Ashwani Bhave is telling the story of her role which she play behind of camera in Live News Cast project in Crocker Middle School of Hillsborrow In America | अश्विनी भावे सांगता आहेत मुलांच्या शाळेत त्यांनी 'लाइव्ह न्यूज कास्ट' या प्रोजेक्टमध्ये केलेल्या कॅमे-यामागच्या भूमिकेची गोष्ट.
अश्विनी भावे सांगता आहेत मुलांच्या शाळेत त्यांनी 'लाइव्ह न्यूज कास्ट' या प्रोजेक्टमध्ये केलेल्या कॅमे-यामागच्या भूमिकेची गोष्ट.

-अश्विनी भावे


गुडूप अंधार ! समोर फक्त एक बारीक लाल दिवा लुकलुकत होता. दहा.. नऊ.. आठ.. सात.. सगळं एकदम चिडीचूप ! माझ्या हृदयाच्या ठोक्यांनी शांतता भंगेल याचं भय माझ्या मनात. शांततेलासुद्धा आवाज असतो म्हणतात ते का, हे आता कळलं. काउण्टडाउन संपला. हळूहळू उजेड झाला. हलक्या संगीताच्या सुरावर मी कविता म्हटली आणि निवेदन सुरू केलं.

- मी वरळीला दूरदर्शनच्या स्टुडिओत लाइव्ह ‘गजरा’ सादर करत होते. कार्यक्रम आणि निवेदन दोन्हीही छान झालं; पण त्या काउण्टडाउनचा मात्र मी धसका घेतला आणि पुढे टीव्हीवर लाइव्ह निवेदन कटाक्षानं टाळलं.

आज-काल ब-याचदा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्हीवरच्या न्यूज अवरमध्ये सहभागी व्हावं लागतं. त्यातल्या बातम्या मला द्यायच्या नसल्या तरी  अँँकरपेक्षा मलाच जास्त धाकधूक. आजही दहा, नऊ, आठचा  काउण्टडाउन सुरू झाला की माझ्याच हृदयाच्या ठोक्यांचा आवाज त्या अँँकरला ऐकू तर जात नसेल ना अशी शंका मनात येते.

..आज इतक्या वर्षांनी काउण्टडाउन तोच होता; पण मी अमेरिकेतल्या माझ्या गावात होते, जागा वेगळी होती आणि कॅमे-यासमोर सातवीचे विद्यार्थी होते. ‘हिल्सबोरो’मधलं क्रॉकर मिडल स्कूल. या आमच्या शाळेतला एक मोठा वर्गच त्यांनी अद्ययावत स्टुडिओ बनवून टाकला होता. मी आणि माझी मैत्रीण कंट्रोल रूममध्ये उभ्या होतो. समोरच्या काचेतून दोन मुलं आणि एक मुलगी ख्रिसमसच्या टोप्या घालून स्टुडिओत बसल्याचं दिसलं. उजव्या बाजूला ग्रीन स्क्रीन समोर एक मुलगी छत्री आणि स्किइंग पोलसारखी प्रॉप्स घेऊन होती.. ती हवामानाचा अंदाज सांगणारी ‘वेदर गर्ल   असावी ! कंट्रोल रूममध्ये ट्रॉय होता. या मुलांचा देखणा, निळ्या डोळ्यांचा शिक्षक ! त्याने खुणेनं दोन मिनिटं असल्याचं सांगितलं. त्याबरोबर अँँकर्सने माईक चेक केले, मिक्सिंग बोर्डवर बसलेल्या मुलाने साउण्ड लेव्हल्स शून्यावर आणल्या, टेली प्रॉम्पटरचा फॉण्ट सेट केला गेला, न्यूज शोचे ग्राफीक सेट, कॅमेरावरची मुलं सज्ज, कंट्रोलरचं कॅमेरा वनच्या स्वीचवर बोट.

ट्रॉयने हेडफोन अडकवले आणि म्हणाला, ‘ट्वेंटी सेकेंड्स टू गो ! टेन सेकेंड्स टू गो ! टेन, नाइन, ऐट, सेवेन. स्टॅण्ड बाय कॅमेरा वन..’

- माझी धडधड वाढली. मी मैत्रिणीचा हात दाबला.

थ्री, टू, वन.. गो ! 

अख्ख्या क्रॉकर मिडल स्कूलमधली मुलं हे लाइव्ह न्यूज  कास्ट पाहात होती.
न्यूज कास्ट संपला तशी हसून ट्रॉय म्हणाला, ‘रोजच ती वर्गाचा भाग म्हणून लाइव्ह शो करतात. त्यामुळे मुलं सरावली आहेत. पण तुझ्या पुढय़ात कठीण काम आहे. कारण पाचवीची मुलं हे प्रथमच करतील. गुड लक !’

- ‘हिल्सबोरो’मधलं क्रॉकर मिडल स्कूल ही माझ्या मुलांची शाळा. इथे अमेरिकेत पालकांचा शाळेच्या कामात सहभाग असतो. आपल्याकडे असलेली कौशल्यं वापरून मुलांना वेगळा अनुभव देण्यासाठी पालकांना संधी असते. मी माझ्या मुलांच्या शाळेत अशा वेगवेगळ्या भूमिका अतिशय मन:पूर्वक निभावल्या. त्यातलाच हा एक प्रोजेक्ट    होता : मुलांचं लाइव्ह न्यूज कास्ट !

