Ashvini Bhave going down the memory lane when her kids changed her life and times. | ‘गर्भ’रेशमी
‘गर्भ’रेशमी

ठळक मुद्देमुलांबरोबर आईच्याही वाढण्याची खट्टीमिठी अमेरिकन गोष्ट : लेखांक एक


- अश्विनी भावे

खरं तर कौटुंबिक आयुष्याच्या ओढीनेच मी माझ्या करिअरला मागे ठेवून नव्या वळणावर विचारपूर्वक पाऊल ठेवलं होतं. कुटुंब कल्पना आली म्हणजे मूल होणं आलंच. मला लहान मुलांचं वेड आहे म्हटलं तरी हरकत नाही. असं असतानाही मी आईपण पुढे ढकलत होते. का? 

लग्नानंतर मी आणि माझा नवरा किशोर आम्ही सॅनफ्रान्सिस्कोमध्ये - जगातल्या सर्वात रम्य आणि उत्तमोत्तम रेस्टॉरण्ट्स असलेल्या शहरात राहात होतो. एक स्वच्छंदी आयुष्य जगत होतो. मुलं झाली की या आयुष्यातला झुळझुळता सहजपणा संपेल, मी त्यात अडकून पडेल असं मला वाटत असावं कदाचित !

- पण माझ्याही आयुष्यात तो हुरहुरीचा, उत्सुकतेचा टप्पा आला आणि सगळे संदर्भच भराभर बदलत गेलेले मी अनुभवले. मला आठवतंय, समीरच्या वेळी माझ्या पहिल्या गरोदरपणात मी एकदा आईला त्रासून विचारलं होतं, ‘कधी संपतं हे आईपण?’आई हसून म्हणाली, ‘कधीच नाही. आता बघ, माझ्या मुलीच्या मदतीला, नातवाचं करायला मी बॅग भरते आहे.’.. कसे भराभर गेले ते दिवस.

आज माझी मुलं ‘टीनएजर’ झाली आहेत आणि माझं ‘आईपण’ नावाचा गोड गुंता माझ्या मनाभोवती अखंड वेढून आहे तो आहेच. 
मुलं लहान होती तेव्हा त्यांच्या डायपरचा रॅश कसा हाताळायचा हा यक्षप्रश्न वाटत होता आणि आता वाढत्या वयातल्या माझ्या टीनएजर मुलांना प्रलोभनांपासून कसं दूर ठेवायचं हा प्रश्न मला छळत असतो. काळ भराभर बदलत गेला, तसे प्रश्न बदलले; पण संपले नाहीत.  त्या प्रश्नांनी त्या त्या वेळी कब्जा घेऊन माझी पार परीक्षा पाहिली, हे खरंच. पण त्या त्रासाचं, मेहनतीच्या साफल्याचं सुख अवचित एखाद्या क्षणी मिळून जातं आणि सगळं सगळं सार्थकी लागल्याची भावना सुखावून जाते.

उपडं वळण, पहिलं पाऊल, आई ही हाक, पहिली खोडी, फोटोसाठीचं पहिलं परफेक्ट स्माइल, मुलांचं बिलगणं. हे क्षण तर वेचलेच. पण  ‘मॉक ट्रायल’साठी मुलीनं केलेलं कोर्ट रूममधलं भाषण, मुलानं स्टेजवर केलेल्या नकला, राजकीय परिस्थितीवर केलेल्या चर्चा, व्यायामशाळेत उचललेलं दीडशे किलो वजन, परीक्षेत मिळवलेले 98 टक्के मार्क, क्षणार्धात हार मागे टाकून पुढे निघून जाण्याचं मुलांचं कसब.. माझ्यातल्या आईला सुखावणा-या अशा किती गोष्टी सांगू !!!

आईपणाचा प्रवास वाटावळणांचा. तो सोपा कसा असेल? त्यातून मी मायदेशापासून दहा हजार मैलावर माझं घर मांडलेलं. माझी मुलं इथे अमेरिकेत जन्मली. इथे वाढली. आपली मुलं ‘इकडची’च; पण त्यांनी थोडंतरी ‘तिकडच्या’सारखं असावं ही छुपी इच्छा प्रत्येकच स्थलांतरित आईबापाची असते. मीही त्याला अपवाद नव्हते. त्यातून आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक गोष्टीचा अगदी कीस पाडण्याचा माझा स्वभाव आणि अवगत नसलेली कौशल्यं धडपडून शिकून घेण्याची सवय.

