Lokmat Sakhi >Beauty > स्किनिमलिझम- २०२१चा सगळ्यात मोठा ब्युटी ट्रेंड, जो म्हणतो हू नीड्स मेकअप!

स्किनिमलिझम- २०२१चा सगळ्यात मोठा ब्युटी ट्रेंड, जो म्हणतो हू नीड्स मेकअप!

चेहऱ्याला गरजच काय मेकअपची, हवेत कशाला फाउंडेशन आणि बीबी क्रिमचे लेअर्स? असं विचाणारा एक भन्नाट ट्रेंड.

By madhuri.pethkar | Published: March 9, 2021 02:28 PM2021-03-09T14:28:43+5:302021-03-09T15:20:37+5:30

चेहऱ्याला गरजच काय मेकअपची, हवेत कशाला फाउंडेशन आणि बीबी क्रिमचे लेअर्स? असं विचाणारा एक भन्नाट ट्रेंड.

Skinmalism - The Biggest Beauty Trend of 2021, Who Says Who Needs Makeup! | स्किनिमलिझम- २०२१चा सगळ्यात मोठा ब्युटी ट्रेंड, जो म्हणतो हू नीड्स मेकअप!

स्किनिमलिझम- २०२१चा सगळ्यात मोठा ब्युटी ट्रेंड, जो म्हणतो हू नीड्स मेकअप!

Highlightsस्किनिमलिझम हा ट्रेंड मेकअप आणि त्वचेची काळजी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, असं मानत नाही. तर त्वचेची काळजी म्हणजेच मेकअप असं म्हणतो.मेकअप हा दोष झाकण्यासाठी नसावा हे स्किनिमलिझमचं तत्व आहे. आवश्यक तेवढीच साधनं वापरा हा मिनिमलिझमचा मंत्र तोच स्किनिमलिझमचाही. या मंत्राचा अवलंब केल्यास मूळ गरजांवर लक्ष केंद्रित केलं जातं.

-माधुरी पेठकर

साई पल्लवी माहितीचेना, ती मेकअप न करता सिनेमात काम करते याची किती चर्चा. पुन्हा ती मेकअप न करताही सुंदरच दिसते. आता हा मेकअप न करण्याचा एक नवा ट्रेंड स्किनिमलिझम. हा शब्द ऐकलाय. तो सध्या भारी चर्चेत आहे. सौंदर्याच्या जगातला सध्या सगळ्यात मोठा ट्रेंड आहे. पिनरेस्टसारख्या साइट्सने २०२१ चे जे ट्रेंड सांगितले त्यात हा स्किनिमलिझम मोठा ट्रेंड करतो आहे. तर आता प्रश्न असा की, हा ट्रेंड आणि शब्द नक्की आहे काय?               

 

स्किन मिनिमलिझम = स्किनिमलिझम. 

म्हणजे काय तर एरव्ही चेहऱ्याला पावडर आणि डोळ्यात साधी काजळाची रेष, ओठावर लिपस्टिकची रेषही ज्यांनी लावली नाही त्यांची टर उडवली गेली पण आता कोरोनोत्तोर काळात मात्र हा नवा ट्रेंड हेच सांगतो आहे की, आता त्वचेवर मेकअपची पुटं नको. त्वचेवर मिनिमम गोष्टी लावणं हीच नवी रीत.
त्याचं कारण असं की कोरोनाच्या काळात जगभरात ‘मिनिमलिझम’ या ट्रेण्डला चालना मिळाली. मिनिमलिझम ही जगण्याची एक पद्धत आहे. कमीत कमी आणि आवश्यक तेवढ्याच साधनांचा वापर करत जगायचं. सहज, साधं आणि शांत जगायचं. अर्थात कोरोनापूर्वीच जगात काहीजणांनी मिनिमलिझमचा हात धरुन जगण्याच्या पद्धतीत प्रयोग करुन बघायला सुरुवात केली होती. पण कोरोना काळापासून त्याची जास्त चर्चा व्हायला लागली. आज कपड्यांपासून तर प्रवासापर्यंत अशा जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात मिनिमलिझमचे प्रयोग होत आहेत. मिनिमलिझमची चर्चा होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्किनिमलिझमची चर्चा होऊ लागली. कमीत कमी साधनांचा वापर करत छान दिसा. आपल्या ड्रेसिंग टेबलावर मेकअपच्या उत्पादनांचा जो किचाट झाला आहे त्याला आवरा. काय लागतंय तेवढंच आणा आणि वापरा असं म्हणत स्किनिमलिझम या नवीन प्रयोगाचे दार उघडले गेले आहे.


