थंडीत ओठ सुकणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे, पण त्यातून निर्माण होणारा त्रास आपण नकळत वाढवत जातो. थंडीची कोरडी हवा, कमी पाणी पिणे, सूर्यकिरणांचा परिणाम, धूळ आणि थंड वारा या सगळ्यामुळे ओठांवरील नैसर्गिक तेल कमी होते.(Lips will crack in the cold, but avoid these mistakes to prevent bleeding, your lips will remain soft and pink.) सुरुवातीला हलकी सुकलेली त्वचा दिसते, पण आपल्या काही चुकीच्या सवयी ही समस्या अधिक गंभीर करतात.
सर्वात पहिली सवय म्हणजे ओठ चावणे आणि त्यावर सतत जीभ फिरवणे. आपल्याला वाटते की जीभ फिरवल्याने ओलावा मिळतो, पण उलट लाळ त्वचा आणखी कोरडी करते. लाळ ओठांवर पसरली की ओठांवरील नैसर्गिक ओलावा कमी करते. ओठ तात्पुरते ओले दिसतात. ओठ चावल्याने त्यांची नाजूक त्वचा फाटते, ज्यातून रक्तही येते आणि वेदना वाढतात. सतत हात लावणे तसेच निघालेली त्वचा काढणे दात फिरवणे यामुळे त्रास अधिकच खोल होतात.
थंडीत घरातील हीटरची कोरडी हवा आणि बाहेरचे थंड वारे दोन्ही ओठांवर ताण आणतात. दिवसभर पाणी कमी प्यायल्याने शरीरातील ओलावा घटतो आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम ओठांवर दिसतो. काही वेळा आपण वापरत असलेली स्वस्त किंवा अतिसुगंधी लिपस्टिक, लिपग्लॉसही त्वचा अधिक कोरडी करू शकतात. सूर्यप्रकाशाचाही परिणाम ओठांवर होतो, पण आपण साधारणपणे त्यांच्यावर सनप्रोटेक्शन लावत नाही.
यामुळे ओठ फक्त सुकत नाहीत तर फुटतात त्यातून रक्त येणे, काळेपणा वाढणे, सतत जळजळ अशा समस्या निर्माण होतात. काही लोक गरम चहा किंवा कॉफीने ओठ ओले करण्याचा प्रयत्न करतात, पण तापमानातील बदलामुळे त्वचेची संवेदनशीलता आणखी वाढते. तसेच गार काही लागणेही वाईटच. त्यामुळे असे काही उपाय करु नका.
अशावेळी काही साधे पण महत्त्वाचे नियम मोठा फरक घडवतात. सर्वात आधी ओठ चावण्याची सवय थांबवणे, जीभ फिरवणे टाळणे हे महत्त्वाचे. पुरेसे पाणी पिणे, जेवणात तूपासारखे नैसर्गिक ओलावा देणारे पदार्थ घेतल्यास फायदा होतो. बाहेर जाताना ओठांना थंडी, धूळ आणि सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारा साधा लिपबाम उपयुक्त ठरतो. बदाम तेल ओठाला लावणे तसेच गुलाब पाणी लावणेही फायद्याचे ठरते.
थोडक्यात, ओठ सुकणे ही फक्त थंडीची समस्या नाही, आपल्या दररोजच्या लहान चुका ही समस्या वाढवत असतात. त्यांना ओळखून योग्य काळजी घेतली तर ओठ पुन्हा मऊ, निरोगी राहतात.