आईपणाच्या उंबरठय़ावर उभी राहिले, तेव्हा तर काय करू आणि किती शिकू असं मला होऊन गेलं होतं. त्यातून इथे अमेरिकेत शिकण्याच्या संधी अफाट.  ‘पेरेंटिंग’ शिकवणं, त्यातले प्रश्न-अडचणी यावर समुपदेशन करणं ही तर मोठी इंडस्ट्रीच आहे या देशात.  समीरच्या जन्मानंतर मी संगोपनावरच्या दोन दिवसांच्या एका सेमिनारला गेले होते.   क्लास सुरू झाला तेव्हा एक पासष्टीचा शिक्षक आमच्या समोर उभा होता. तो पहिलेछूट म्हणाला, ‘यूवर ओन्ली रिस्पॉन्सिबिलिटी ऐज अ मॉम इज टू मेक यूवर चाइल्ड इंडिपेंडंट!’
मातृत्व ही कशी आजन्म सांभाळण्याची जबाबदारी आहे, अशा संस्कारात मी वाढलेली आणि हा माझा अमेरिकन शिक्षक मला सांगत होता,
‘आई म्हणून तुमचं एकमेव कर्तव्य म्हणजे तुमच्या मुलाला स्वावलंबी नि स्वतंत्र बनवणं’. 
ते ऐकून मी संभ्रमात पडले. अवघ्या काही दिवसांचं माझं तान्हं बाळ आणि स्वतंत्र? क्षणभर वाटलं, आपण चुकीच्या क्लासमध्ये बसलोय का? मला वाटलं होतं मालिश कसं करावं, आहार काय असावा याबद्दल काही माहिती देईल हा माणूस, तर तो हे काय सांगतो आहे? मी न राहवून विचारलं, ‘स्वावलंबन नक्की वयाच्या कुठल्या वर्षी शिकवायला सुरू करायचं?’

- तर तो म्हणाला, ‘पहिल्या दिवसापासून!’

माझी शंका ओळखून त्याने मला नीट समजावलं, की ही एक विचारधारा आहे, जी नव्या आईनं पहिल्या दिवसापासून डोक्यात ठेवायला हवी.
संभ्रमात टाकणारे अनुभव ‘इकडच्या’ आणि ‘तिकडच्या’ तागड्यात मोजण्याच्या या अनुभवाला तोवर मी सरावले होते. मला वाटलं, आपल्याकडे (म्हणजे भारतात) स्वत:च्या मुलाला बायका-पोरं झाली तरी आई मुलावर आईपणा गाजवायचा सोडत नाही. तो अजूनही माझ्यावर कसा अवलंबून आहे म्हणजेच तो कसा माझ्या शब्दाबाहेर नाही यात आया धन्यता मानताना दिसतात.. आणि इथे अमेरिकेत?? मूल जन्माला आलं, की तात्काळ नाळ तोडून त्याला सुटं-स्वतंत्र करण्याचा आग्रह !!

या दोन्ही विचार पद्धती मला धोक्याच्या आहेत असं वाटायला लागलं. माझ्या पेरेंटिंगच्या क्लासमधला तो शिक्षक शक्य त्या त्वरेने मुलाला स्वतंत्र करण्याचे मार्गही नीट समजावून सांगत होता. अगदी पहिल्या आठवड्यापासूनच मुलाला स्वत:च्या बिछान्यावर किंवा स्वतंत्र खोलीत निजवावं (अर्थात अमेरिकेत जागेची मुबलकता असते म्हणून !), ज्या गोष्टी मुलं स्वत: करू शकतात त्या त्यांनाच करू द्याव्यात.. आपल्या बाउलमध्ये सिरिअल काढून घेणं, खाल्ल्यावर चमचा भांडं धुवायला टाकणं वगैरे वगैरे. 
मी काहीतरी नवीन शिकून आले होते त्यामुळे त्यातल्या काही गोष्टी तरी कृतीत आणून पाहू असं मी ठरवलं. समीरसाठी नवा क्रिब (म्हणजे चारही बाजूंनी उंच आधार असलेला बिछाना) आणला होता तो शेजारच्या बेडरूममध्ये हलवला. समीरला बाजूच्या खोलीत हलवताना त्या शिक्षकाचे शब्द आठवत होते. ‘मूल रडेल, भोकाड पसरेल; पण कुणीच लक्ष देत नाही म्हटल्यावर झोपेल आपल्या आप. काळजी करू नका!’

.. मग रोजचा ड्रामा चालू झाला. इकडे मी जागी आणि तिकडे माझं सव्वा वर्षाचं बाळ ! त्यावेळी आम्ही अपार्टमेण्ट बिल्डिंगमध्ये राहात असू. एक दिवस समीरने रडून हैदोस घातला, बंड केलं आणि क्रिबच्या दरवाजावरून टांग टाकून खाली उडी मारली. मी धावत गेले. मला पाहताच तो बिलगला आणि काही क्षणात झोपलादेखील.

