Majha Agadbam Movie Review : पटकथेत दम नसलेला माझा अगडबम

By प्राजक्ता चिटणीस | Published: October 25, 2018 11:42 AM2018-10-25T11:42:58+5:302023-08-08T20:35:32+5:30

माझा अगडबम या चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे आणि कान्हा भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Majha Agadbam Movie Review | Majha Agadbam Movie Review : पटकथेत दम नसलेला माझा अगडबम

Majha Agadbam Movie Review : पटकथेत दम नसलेला माझा अगडबम

Release Date: October 26,2018Language: मराठी
Cast: तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे आणि कान्हा भावे
Producer: तृप्ती भोईर, टी.सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा Director: तृप्ती भोईर
Duration: २ तासGenre:
लोकमत रेटिंग्स

अगडबम या तृप्ती भोईरच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, चित्रपटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान या गोष्टी प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण अगडबमच्या तुलनेत हा चित्रपट आपले मनोरंजन करण्यात अपयशी ठरतो. 

नाजूका (तृप्ती भोईर) आणि रायबा (सुबोध भावे) हे सुखी जोडपे असते. नाजूकाचे वजन प्रचंड असल्याने लोक तिची चेष्टा करत असतात. पण रायबा नेहमीच तिच्या पाठिशी उभा राहात असे. तिचे सासू (उषा नाडकर्णी) सोबत देखील चांगले संबंध असतात. त्यांच्या आयुष्यात सगळे काही सुरळीत सुरू असले तरी त्यांच्यात आयुष्यात एक कमतरता असते. त्यांच्या लग्नाला सहा वर्षं झाले असले तरी त्यांना मूल नसते. त्यासाठी ते एका बाबाकडे उपचार घेत असतात. त्याच दरम्यान एकदा नाजुकाचे वडील (जयवंत वाडकर) एका रेसलिंगच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जातात. ते एक प्रसिद्ध कुस्तीपट्टू असतात. पण त्या रेसलिंग कार्यक्रमात विजेता ठरलेल्या रेसलरसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची होते आणि ते स्वतःच रेसलिंगच्या आखाड्यात उतरून त्याच्यासोबत रेसलिंग खेळतात. पण यात त्यांना प्रचंड दुखापत होते. नाजूकाच्या वडिलांना हरवणारा रेसलर महाराष्ट्रातील सगळ्याच रेसलरना त्याच्यासोबत रेसलिंग करण्याचे आव्हान देतो. त्यावेळी मला मुलगा असता तर त्याने या रेसलिंगमध्ये भाग घेतला असता असे नाजूकाचे वडील तिला म्हणतात. त्यानंतर तीच मुलगा बनून रेसलिंग करण्याचे ठरवते. या सगळ्या प्रकरणाचे पुढे काय होते, नाजूका रेसलिंग जिंकते का, रेसलिंग करणारा मुलगा नसून मुलगी आहे हे सगळ्यांना कळते का या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना माझा अगडबम या चित्रपटात मिळतील.

माझा अगडबम या चित्रपटाच्या कथेत अनेक उणिवा आहेत. नाजूकाचे वजन प्रचंड असून देखील ती बाथरूमच्या खिडकीतून रोज बाहेर पडते, पाईपवरून खाली उतरते या गोष्टी मनाला पटत नाहीत. तसेच नाजूका रेसलिंगचे धडे गिरवायला जाते याचा चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तिचे गुरू देखील दाखवण्यात आलेले आहेत. पण ती रेसलिंग खेळण्यासाठी घेत असलेली मेहनत चित्रपटात एका गाण्यात वगळता दाखवण्यात आलेली नाही. चित्रपटाचा पूर्वाध चांगला असला तरी उत्तरार्धात चित्रपट रटाळ होतो. तसेच चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये देखील त्रुटी आहेत. चित्रपटात नाजूका म्हणजेच रेसलिंग करत असलेला माझा रायबाच्या ऑफिसमध्ये मुख्य अतिथी म्हणून जातो हे दृश्य सुरू असतानाच लगेचच पुढचे दृश्य सुरू होते. चित्रपटातील अॅक्शन दृश्य देखील खरीखुरी वाटत नाहीत. चित्रपटाच्या कथेत दम नसला तरी कलाकारांनी हा चित्रपट आपल्या अभिनयाने तारला आहे. या चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे आणि कान्हा भावे यांनी खूप चांगला अभिनय केला आहे. तृप्ती आणि सुबोधची केमिस्ट्री मस्त जमून आली आहे. तसेच उषा नाडकर्णी आपल्या मृत पतीसोबत गप्पा मारतात हे प्रसंग नक्कीच खळखळून हसवतात. चित्रपटातील एका दृश्यात तृप्ती बाथरूममधून काहीही प्रतिसाद देत नसल्याने सुबोध बाथरूमचा दरवाजा तोडतो हा प्रसंग प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतो. 

Web Title: Majha Agadbam Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.