Atharvade: A unique recipe from Soyabean | सोयाबीनचे आथरवडे:- एक आगळीवेगळी भाजी
सोयाबीनचे आथरवडे:- एक आगळीवेगळी भाजी

-सुनिता मेंडूलकर, वरोरा

खेड्यात ज्यांच्याकडे शेती आहे ते सोयाबीन, चणे, तुरी यांची डाळ करतात. ती करताना चाळल्यावर खाली बारीक डाळीचे तुकडे  (कणी) राहाते. माझी आजी ती कणी टाकून द्यायची नाही. 

त्या कणीची ती भाजी करायची. ही भाजी करणं सोपं काम नाही; पण कोंड्यांचा मांडाही छान लागतो, याची शिकवण आजीनं आम्हाला त्या भाजीद्वारे दिली होती. आजही ती शिकवण लक्षात आहे. 

 

आथरवडे
 

साहित्य :   1 पेला सोयाबीनच्या डाळीचा कळणा (कणी), पाव किलो कोणत्याही डाळीची बारीक कणी, 10 हिरव्या मिरच्या, एक छोटा तुकडा अद्रक, 2 छोटे चमचे जिरे, 2 वाटी कोथिंबीर, कढीपत्ता, दोन चमचे ओवा, दोन चमचे तीळ, मीठ, हळद, तिखट, तेल, एक कांदा, दोन टमाटे आणि एक तुकडा खोबरं. 
 

कृती :
 प्रथम डाळीची कणी भिजत घालावी. साधारण एक तास ती भिजल्यावर धुवून घ्यावी. त्यातून कोंडा काढून ती चाळणीत निथळत ठेवावी. थोडी कोरडी झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावी.  वाटतानाच त्यात मिरची, अद्रक, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता घालावा. ते वाटणं एका परातीत घेऊन त्यात हळद, मीठ, थोडं तिखट घालून ते हलक्या हातानं एकत्र करावं. 
त्यात एक मोठा चमचा गरम तेलाचं मोहन टाकावं. 
त्यानंतर या मिश्रणाचे इडलीपात्रात बसतील त्या आकाराचे चपटे गोळे करून ते इडलीपात्रात ठेवावे. हे गोळे दहा-पंधरा मिनिटं वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर ते काढून घ्यावेत.

एका कढईत दोन मोठे चमचे तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी, फोडणीत चिरलेला कांदा, टमाटे, कढीपत्ता घालून तेल सुटेपर्यंत मिश्रण शिजू द्यावं. कांदा, टमाटा, खोबरं यांची ग्रेव्ही करूनसुद्धा फोडणीत घालता घेते. 

त्यात थोडे भाजलेले शेंगदाणे, तिखट, हळद, मीठ, धने-जिरे पूड, दोन तेजपान टाकावीत. मिश्रण सारखं हलवत राहावं. तेल सुटल्यावर त्यात साधारण तीन पेले किंवा अंदाजानुसार गरम पाणी घालावं.  पाण्याला उकळी आली की त्यात मीठ टाकून वाफवलेले वडे सोडावे. वडे 10 मिनिटं उकळू द्यावेत. गॅस बंद करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, खोब-याचा कीस घालावा. 
वाफवलेले वडे पाण्यात न सोडता खायलाही छान लागतात.


Web Title: Atharvade: A unique recipe from Soyabean
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.