monkey baat marathi movie review : लहान मुलांची धमाल बात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:03 PM2018-05-17T12:03:46+5:302023-08-08T19:16:16+5:30

पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले आणि वेदांत आपटे यांची मंकी बात या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. एका मुलाच्या मस्तीला कंंटाळून देवबाप्पा त्याला काय शिक्षा देतात याची धमाल गोष्ट मंकी बात या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

monkey baat marathi movie review: child talk matter | monkey baat marathi movie review : लहान मुलांची धमाल बात

monkey baat marathi movie review : लहान मुलांची धमाल बात

Release Date: May 18,2018Language: मराठी
Cast: वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, विजय कदम, समीर खांडकेकर, मंगेश देसाई
Producer: विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू , विजू मानेDirector: विजू माने
Duration: 90 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>प्राजक्ता चिटणीस

आपण लहान मुलांना नेहमीच घाबरवत असतो की, जास्त मस्ती केलीस तर तुला देवबाप्पा शिक्षा देईन... पण खऱ्या आयुष्यात काही देव बाप्पा मुलांना शिक्षा देत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण या गोष्टीची भीती लहान मुलांच्या नेहमीच मनात असते. मंकी बात या चित्रपटात एका मुलाच्या मस्तीला कंंटाळून देवबाप्पा त्याला काय शिक्षा देतात याची धमाल गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते.

वायू (वेदांत आपटे) चे सगळे बालपण कोल्हापूरमध्ये गेलेले असते. पण त्याच्या वडिलांना (पुष्कर श्रोत्री) मुंबईत नोकरी मिळते आणि तो आई (भार्गवी चिरमुले) आणि वडिलांसोबत मुंबईत राहायला येतो. पण मुंबईत आल्यानंतर त्याच्या सोसायटीतील,शाळेतील मुले त्याच्याशी चांगले वागत नसतात. तो गावचा असल्याने त्याला घाटी म्हणून सतत चिडवत असतात. या सगळ्यामुळे तो खूप दुःखी होतो. त्याचे त्याच्या वडिलांसोबतचे नाते हे एका मित्रासारखे असते.पण मुंबईत आल्यावर वडिलांना देखील कामाच्या व्यापात त्याला वेळ देता येत नाही. तसेच छोट्या छोट्या कारणावरून देखील त्याचे वडील त्याला ओरडत असतात.त्यामुळे आपण काहीही चुकीचे करत नसताना वडील आपल्याला ओरडतात. त्याच्यापेक्षा आपण खरंच वाईट वागूया असे तो ठरवतो.आपल्या मस्तीला कंटाळून वडील आपल्याला कोल्हापूरला पाठवतील आणि तिथे आपण आपल्या जुन्या मित्रांसोबत आनंदाने राहू असे वायूला वाटत असते. त्यामुळे तो खूप जास्त मस्ती करायला लागतो. पण आपल्या मस्तीमुळे दुसऱ्याला त्रास होतोय याची त्याला कल्पनाच नसते. तो चुकीचे वागत असल्याची जाणीव देव (अवधूत गुप्ते) त्याला अनेकवेळा करून देतो. पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे देवबाप्पा त्याला शिक्षा देतो. देवबाप्पा वायूला काय शिक्षा देतो आणि त्यानंतर चित्रपटात काय धमाल मस्ती होते हे मंकी बात या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

मंकी बात या चित्रपटाची कथा ही साधी, सरळ असल्याने नक्कीच मनाला भावते. पण ही कथा दिग्दर्शकाला तितकी प्रभावीपणे मांडता आलेली नाही. तसेच चित्रपटात अनेक उपकथा उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. मध्यांतरापर्यंत चित्रपटाला चांगला वेग आहे. पण मध्यांतरानंतर चित्रपट खूपच कंटाळवाणा बनला आहे. तसेच वायूची मध्यांतरानंतर असलेली वेशभुषा देखील तितकीशी जमून आलेली नाहीये. पुष्कर आणि भार्गवीची भूमिका चित्रपटात वेदांत आपटेच्या तुलनेत छोटी आहे. तसेच त्यांच्या व्यक्तिरेखा दिग्दर्शकाला व्यवस्थितपणे मांडता आलेल्या नाहीत. वायू हरवल्यावर देखील त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर तितकीशी चिंता, भीती आपल्याला दिसून येत नाही. अभिनयाच्या बाबतीत वेदांतने बाजी मारली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अवधूत गुप्ते अभिनय न करता एखाद्या रिअॅलिटी शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत असल्यासारखाच भासतो.त्याचे चित्रपटातले संवाद देखील रिअॅलिटी शोमधील त्याच्या वाक्यांशी सार्धम्य साधणारे आहेत. पावटे काकाच्या भूमिकेत असलेले विजय कदम, बहादूरच्या भूमिकेत असलेला समीर खांडेकर नक्कीच लक्षात राहातो. चित्रपटाची गाणी दमदार नसल्याने मनावर खोलवर रुजत नाहीत. पण चित्रपटात अनेक उणिवा असल्या तरी चित्रटातील काही दृश्य नक्कीच खळखळून हसवतात.

Web Title: monkey baat marathi movie review: child talk matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.