Ashvini Bhave goes down the memory lane to explore the love and warmth of her beloved father | अश्विनी भावे आणि त्यांच्या बाबांचा ‘सुखी माणसाचा सदरा’ एका विलक्षण नात्याची कहाणी.
अश्विनी भावे आणि त्यांच्या बाबांचा ‘सुखी माणसाचा सदरा’ एका विलक्षण नात्याची कहाणी.

-अश्विनी भावे

अहो, आता रागवा मुलांना’’ आई कडाडली की मग आम्हालाच हळू आवाजात ‘‘काय रे, काय झालं? आई का चिडली आहे,’’ असं विचारणारे माझे बाबा! गोरेपान, तरतरीत नाक, बारीक मिशी, चेह-यावर सात्त्विक भाव, लांब बोटं, गुळगुळीत तळवे, जसं काही गादयागिरद्यांमध्येच यांचं बालपण गेलं असावं. कोणत्याही प्रहरी आत्ताच आंघोळ करून आले असावेत, अशी तुकतुकीत कांती.. आमची मोठय़ा ब्रॅण्डची महागडी क्रीम्ससुद्धा त्यांना शरण जातील.
चुनाभट्टीतल्या सर्मथनगरच्या 7 नंबर बिल्डिंगचे ते शरदमामा. सर्वांना ‘आपले’ वाटतील असे. मोठय़ा घरांची, श्रीमंतीची न त्यांनी कधी स्वप्नं पाहिली न दुस-याच्या बडेजावानं कधी त्यांचे डोळे दिपले ! उभ्या आयुष्यात त्यांच्या मनाला कधी असूया शिवली नाही. चाळीतले सगळे त्यांना म्हणत, तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ द्याकी आम्हाला !

‘शरदमामां’कडे गुणांची, कलांची आणि हरतर्‍हेच्या कौशल्यांची पोतडी होती जणू ! अख्ख्या बिल्डिंगला पुरेल इतका हत्यारखाना त्यांच्याकडे !  कुणाच्या घराचा दरवाजा निखळू दे किंवा कुणाच्या हातावरचं घड्याळ बंद पडू दे, ‘शरदमामा जरा बघा हो’, असं कुणी म्हटलं की मोठय़ा उत्साहानं ते योग्य ते हत्यार घेऊन धावायचे. आमच्या छोट्या घरातलं पाव कपाट तरी होमिओपॅथीच्या पुस्तकांनी भरलेलं. त्यांना खरं तर डॉक्टर व्हायचं होतं; पण ऐपत नव्हती म्हणून हुकलं त्यांचं. बाबा फार उत्तम डॉक्टर झाले असते. अध्र्या लोकांना त्यांनी फुकटातच औषध दिलं असतं कनवाळूपणामुळे आणि उरलेल्या अर्ध्यांचा आजार त्यांच्याशी नुसतं बोलूनच बरा झाला असता.

बाबांनी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केलं आणि सायनच्या SIESकॉलेजमध्ये रिटायर होईपर्यंत प्राध्यापकी केली. आमची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे कॉलेजव्यतिरिक्त व्होराज क्लासेसमध्ये शिकवणं, इतर कॉलेजला डेमॉन्स्ट्रेटर  म्हणून जाणं अशी खूप कामं त्यांनी केली.  शिकवण्यांव्यतिरिक्तही त्यांनी बरेच उप-उद्योग हाताळले.

माझं आजोळ अलिबागचं ! शरदराव म्हणजे प्रिय जावईबापू आणि बाबादेखील अलिबागकरांच्या प्रेमात. पाण्याचा तुटवडा वाढला तशी गावागावात बोअरवेलची गरज वाढू लागली. आमच्या बाबांचं मन डॉक्टरकीत असलं आणि व्यवसाय शास्त्राशी निगडित असला तरी त्यांचं डोकं इंजिनिअरिंगचं होतं. रात्री-बेरात्री एस.टी बसनं प्रवास करून गावागावातली बोअरवेलची कामं त्यांनी केली. सूक्ष्म निरीक्षण आणि प्रमाणबद्धता यामुळे त्यांची बोअरवेल कधीच फेल गेली नाही. त्यांच्या कौशल्याचे योग्य पैसे त्यांना मिळाले की नाही ठाऊक नाही; पण त्यांनी घरं जोडली ती मात्र कायमची.

बाबांना डॉक्टर बनण्याची जशी इच्छा होती तशी व्यवसाय करण्याचीही हौस होती. मी कॉलेजमध्ये असताना त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्याच हाताखाली शिकलेल्या दोघांना हाताशी घेऊन बाबांनी भांड्यांचा साबण बनवायचं ठरवलं आणि त्याची छोटेखानी सुरुवात आमच्या पुढच्या खोलीत झाली. परफेक्ट लिक्विड सोप बनवण्याचे सगळे प्रयोग घरच्या बादल्यांमध्ये व्हायचे आणि मग टेस्टिंगसाठी सॅम्पल जायचं मजल्यावरच्या सर्वांकडे! जम बसल्यावर साकीनाक्याच्या गाळ्यात सारं बस्तान हलवलं. पण व्यवसाय करायला वेगळी दृष्टी लागते. नफा-तोटा मोजण्याची हातोटी लागते. बाबांना नफा ‘पैशात’ मोजतात हे कधी कळलंच नाही.