माझ्या प्राथमिक शाळेत पाचवीच्या मुलांसाठी  ‘लीडरशिप’ हा खास ऐच्छिक विषय होता. त्यात मैदानावरची मुलांची भांडणं सोडवणं, वाचनालयातली पुस्तक लावणं, शिक्षकांचे मदतनीस म्हणून रोज ध्वजवंदन करणं अशी बरीच कामं मुलं करत. मुलांच्या मनात शिस्त आणि जबाबदारीचं बीज रुजवणं हा त्यामागचा उद्देश ! या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणजे  ‘न्यूज कास्ट’. संभाषणाचं कौशल्य आणि सादरीकरणातली धीटाई मुलांमध्ये यावी हा त्यामागचा हेतू ! या कामाची व्याप्ती नियोजनाचा कस लागेल अशीच ! कामाच्या दोन अटी, एक म्हणजे संपूर्ण कारभार फक्त मधल्या सुट्टीदरम्यान करायचा, जेणेकरून शिकवण्याच्या तासातला वेळ जाणार नाही आणि दुसरं म्हणजे सर्व कामं मुलंच करणार ! 

म्हणजे, विषय मुलांचे, लिखाण त्यांचंच आणि पेशही तेच करणार !! मी पालक म्हणून फक्त मार्गदर्शन आणि नियमन करणार. थोडक्यात, माझं व्यक्तिगत व्यावसायिक आयुष्य कॅमे-यासमोरच गेलं असलं तरी तिथे मी जे जे कधी केलेलं नव्हतं, तेच मला इथे अमेरिकेत माझ्या मुलांच्या शाळेत करायचं होतं. माझ्या व्यावसायिक आयुष्यात नियोजनाचं काम सदैव माझ्या सेक्रेटरीनेच केलेलं आणि बाकी घरच्या आघाडीवरच्या गोष्टी सांभाळायला सतत माझी आई माझ्याबरोबर ! त्यामुळे नियोजनाचा वकुब माझ्यात कमीच. 

आणि त्यातून पाचवीच्या वयातल्या लहान मुलामुलींबरोबर काम करायचं हे आणखी कठीण ! सगळ्या गोष्टी त्यांच्या कलाने घ्यायच्या, त्यांचे मूड सांभाळून काम करायचं, ते वेळेत होईल असं पाहायचं अणि कमी वेळेत काम पूर्ण करून डेडलाइनही सांभाळायची. हे अगदीच सोपं नव्हतं.

.. पण जे येत नाही ते शिकण्यातच खरी गंमत आहे.

म्हटलं, सुरुवात तर करू!

जुळून येईलच आणि जमेलच पुढे सगळं. हा प्रोजेक्ट माझ्या हाती आला, तोही समारंभपूर्वक ! समारंभ म्हणजे या आधी जे कुणी पालक ही जबाबदारी बघत असतील, त्यांनी रीतसर सगळी माहिती देऊन पुढच्या पालकांकडे जबाबदारी सोपवायची !

आजही ‘सुझी’च्या घरची हॅण्डओव्हरची आमची पहिली मीटिंग मला आठवते. आमच्या शाळेत सुझी या प्रोग्रामची मागल्या वर्षीची इनचार्ज होती.

तिच्या घरी मी पोहचले, तर चहा, कॉफी, होम बेक्ड मफिन्स, स्वच्छ धुतलेल्या स्ट्रॉबेरीज अशी जय्यत तयारी. 

सुझीने सगळा तपशील मला समजावून दिला. न्यूज कास्टच्या या प्रोजेक्टमध्ये मुलांची टीम कशी निवडावी, त्यांना जबाबदा-या कशा वाटून द्याव्यात, प्रत्येकाकडे निश्चित काम आणि त्यासाठीचा हुद्दा कसा असला पाहिजे, वर्गशिक्षक-पालक यांच्या संपर्कात कसं राहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन कसं करावं.. हे सगळं सगळं तिच्या अनुभवातून आलेलं सार तिने माझ्याकडे सोपवलं.

याशिवाय उदाहरणादाखल इमेल कम्युनिकेशन,  कार्यक्रमाचं स्क्रीप्ट, इक्विपमेण्ट बुकिंग फॉर्मच्या प्रिण्टेड प्रती अशा ब-याच उपयुक्त कागदपत्रांचा गठ्ठा माझ्या हातात ठेवला आणि हसून म्हणाली, बेस्ट लक ! छान होऊ दे तुझा प्रोग्राम!!

पुढे काय झालं?- ते सांगेन पुढच्या मंगळवारी !!

(पूर्वार्ध)

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  

ashvini.bhave19@gmail.com 

Web Title: Ashwani Bhave is telling the story of her role which she play behind of camera in Live News Cast project in Crocker Middle School of Hillsborrow In America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.