प्रमाणाबाहेर आणि नियमित गोड पदार्थ खाल्ल्यानं वजन खूप वाढतं. शरीरात अवास्तव प्रमाणात मेद किंवा चरबी निर्माण होते. लवकर थकवा येणं, अतिप्रमाणात घाम येणं, मेदाचे इतर आजार जसे की मधुमेह, विविध प्रकारच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता वाढते.
 

गोडाचे फायदे मिळवायचे असतील तर..
 * कोणतेही दुष्परिणाम न होता गोडाचे फायदे मिळवायचे असतील तर गोड खाताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. आपण एरवीदेखील पाहतो की सणवार असताना किंवा कोणत्याही कार्यात गोडधोड जेवण केलं की भयंकर सुस्ती येते. काही काम सुचत नाही, कारण सगळी ऊर्जा गोड पचविण्यासाठी वापरली जाते. मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे गोड पदार्थ पचवायला विशेष क्षमता लागणार आहे हे गृहीत धरून आधीच काळजी घ्यावी. पहिलं म्हणजे आयुर्वेदानुसार इतर कोणत्याही रसाचे पदार्थ खाण्यापूर्वी गोड खावं म्हणजे त्याचं पचन होण्यासाठी चांगली ऊर्जा मिळेल. दुसरं म्हणजे पोट लवकर भरल्याची संवेदना येईल आणि पुढचं खाणं आपोआपच नियंत्रित होईल. यामुळे पचनशक्तीवरही ताण येणार नाही. गोड पदार्थाचं प्रमाणही आटोक्यात ठेवावं. उगीचच आठ-दहा जिलब्या, चार वाट्या बासुंदी अशा अचाट प्रमाणात गोड खाणं चुकीचंच आहे.
 * आपण पाश्चात्य देशांच्या ज्या चुकीच्या पद्धती घेतल्या त्यातली गोड खाण्याविषयीची आहे. ‘स्वीट डिश’ शेवटी खाण्यामुळे होतं काय की आधी इतर खाद्यपदार्थ मनसोक्त खाल्ले जातातच शिवाय मग काहीतरी गोड आणि वरून थंडगार आइस्क्र ीम अशा उलटसुलट क्र मानं पदार्थ खाल्ले जातात आणि पचनाची वाट लागते. जी पुढे दोन तीन दिवस त्रास देत राहाते.
*  दुसरं महत्त्वाचं प्रकृती जाणून खाणं आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना मुळातच पित्तशामक असे गोड पदार्थ मनापासून आवडतात आणि त्यांना त्याचा काही त्नास होत नाही कारण त्यांचा अग्नी तीक्ष्ण असतो आणि गोड शरीराला आवश्यक असतं. त्यामुळे त्यांना खूप वजन वाढणं वगैरे परिणामही जाणवत नाहीत. आपल्या आसपास अशा अनेक व्यक्ती आपण पाहतो की ज्यांना रोज काहीतरी गोडाचं खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही.

*  वात प्रधान व्यक्तींना त्यांच्या आवडीचे गोड चालतं; पण खूप प्रमाणात किंवा पाहिजेच असा आग्रह नसतो.
*  कफ प्रकृती व्यक्तींना मुळातच गोडापेक्षा तिखट, चमचमीत पदार्थ आवडतात पण यांनी थोडं जरी गोड नियमित खाल्लं तर लगेच वजन वाढणं,  स्थूलता हे परिणाम दिसू लागतात. म्हणूनच गोड खाताना आपली प्रकृती, आवड, गरज, शरीराची ठेवण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. 

हे चुकीचंच !
 

* साखर आणि मैदा हा मेळ सगळ्यात वाईट आहे. हा मेळ बेकरीच्या सगळ्या पदार्थांत असतो. त्यामुळे बिस्कीट्स, केक, पेस्ट्री, नानकटाई, मफिन्स हे अगदीच कमी खावेत. 
 * लहान मुलं जेवत नाहीत म्हणून सोपा उपाय म्हणून चार पाच बिस्किटं एकावेळी दुधात बुडवून त्याचा काला करून त्यांना खाऊ घालणं ही गोष्ट आपल्याकडे खूपच सामान्य आहे. पण हा गिचका पचायला जड होतो आणि बाळाच्या नाजूक पचनशक्तीवर अतिरेकी ताण येतो.
*  दूध फाडून बनवलेल्या पनीरपासून केलेल्या मिठाया (विशेषत: बंगाली पद्धतीच्या) या क्वचितच खाव्यात. त्या अपथ्यकर आहेत. 
 

ऋतूनुसार गोड

गोड पदार्थ ¬तूनुसार खावेत. होळीच्या दरम्यान थंडी संपून उन्हाळा सुरू होतो तेव्हा मार्च, एप्रिल महिन्यात शरीरातील कफ वितळून कफाचे आजार डोकं वर काढतात. अशा वेळी त्याचा त्रास होऊ नये म्हणून पुरणपोळी खायची पद्धत आहे. कारण हरभ-याची डाळ गुणानं रूक्ष असल्यानं कफ शोषून घेण्याचं काम करते. दिवाळीत केले जाणारे सगळे गोड पदार्थ, पक्वान्नं ही थंडीत निर्माण होणा-या रूक्षतेचा सामना करण्यासाठी उपयोगी पडतात. ते थंडीनं वाढणा-या वाताचा प्रतिबंध करतात. हीच गोष्ट तिळगूळ, गुळाच्या पोळ्या यांनाही लागू पडते. संक्रांतीच्या दरम्यान असणार्‍या बोच-या थंडीचा आणि तीव्र रूक्षतेचा प्रतिकार करायला तीळ आणि गूळ हे स्निग्ध आणि मधुर हा उत्तम मेळ उपयुक्त ठरतो.  आपले सणवार आणि  त्यावेळी बनवली जाणारी ठरावीक पक्वान्नं हेही शास्त्रीय विचारावर आधारितच आहेत. ऋतू, वय, प्रकृती यांचा विचार करून गोडाचा आस्वाद घेतल्यास त्याचे सगळे उत्तम फायदे आपण मिळवू शकतो.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

rajashree.abhay@gmail.com


Web Title: Do you want to avoid sweet?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.