कॉलेजमध्ये भावे सर केमिस्ट्री करता ओळखले जात तसेच ‘पाल्मेस्ट्री’साठीसुद्धा ते मुलांमध्ये भारी लोकप्रिय होते. कायम विद्यार्थ्यांच्या घोळक्यात, कधी प्रॅक्टिकल्सबद्दलचे प्रश्न सोडवण्यासाठी तर कधी आयुष्याचे ! पुढे मी कामासाठी देशोदेशी प्रवास केला. अजूनही मी जाते त्या प्रत्येक शहरात भावेसरांच्या आठवणी सांगणारे विद्यार्थी भेटतात. ‘‘आम्हाला सर अगदी वडिलांच्या स्थानी आहेत. माझा हात पाहून त्यांनी सांगितलेलं सगळं खरं झालं.’ ..माझं गुपित मी विश्वासानं त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी इतका योग्य सल्ला दिला. सांगा त्यांना !’’-  असे निरोप मला दिले जातात.
दुनियेला हात पाहून भविष्य सांगितलं तसाच माझाही हात त्यांनी वारंवार पाहिला. पण प्रत्येक वेळी एकच भाकीत : ‘‘अरे, सगळं फस्र्ट क्लास आहे. सगळे माउण्ट्स उत्तम आणि रिंग फिंगर  किती लांब आहे बघ. वा मस्त.’’.. कधी अस्थिर मन:स्थितीत असताना हात बघा म्हटलं की म्हणणार, ‘‘ही बघ नवीन रेघा उमटते आहे. तिचा फोर्स बघ किती छान आहे. सहा महिन्यात सांग मला.’’
येतील ते दिवस उत्तमच असतील तुझ्यासाठी, हे भाकीत ठरलेलं !

आम्ही गणपतीला बाबांच्या गावी म्हणजे भिवंडीला जात असू. मग त्यांचे सारे लंगोटी यार त्यांना भेटायला यायचे. की मग सुरू व्हायचा जल्लोष.. ‘‘श-या ! चल डाव टाकायचा का?’’ - असं म्हणत जो कॅरमचा डाव रंगायचा तो 72 तास सलग चालत असे. यात अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. आमचे बाबा डाव-या हातानं ब्रेक करायचे तो असा की तीन सोंगट्या गेल्याच म्हणून समजा. कॅरम तापवायचा. पॉलिश पेपरनं गुळगुळीत करायचा. परफेक्ट ! चिल्ल्यापिल्ल्यांना कॅमरचे बारकावे  शिकवायला त्यांना फार आवडायचं. 
‘आता बघ हं, कसा ट्रिपलकट मारतो आणि ते मारताना ही सोंगटी कशी काढायची पुढच्या डावा करता’ - असे काही डावपेच असायचेच या गप्पांमध्ये !

‘काका गोष्ट सांगना’ - असं पुतण्यांनी म्हटलं की सुरू यांची गोष्ट ! आणि म्हणाल ते कॅरेक्टर त्यात हजेरी लावणार !!
- माजघरातल्या खाटेवर बाबा आडवे, डोक्याखाली तीन उशा आणि आम्ही दहा जण त्यांच्या भोवती त्याच खाटेवर ! यांची गोष्ट सुरू झाली की आजी आणि मोठय़ा काकूच्या एकमेकांना खुणा.. की चला, आता तीन तास तरी मुलांची कटकट नाही!
- या तीन तासात बाबा मध्येच झोपायचे, घोरायचे. मग आम्ही थापडा मारून त्यांना उठवणार की मग ते म्हणणार, हा !!! कुठपर्यंत आलो होतो? हा!!! तर त्या पोंगाराम हत्तीनं त्या सिंहाला असा सोंडेवर घेतला ! ..आणि हे सारं कथन साउण्ड  इफेक्टसहीत !
गणपतीचे चार दिवस ही कधीही न संपणारी एकच गोष्ट रंगायची !

आमच्या कॉलनीतल्या गणपतीत तर बाबांचा नुसता सळसळता सहभाग. मोठमोठे बॅकड्रॉप रंगवायचे ते. त्यातले काही अजून आठवतात मला. चित्रकलेचं कोणतंही फॉर्मल शिक्षण नाही. परीक्षा दिल्या नाहीत त्यांनी; पण स्केचेस फार उत्तम काढायचे. एकदा माळ्यावरचं सामान काढताना त्यांनी रंगवलेलं एका तरुणीचं ऑइल पेंटिंग पाहिलं तर माझा विश्वासच बसेना. गळ्याभोवती लाल तोकडा स्कार्फ, वार्‍याच्या झुळकीने उडणारे केस आणि चेह-यावर काहीसा बेफिकीर भाव!

