avoid dryness in winter, oil massage will help you to be happy & healthy | सगळं  कोरडं , रुक्ष  झालंय  म्हणता ? मग  थंडीत  या  तेलांची  स्निग्ध  मदत  बघा  काय  जादू  करते !
सगळं  कोरडं , रुक्ष  झालंय  म्हणता ? मग  थंडीत  या  तेलांची  स्निग्ध  मदत  बघा  काय  जादू  करते !

ठळक मुद्देनुस्तं खा खा खाऊन तब्येत सुधरत नाही.

सखी  ऑनलाईन  टीम 

आरोग्याच्या दृष्टीनंही हिवाळा हा उत्तम ऋतू आहे. बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या, फळं यांची रेलचेल असते. खाण्याचा आनंद  लुटता येईल अशी शरीराचीही सोबत असते. कारण या काळात पचनशक्तीही उत्तम असते. जे खाल ते पचवाल अशी स्थिती असते. हिवाळ्यात आरोग्य कमवायचं असतं असं म्हटलं जातं. पण हे आरोग्य कमावण्यासाठी काहीही खाऊन चालत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतं खाऊनही आरोग्य कमावता येत नाही.  खास हिवाळा म्हणून आरोग्याचा विचार करताना पौष्टिक आहार आणि  अभ्यंग याचं सूत्र सांभाळावं लागतं.

हिवाळ्यात नक्की काय खाल?


 * या ¬तुत शरीरात कोरडेपणा निर्माण होतो. शरीरातली स्निग्धता नैसर्गिकपणे वाढावी यासाठी आयुर्वेदात मुद्दाम तळलेले पदार्थ खाण्यास सांगितले आहेत.उडीद, डिंक, बदाम, काजू, भरपूर तूप अशा स्निग्ध पदार्थाचा लाडूही याकाळात केला जातो.
* ज्याप्रमाणे पोटातून भरपूर स्निग्ध पदार्थ घेतले जातात. तसेच बाहेरुनही स्निग्धता आवश्यक असते म्हणून तर अभ्यंग केला  जातो. पण हा अभ्यंग केवळ दिवाळीत चार दिवस करायचा नसून चार महिने म्हणजे संपूर्ण हिवाळ्यात करणं अपेक्षित आहे.

अभ्यंग, मसाज आणि उटणं


1) अभ्यंगासाठी तिळाचं तेल सर्वात उत्तम तेल आहे. ते  जाड, बारीक, लहान मोठे, सर्वाना चालतं. 
2)  याच तेलात रक्तचंदन, वाळा, बला, पिंपळलाख टाकून उकळून गाळून घेऊन हे तेलही अभ्यंगासाठी वापरता येतं. बारीक लोकांना, थकवा येत असल्यास हे तेल अवश्य वापरावं.
3) मोहरीचं तेलही या ऋतूत वापरतात. फक्त पित्तप्रकृतीच्या लोकांनी हे तेल जपून वापरावं. उत्तरेकडे तर केसांसाठी,मसाजसाठी, आणि खाण्यासाठीही हेच तेल वापरतात.
4) खोबरेल तेल मात्र या ऋतुत वापरु नये. या शिवाय ऑलिव्ह ऑईल किंवा बदाम तेल, अक्रोड तेल अशी मिश्र तेलंही वापरता येतात. 
5) तेल वापरतांना त्यात भेसळ नाही ना हे  अवश्य बघावं.  तेल  शक्यतो ब्रॅण्डेड आणि सिलबंद घ्यावं. एखाद्या तेलाची अ‍ॅलर्जी झाल्यास म्हणजे खाज आल्यास किंवा त्वचा लाल झाल्यास ते बंद करावं. यासाठी वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

मसाज करताना काय काळजी घ्याल?


* मसाज करतांना तेल वरुन खाली या दिशेनं लावावं.  वेदना असतांना खालून वर या पद्धतीनं तेल लावावं. मसाज करवून घेतांना सहन होईल इतकाच दाब द्यावा. अन्यथा त्यामुळे अंगदुखी सुरु होते. 
* अभ्यंग केलं असेल तरंच उटणं वापरावं. कारण उटण्यामुळे  त्वचेवरील अतिरिक्त तेल काढलं जातं. अन्यथा त्वचा अजून रुक्ष होते.
*  डाळीचं पीठ आणि  हळद ही रुक्ष द्रव्यं आहेत. भरपूर तेल लावलं असेल तरंच ही द्रव्यं वापरावी.
* थंडीत नियमित अभ्यंग केलेला चालतो. किमान आठवडय़ातून दोन वेळा किंवा एकदा तरी अभ्यंग करावाच.
 * थंडीत साबणाचा वापर कमी करावा. आंघोळीच्या  पाण्यात चमचाभर तेल टाकून ते पाणी अंगावरुन घ्यावं.  यासाठी सुगंधी तेल वापरलं तरी चालतं.
 

Web Title: avoid dryness in winter, oil massage will help you to be happy & healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.