Cloud Kitchen -- What is it? | क्लाउड किचन हे आहे काय?
क्लाउड किचन हे आहे काय?

-शुभा प्रभू साटम

क्लाउड किचन’. सध्या या गोष्टीचा जबरदस्त बोलबाला आहे. हे आहे तरी काय हा प्रश्न पडण्याआधी स्पष्ट करते की, क्लाउड किचन म्हणजे फक्त डिलिव्हरी देणारं किचन. त्याला ‘घोस्ट किचन’ असंही म्हणतात. प्रवास सेवा पुरवणारी उबर ही जी कंपनी आहे तिच्या मालकीची एकही टॅक्सी किंवा वाहन नाही. एअर बीएनबी म्हणून जे आहे त्याच्या मालकीचं एकही हॉटेल नाही. झोमॅटोचं एकही रेस्टॉरण्ट नाही. तरीही या कंपन्या कशा तुफान चालतात.
तसंच हे सेवा क्षेत्राचं नवीन रूप.
निव्वळ तंत्नज्ञान आणि समन्वय (कोलॅबरेशन) यातून. ‘क्लाउड किचन’नं नेमकं  तेच उचललं आहे.
एखादं रेस्टॉरण्ट किंवा हॉटेल काढायचं म्हटलं तर भक्कम गुंतवणूक असावी लागते, बरं तुमचं हॉटेल चालो अथवा बुडो, कर्मचारी पगार, जागेचं भाडं, वीज, पाणी असे खर्च अनिवार्य असतात. या धंद्यात फायदा जबरदस्त असतो; पण धोकेही मोठे असतात. परत हल्ली असणारी गर्दी, वाहतूक कोंडी, घरपोच अन्न पोहोचविणा-या  सेवा यामुळं निश्चितच हॉटेल व्यवसायावर परिणाम होतो. ग्राहक वेगवेगळ्या वृत्तीचे असतात. परत समाज माध्यमांवर वाईट रिव्ह्यू आले की बोंबला ! त्यामुळे हॉटेल चालवणं वाटतं तितकं सोपं नाही. मात्र याच टप्प्यावर आलंय क्लाउड किचन येतं. 

क्लाउड किचन नक्की चालतं कसं?
समजा एखादी अ व्यक्ती आहे, जी पोळीभाजी डबा देते किंवा बिर्याणी, कोरमा, डोसा, इडली, भाकरी जे आहे ते देते. तिच्याकडे क्षमता आहे ते पदार्थ करण्याची; पण तो पदार्थ खाऊ इच्छिणा-यापर्यंत पोहोचवणं शक्य नसतं. म्हणजे करता येतं; पण विकता येत नाही. मग ते काम क्लाउड किचन करतं.
क्लाउड किचनसारखं काम करू इच्छितात त्यांच्यासाठी अनेक अँप्स असतात, किंवा संकेतस्थळं असतात. त्यावर जाऊन नोंदणी करायची, आपले पदार्थ आणि दर सांगायचे की त्या ठिकाणी मग त्या व्यक्तीच्या पदार्थांची/व्यवसायाची जाहिरात केली जाते. यात पदार्थ, दरपत्रक, माहिती असते. थोडक्यात, मेनू कार्ड सारखं असतं ते. मग एखाद्याला अमुक एक पदार्थ हवाय की तो त्या अँपवर/संकेतस्थळावर जाऊन मागणी नोंदवतो, मग व्यावसायिकाला ती ऑर्डर जाते. आणि  ग्राहकाला त्याप्रमाणे कन्फर्मेशन, लागणारा वेळ, एकूण रक्कम याची माहिती येते. पदार्थ तयार झाला की तसं कळवलं जातं. मग अँपतर्फे त्यांचा माणूस तो पदार्थ उचलतो आणि ग्राहकापर्यंत पोहोचवतो.
फायदा कुणाचा नि कसा?
ग्राहकाकडून येणारे पैसे त्या व्यावसायिकांच्या खात्यात जमा होतात अथवा रोख दिले जातात.
आता यात अँपवाल्याचा फायदा काय?
पदार्थ जर समजा मूळ 100 रुपये असेल तर अँपवर त्याची किंमत 150 अशी जास्त दिली जाते. हे वरचे 50 रुपये आहेत तो अँपचा निव्वळ फायदा असतो.
हा अंदाज ढोबळ आहे अर्थात, फक्त क्लाउड किचनचं काम कसं चालतं याचा अंदाज येण्यासाठी हे  आहे. असं करण्यात केवळ अँपवाल्याचा नाही तर सगळ्यांचा फायदा असतो. पदार्थ तयार करणा-याला त्याचे पूर्ण पैसे मिळतात. तेही  जाहिरात न करता आणि पदार्थ न पोहोचवता. ग्राहकाला घरबसल्या पदार्थ मिळतो. अँपवाल्याला त्याचं कमिशन मिळतं. इंग्रजीत ज्याला ‘विन विन सिच्युएशन’ म्हणतात ती हीच.