मी चेष्टेत बाबांना म्हटलं, ‘‘काय छुपे रुस्तुम, ही कुठली गर्ल फ्रेण्ड तुमची?’’

- ते माझे दोस्तच असल्यासारखी आमची थट्टा मस्करी ! त्यांचा माझ्यावर प्रचंड जीव. माझ्या मेहनतीचा नि यशाचा कोण अभिमान. माझ्या नाटका-चित्रपटातले डायलॉगसुद्धा त्यांना पाठ.  ‘अश्विनी माझी मुलगी आहे’पेक्षा  ‘मी अश्विनीचा बाबा आहे’ हीच ओळख त्यांना जास्त प्रिय होती. माझ्यातली गाण्याची आवड केवळ त्यांच्यामुळे आली. वयाच्या चौथ्या वर्षी बाबांबरोबर ऐकलेली भीमसेनजींची मैफल मला अजून स्मरते. तशी आमच्या मजल्यावर गाण्याची आवड प्रत्येकालाच. ‘चला बसू या,’ म्हटलं की सगळे तबला-पेटी काढून सज्ज. मग बाबा ‘जय गंगे भागीरथी’चं पद म्हणायचे आणि प्रसाद सावकारांनी केलेल्या भूमिकांच्या आठवणीत बुडून जायचे.

सगळ्या पिढय़ांशी त्यांची घट्ट गट्टी. माझ्या मुलांसाठी हे आजोबा दोस्तच अधिक. आमच्या अमेरिकेच्या घरात पत्त्याचा डाव रंगला की आजोबांना पार्टनर घेण्यासाठी मुलांची चढाओढ असे. कारण बाबांचं जबरदस्त कार्ड लक ! Canestraच्या डावात ‘आता दश्शी काढा’ म्हटलं तर बाबांनी उलटलेलं पान दश्शीच असणार! एक जोकर द्या म्हटलं तर तीन काढून देणार.

आज अमेरिकेत जेव्हा त्यांच्याशिवाय पत्ते खेळत असतो तेव्हा समीर-साची त्यांच्या गटाचं नाव ‘आजोबा’च ठेवतात, का तर म्हणे, ‘दॅट विल ब्रिंग अस कार्ड-लक’.
आमच्यासाठी बाबा म्हणजे जगातले सवरेत्तम शेफ होते ! स्वयंपाक रांधायची भारी हौस! शिवाय सगळे अंदाज कसे परफेक्ट ! त्यांना ना कधी मापाला भांडी लागली, ना चव घेऊन पाहण्याची गरज. नुसत्या रंगावरून ते आईला पदार्थ कसा झाला ते सांगत. सगळ्या बाजूंनी हळुवार तळलेला गुलाबजाम बनवायचा असो, बेसनाचा तुळतुळीत लाडू वळायचा असो किंवा मटार टोमॅटोचा चमचमीत रस्ता बनवायचा असो; हे सगळ्यातच एक्सपर्ट ! त्यांच्या हातची डाळ-तांदळाची साधी सात्त्विक खिचडी तर अख्ख्या जगात कुणालाच जमणार नाही. अंदाजपंचे केलेल्या खिचडीला प्रत्येक वेळी तीच चव आणण्याची हुकमी जादू, त्यांच्या हातात होती. 

बाबांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक खूण म्हणजे निष्पापपणा ! जगात कुणी वाईट हेतूची माणसं असतील यावर जणू विश्वासच नव्हता त्यांचा ! कसा कोणास ठाऊक; पण त्यांच्यातल्या या अंगभूत सात्त्विकपणामुळे समोरच्याचा अहंकार, भांडणाचा पवित्राच गळून पडे. त्यामुळे आमच्या सोसायटीच्या पॅनलवर ‘भावें’चं नाव कायम नॉमिनेटेड असायचं.

बाबांच्या या परोपकारी स्वभावाचा माझ्या आईला निश्चित त्रास व्हायचा. ते जितके पापभीरू आणि समोरच्यावर पटकन विश्वास टाकणारे, तितकीच माझी आई चाणाक्ष. त्यांच्या बाजूला ती खमकी उभी होती म्हणूनच त्यांच्या संसाराचा गाडा उत्तम चालला.
तर हे असे माझे बाबा.. सज्जन, रुबाबदार, निर्व्याज, ऊतू जाईल इतकं प्रेम करणारे, हरहुन्नरी, परफेक्शनिस्ट ! कनवाळू आणि निष्पाप इतके की जसं त्यांच्या आत एक लहान मूलच दडलंय जणू !

- माझ्या बाबांना जाऊन आता एक वर्ष उलटलं.
कधी आठवणीत, तर कधी ‘माझ्यात त्यांचं काय उतरलंय’ या आत्मशोधाच्या प्रवासात ते कायमच माझ्या हृदयात असतील आणि त्यांच्या ‘सुखी माणसाच्या सद-यात’ मला जन्मभर पुरेल इतकी मायेची ऊब तर नक्कीच आहे!

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  

ashvini.bhave19@gmail.com 

Web Title: Ashvini Bhave goes down the memory lane to explore the love and warmth of her beloved father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.