दुस-या दिवशी सकाळी माझ्या दाराच्या फटीतून एक कागद आत सारलेला दिसला. खालच्या मजल्यावर राहाणार्‍या  बाईनं लिहिलेलं खरमरीत पत्र होतं ते : काल मध्यरात्री 2 वाजता तुमच्या घरातून चांगलंच (कमोशन) धावपळ नि धाडधूड आवाज आणि प्रचंड गोंधळ ऐकू येत होता. त्यानं आमची झोपमोड झाली. या उपर असं होणार नाही याची काळजी घ्या! - माझ्या लेकाला स्वावलंबी बनवण्याच्या प्रक्रियेत मी सपेशल फसले होते.
पण या उलट माझी मुलगी. साची. ती बाळ असताना सुरुवातीपासूनच सुटवंग होती. समीरसाठी आणलेल्या क्रिबमध्ये ती तीन महिन्याची असल्यापासूनच एकटी झोपायला लागली.
एकूणच माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक मूल वेगळं असतं. काहीवेळा सरसकट एकच ट्रिटमेण्ट नाही देता येत त्यांना.
या वेगळेपणाचा एक धडा समीरनेही मला दिला.
भारतात सगळ्यांना बहुतेक दोन तीन भाषा तरी येतात. संगोपनावरच्या पुस्तकात मी वाचलंही होतं की जास्त भाषा शिकल्यानं मेंदू जास्त विकसित होतो.

समीर लहान असताना मी घरात मराठी बोलत असे. समीरच्या शाळेत इंग्रजी आणि माझी नॅनी समीरशी स्पॅनिश बोलत असे. मला वाटलं मी माझ्या मुलांच्या वाढीसाठी चांगले प्रयत्न करते आहे. तो मातृभाषाही शिकतोय आणि फॉरेन लँग्वेजही. पण अचानकच समीर खूप गप्प गप्प राहायला लागला आणि बोलायचाही बंद झाला. 

मी घाबरून डॉक्टरकडे गेले. ब-याच प्रश्नोत्तरानंतर त्यांनी सांगितलं की, तीन भाषांमध्ये त्याला फरक करता येत नाही आहे. तुम्ही पुढचं निदान वर्षभर तरी एकाच भाषेत त्याच्याशी बोला. इंग्रजीत बोललात तर जास्त बरं.

माझ्या मुलावर मराठीचे संस्कार करण्यात मी अपयशी झाले होते खरी; पण मी मराठीचा अट्टाहास सोडून दिला तात्पुरता. कारण ती त्याची गरज होती.
आज माझा मुलगा स्पॅनिशही उत्तम बोलतो आणि मुंबईतल्या त्याच्या आजीशी मराठीत उत्तम गप्पाही मारतो. पालक म्हणून आपणच फक्त मुलांना शिकवत असतो, हे काही खरं नव्हे. खरं तर मुलंही आपल्याला शिकवत असतातच. त्यांच्याबरोबरच तर आपल्या आईपणाचं वय वाढत जात असतं ना!

समीरच्या जन्मानंतर मुलांना ‘इंडिपेंडंट’ बनवण्याचा धडा मला माझ्या अमेरिकन शिक्षकाने दिला होता. त्याचं प्रात्यक्षिक मला मिळेपर्यंत माझी मुलगी साची शाळेत जायला लागली होती.
साची चवथीत असेल. तिच्या घट्ट मैत्रिणीचं नि तिचं काहीतरी बिनसलं. ‘माझं बरोबर असूनही सवाना मला नीट वागवत नाही’, म्हणून साची खट्ट होती. तिच्या मनाला खूप लागलं आहे हे लक्षात आल्यावर मी माझ्या मैत्रिणीला, म्हणजे सवानाच्या आईला फोन केला.
ती म्हणाली, आज दुपारी साचीला घेऊन ये.
मला वाटलं काय कानउघडणी करते आहे आता?
- पण तिनं या दोघींना बाकड्यावर बसवलं. तिनं सवानाला विचारलं, ‘साचीचं असं असं म्हणणं आहे तुला काय वाटतंय?’
- साचीच्या म्हणण्यावर तिने सवानाला तिचं मत मांडायला सुचवलं आणि मग दोन्ही मुलींना म्हणाली,
‘तुम्ही दोघी मिळून ठरवा कोणाची चूक आहे आणि भांडण कसं मिटवायचं ते!’
सवानाला तिची चूक मान्य होती. ती पटकन सॉरी म्हणाली आणि साचीच्या गळ्यात पडली. दोन्ही मैत्रिणी खेळायला पळाल्या.
अमेरिकन पेरेंटिंगच्या क्लासमधला माझा शिक्षक  ‘मुलांना स्वतंत्र बनवा’, असं म्हणाला होता, त्याचा अर्थ थोडा उलगडला होता मला. 

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  

ashvini.bhave19@gmail.com 


Web Title: Ashvini Bhave going down the memory lane when her kids changed her life and times.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.