क्लाउड म्हणायचं कारण हेच की हा सर्व कारभार तंत्रज्ञानावर आधारित आहे. झोमॅटो आणि स्वीगी हे त्याचे उत्तम उदाहरण. जयदीप बर्मन यांची रिबेल फूड ही सध्याची मोठी कंपनी. उबरचा सहस्थापक ट्रव्हीस कलनिक यांच्याकडून प्रेरणा घेऊन रिबेल फूड कार्यरत झालीय. अर्थात जिथं ऑर्डर घेऊन ती तशाच आटोपशीर अशा ट्रेमधून, काट्या चमच्यासोबत, अगदी टिशू पेपर देऊन ग्राहकाला पुरवली जाते. रिबेलचे स्वत:चे असे भारतभरातील 20 शहरात 235 किचन आहेत. शहराप्रमाणे, स्थानिक चवीनुसार डिश असतात. त्याशिवाय अनेक लहान कंपनी आणि अँप्सपण यात आहेत. ज्याचा फायदा छोट्या उद्योजकांना होतो.
अम्मी, काकू आणि ब-याचजणी
अंधेरी इथलं अम्मीज किचन ! इझ यूवर लाइफ आणि टास्क मित्र या कंपनीद्वारे अम्मीज किचनचे पदार्थ  मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात पोहोचवले जातात. इथून अस्सल घरगुती कोकणी मुस्लीम जेवण पुरवण्यात येतं, जवळची ऑर्डर असेल तर ती कुटुंबातील कोणी घेऊन जातं. दूरची असेल तर मग वरील आस्थापनांचा वापर होतो. सलमा आणि शबाना सलाउद्दीन या मायलेकी हे चालवतात. मेनूची माहिती व्हॉट्सअँप, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर दिली जाते. ग्राहक थेट फोन करून मागणी नोंदवू शकतात अथवा वर सांगितलेल्या मार्गानं. कोणतीही झिगझिग नसलेलं हे अम्मीज किचन म्हणजे छोटं क्लाउड किचनच आहे. अनेक जणांनी विशेषत: तरुणांनी स्टार्टअपच्या रूपानं असे क्लाउड किचन सुरू केलेलं आहे. ज्याद्वारे घरगुती उद्योजकांना भरपूर फायदा होऊ लागलेला आहे. कोथरूडमध्ये राहणा-या कोणी काकू सुरेख शाकाहारी मराठी पदार्थ करतात. कोणी क्लाउड किचनवाले ते हिंजवडीमधील आयटीवाल्यांपर्यंत पोहोचवतात. 

नवी मुंबईतील ऐरोली इथं असे अनेक छोटी-मोठी क्लाउड किचन्स आलेली आहेत. इथं केपजेमिनी, माइण्डस्पेस अशा अगडबंब आयटी उद्योगामुळे इथं छोटी-मोठी हॉटेल्स वाढलीत आणि अनेक घरगुती जेवण/पदार्थ देणारेसुद्धा, जे या क्लाउड किचनच्या माध्यमातून आपले ग्राहक मिळवतात.

कोणतीही स्थावर गुंतवणूक न करता, निव्वळ तंत्रज्ञानाद्वारे असा व्यवसाय फोफावू शकतो, नव्हे फोफावलाय. ज्यांच्याकडे कौशल्य असतं; पण भांडवल नसतं अथवा जाहिरात करण्याचं कौशल्य नसतं. आणि अनेक ग्राहक असतात ज्यांना घरी जेवणाचा पर्याय नसतो; पण जेवणासाठी बाहेर जायला आवडत नाही. अशा घटकांना क्लाउड किचन एकत्र आणून सर्वांचा फायदा करून घेतात. काही क्लाउड किचन स्वत:चं किचन स्थापून, तिथं पदार्थ करून पुरवतात. काही वेगवेगळ्या व्यावसायिकांना एकत्न आणून त्यांचा संपर्क थेट ग्राहकांशी करवून देतात. उद्दिष्ट साध्य होतं. काही क्लाउड किचनवर सोशल मीडियावर आजची डिश/पदार्थ/खास असे टाकले जातात. ग्राहक ते वाचून मागणी नोंदवतात. क्लाउड किचनमधला सगळा मामला पारदर्शक असतो. कोणाला काय? किती हवं? हे उद्योजकाला कळतं. तो ते पदार्थ तयार ठेवतो. क्लाउड कंपनीचा माणूस ते उचलतो आणि डिलेव्हरीला निघतो.
आपली ऑर्डर कुठं आहे? किती वेळ लागेल हे ग्राहक लाइव्ह ट्रॅकिंगद्वारा बघू शकतो, पैसे ऑनलाइन देता येतात अथवा डिलिव्हरी घेतेवेळी देता येतात.
 