स्किनिमलिझम म्हणजे काय?
 स्किनिमलिझम हा केवळ सौंदर्योपचारातला प्रयोग नाही तर ते एक तत्त्वज्ञान आहे. जे आहे ते सांभाळून,त्याचं संवर्धन करुन नैसर्गिकरित्या छान दिसण्याचं तत्त्वज्ञान. याचा अनुभव अनेकांनी कोरोनानं निर्माण झालेल्या परिस्थितीत घेतला. बाहेर जायचं नाही , घरात बसूनच काम करायचं आहे, काही कार्यक्रम नाही, पार्टी वगैरे काही नाही मग कशाला हवाय मेकअप म्हणत अनेक महिलांनी, मुलींनी रोजच्या लूकसाठी काही बेसिक गोष्टी वापरल्या. आणि थोड्या काळानं त्यांचं त्यांनाच लक्षात आलं. अरे आपला हा लूक आपल्या लक्षातच आला नाही. किती छान दिसतोय आपण. एकदम ओरिजनल आणि नॅचरल. मग अनेकींनी नो फेक, नो मेकअप लूक म्हणत आपले विना मेकअपचे फोटो सोशल मीडियावर टाकले. हा जो नॅचरल लूक तेच तर स्किनिमलिझिम आहे. अर्थात न ठरवून केलेलं. पण जे सहज झालं ते आता यापुढे सरावाचं आणि सवयीचं होणार असं हा स्किनिमलिझम ट्रेंड म्हणतो.

न्यू ग्लो अप

स्किनिमलिझम हा ट्रेंड मेकअप आणि त्वचेची काळजी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, असं मानत नाही. तर त्वचेची काळजी म्हणजेच मेकअप असं म्हणतो. सौंदर्याच्या मागे पळणं हे खरंतर मृगजळासारखं आहे. खूप थकवणारं आणि शेवटी निराशा, असमाधान आणि पश्चाताप देणार आहे. स्किनिमलिझम हा ट्रेंड सुंदर दिसण्यासाठी खूप पायऱ्या चढण्याची दमछाक करत नाही. किचकट कृती सांगत नाही आणि सुंदर दिसण्याची घाईही करत नाही. तर हळूहळू सौंदर्य खुलवतं आणि त्वचेचा पोत उत्तम करतं. त्वचा नैसर्गिकरित्या चमकायला लागते . त्वचा सुंदर करणं आणि चेहेऱ्यावरची चमक कायमस्वरुपी टिकून राहाणं हा स्किनिमलिझमचा मूळ उद्देश्. मेकअपचे शंभर प्रोडक्ट वापरुन जो तजेला मिळत नाही तो स्किनिमलिझम जुजबी साधनातून मिळवून देतो. त्वचेचा हा ‘न्यू ग्लो अप’ स्किनिमलिझमचं मुख्य वैशिष्ट्य आहे.


लेस इज मोअर

फॅशन इंडस्ट्री आणि सौंदर्य शास्त्रानुसार कमी गोष्टी जास्त प्रभावीरित्या काम करतात. कमी वेळात, कमी साधनात सौंदर्य हे स्किनिमलिझमचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कोरोनानंतर स्किनिमलिझम या ट्रेंडची चर्चा झाली ती या कारणानं. सुंदर दिसण्यासाठी जास्त उत्पादनं वापरण्याची गरज नाही. वेळ घालवण्याची आणि पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. अनेक थरांचा मेकअप चढवून सुंदर दिसण्याच्या अवघड मार्गाला स्किनिमलिझम ट्रेंडमध्ये अजिबात स्थान नाही. जे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच करा , घरातल्या गोष्टींचा वापर करत त्वचेची काळजी घ्या या सहज साध्य होतील आणि प्रभावी परिणाम करतील अशाच गोष्टी स्किनिमलिझमच्या ट्रेंडमध्ये महत्त्वाच्या आहेत.

एम्ब्रॉसिंग फ्लॉज

मेकअप हा दोष झाकण्यासाठी नसावा हे स्किनिमलिझमचं तत्व आहे. त्वचेची काळजी घेण्यापेक्षाही मेकअपनं त्वचेवरचे दोष झाकण्यासाठीच सगळी धावपळ होते. पण हा ट्रेंड म्हणतो की त्वचेचे दोष मेकअपने झाकून आपण आपल्या अडचणीच वाढवून घेतो. त्यामुळे मेकअपच्या थराखाली दोष झाकण्यापेक्षा दोषांवर लक्ष केंद्रित करुन तेवढेच उपाय केले तर दोषही जातात आणि हेवी मेकअपपासून त्वचेला दूर ठेवल्यास त्वचेचं संरक्षण होतं. लपवाछपवी करुन दोष लपतात जात मात्र नाही. आता लपवाछपवीपेक्षा मूळ दोषावर काम करण्याची अनेकींची तयारी आहे.
बेअर इसेन्शिअल
आवश्यक तेवढीच साधनं वापरा हा मिनिमलिझमचा मंत्र तोच स्किनिमलिझमचाही. या मंत्राचा अवलंब केल्यास मूळ गरजांवर लक्ष केंद्रित केलं जातं. साधनं कमी लागतात. त्यामुळे पैसे वाचतात तसंच पर्यावरणही सुरक्षित राहातं.