हौशी गृहिणींना फायदा

रिबेल, झोमॅटो, स्वीगी, उबर, इट्स यांसारख्या मोठय़ा कंपनी आहेत आणि असंख्य लहान लहान आस्थापनापण आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक गृहिणींना त्याचा फायदा होतोय. स्मार्ट फोन सगळ्यांकडे असतातच. समाजमाध्यमांवर क्लाउड किचनबद्दल ऐकून अनेकजणी तिथं नोंदणी करतात. करार करतात आणि आपला व्यवसाय चालवतात. घरातून बाहेर न पडता किंवा फार मोठी गुंतवणूक न करता अनेकजणी घरगुती जेवण/खाणं-पिणं/मोठय़ा मेजवान्यांसाठी पदार्थ पुरवत आहेत. पुणे, मुंबई, डोंबिवली, ठाणे इतकंच काय; पण अगदी पनवेलमध्ये पण अशा गृहिणी/छोटे छोटे घरगुती उद्योग करत आहेत. त्यांना होम शेफस म्हटलं जातं. 
अत्याधुनिक तंत्रज्ञान काय कायापालट करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही क्लाउड किचन्स. खरं तर भारतात क्लाउड किचन ही पद्धत नवी नाही. फक्त तिथं नाक्यावरच्या हॉटेलमध्ये अथवा ठेलेवाल्याकडे ऑर्डर ओरडून, किंवा लहानग्या पोरासोबत लिहून पाठवली जाते. हे चित्रं पूर्वी सगळीकडेच होतं. तेव्हा अँप्स मात्न नव्हती आता ती आलीत.
आयुष्य कसं सुखाचं होतंय. नाही का?

------------------------------------------------------------------------

 नोंदणी, मागणी आणि पुरवठा
*  क्लाउड किचनद्वारा सर्वेक्षण करून ग्राहक निश्चित करण्यात येतात. *  त्यांच्या गरजांवर आधारून मग एकूण संरचना ठरवण्यात येते.
 पुरवठादार शोधण्यात येतात.
*  या सर्वांना जोडून फायदेशीर व्यवसाय कसा करता येईल याच्या संदर्भात अल्गोरिदमच्या आधारे आखणी होते.
 * क्लाउड किचन चालवणारी कंपनी/लोक/समूह संकेतस्थळ/अँप निर्माण करतात.
*  त्याची जाहिरात होते.
* इथं ग्राहक आणि पुरवठादार दोघेही नोंदणी करू शकतात.
 * समजा अमुक एक प्रकारच्या खाण्याची मागणी जास्त आहे असं आढळून आल्यास मग अधिक पुरवठादार शोधण्यात येतात.
*  पुरवठादार आणि कंपनी यांच्यात कायदेशीर करार होतो.
 *ग्राहकाला तसं काही बंधन नसतं. पण अनेकदा लॉयल्टी पॉइण्ट्स मिळतात.
 याच अँपद्वारा मग काय काय? कोणत्या किमतीला मिळणार? असं प्रसिद्ध केलं जातं.
 * आधी नोंदणी करणा-या ग्राहकांना सवलत मिळते.
 * नोंदणी केली की मग कंपनीतर्फे माल उचलून पुरवला जातो. 
*  प्रत्येक कंपनीची पैसे देण्याची पद्धत वेगवेगळी असते. क्लाउड किचन म्हणजे सगळा तंत्रज्ञानावर आधारलेला कारभार आहे.

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास  असणा-या लेखिका मुक्त पत्रकार असून, स्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)   shubhaprabhusatam@gmail.com


Web Title: Cloud Kitchen -- What is it?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.