 

स्किनिमलिझम काय करायला सांगतं?

- ब्यूटी प्रोडक्टसचा फापट पसारा कमी करा.
- आपल्या त्वचेची नेमकी गरज काय आहे ते ओळखून फक्त त्यानुसार ब्यूटी प्रोडक्ट्स वापरा.
- मेकअपच्या थराखाली मूळ त्वचा झाकली जाते. त्वचेची स्वत:हून बरं होण्याची, समस्यांशी दोन हात करण्याची ताकद संपते. म्हणून चेहऱ्यावर मेकअपचे थरावर थर न देता त्वचेला मोकळा श्वास घेण्याची उसंत द्या.


त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. केतकी गोगटे सांगतात..

१. सौंदर्यासाठी अगदी मूलभूत आणि आवश्यक तेवढ्याच गोष्टी वापरा हा स्किनिमलिझमचा मूळ गाभा अगदी योग्य आहे. सध्या जाहिरातींचा प्रभाव इतका असतो की त्याला भुलून प्रोडक्टस खरेदी केले जातात. ऑनलाइन मागवले जातात. ते आले आणि एक दोनदा वापरुन बघितले की त्यावरचं मन उठतं. हे प्रोडक्ट तसेच पडून राहातात. मग आणखी नवे वापरुन पाहावेसे वाटतात. त्याचाही हवा तो परिणाम त्वचेवर जाणवत नाही. आणि मग लक्षात येतं की या उत्पादनांमुळे आपली चांगली त्वचा खराब झाली. सध्या हे अनेकींच्या बाबतीत होत आहे. वेळ जातो, पैसे जातात आणि पश्चाताप होतो. यातून वाचण्याचा आणि त्वचा मुळापासून खुलवण्याचा स्किनिमलिझम ट्रेंड हा योग्य पर्याय वाटतो.
२. अंदाधुंद पद्धतीने सौंदर्य उत्पादनं वापरल्याने , मेकअपचे थर चढवल्याने त्वचा खराब होते. उत्पादनांची ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे चेहेऱ्यावर रॅश येणं, मुरुम , पुटकुळ्या येणं, त्वचेवर डाग पडणं या नवीन समस्या उदभवतात.
३. मॉश्चरायझर ही त्वचेची मूलभूत गरज असते. त्यामुळे चांगल्या प्रतीचं मॉश्चरायझर वापरावं.
४. आपल्या देशात आपण घरात जरी असलो तरी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात उन्हाचा चटका आपल्याला बसतोच. त्यामुळे सनस्किन क्रीम लावणं आवश्यक ठरतं. घरात आपण गॅसजवळ उभं राहून काम करतो किंवा मग जास्तीत जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर बसतो तेव्हा त्या उष्णतेचा त्रास आपल्या त्वचेला होतोच. म्हणून घरात असलो तरी सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे.
५. त्वचा नीट स्वच्छ होण्यासाठी क्लिंजरची गरज असते.
६. फळांचा, भाज्यांचा रस चेहऱ्याला लावणं या घरगुती उपायांनी त्वचा चांगली होते. पण म्हणून तो रोज लावावा असं नाही.
७. त्वचेला रोज तीळ तेलाचा मसाज केल्यास कमी प्रयत्नात त्वचा चांगली होते.
८. आपली त्वचा कशी आहे ओळखता येणं आणि त्यानुसार प्रॉडक्ट वापरणं हे आवश्यक आहे.
९. आवश्यक असेल तर त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

१०. मेकअपची अनेकींना सवय असते. त्यामुळे स्किनिमलिझम ट्रेंड पाळतोय म्हणून अजिबातच मेकअप करायचा नाही असं नाही. कमीत कमी आणि गरजेपुरतीच साधनं वापरुनही बेसिक मेकअप होऊ शकतो. त्यासाठी कमीत कमी उत्पादनं पण चांगल्या प्रतीची हा नियम महत्त्वाचा.
११. स्किनिमलिझमचा ट्रेंड फॉलो करायचा झाल्यास क्लिंजर, मॉश्चरायझर, सनस्क्रिन, अँटिएजिंग आणि बेसिक मेकअपची साधनं बस्सं इतक्याच गोष्टींची गरज आहे.
१२. यामुळे वेळ वाचेल. शिवाय आपल्याला हवा तो परिणाम त्वचेस मिळेल. त्वचा खराब होणार नाही आणि आरशात स्वत:चा चेहरा बघून आपलं आपल्यालाच छान वाटेल.

 

 

 

 

Web Title: Skinmalism - The Biggest Beauty Trend of 2021, Who Says Who Needs Makeup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.