Luckee Marathi Movie Review : कथानकात फसलेला 'लकी'

By तेजल गावडे | Published: February 8, 2019 06:23 PM2019-02-08T18:23:40+5:302023-08-08T19:28:38+5:30

दिग्दर्शक संजय जाधवने देखील प्रेम व मैत्रीवर आधारीत सिनेमाची मेजवानी रसिकांना दिली आहे. मात्र यावेळेस त्याने प्रेम व मैत्रीच्या पलिकडे जाऊन बदला व वासना या गोष्टी अधोरेखित करण्याचे धाडस 'लकी' चित्रपटातून केले आहे.

Luckee Marathi Movie Review | Luckee Marathi Movie Review : कथानकात फसलेला 'लकी'

Luckee Marathi Movie Review : कथानकात फसलेला 'लकी'

Release Date: February 07,2019Language: मराठी
Cast: अभय महाजन, दीप्ती सती, मयूर मोरे
Producer: संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे Director: संजय जाधव
Duration: १ तास ५६ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे


आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत प्रेमावर आधारीत बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. दिग्दर्शक संजय जाधवने देखील प्रेम व मैत्रीवर आधारीत सिनेमाची मेजवानी रसिकांना दिली आहे. मात्र यावेळेस त्याने प्रेम व मैत्रीच्या पलिकडे जाऊन बदला व वासना या गोष्टी अधोरेखित करण्याचे धाडस 'लकी' चित्रपटातून केले आहे. 

'लकी' चित्रपटाची कथा आहे महाविद्यालयात शिकणाऱ्या लकी (अभय महाजन)ची. लकी मास मीडियाचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याहून मुंबईत दाखल होतो. तो महाविद्यालयात शिकणाऱ्या डॅशिंग जिया (दीप्ती सती)च्या प्रेमात पडतो. एकदिवस तिला टक लावून पाहत असताना ती त्याला पकडते आणि वाईट नजरेने तो पाहत असल्याचा तिला गैरसमज होतो. त्यामुळे रागाच्या भरात ती त्याच्या कानशीलात लगावते. ही बातमी संपूर्ण महाविद्यालयात वाऱ्यासारखी पसरते. तरीदेखील लकी जियाच्या विचारात मश्गुल असतो. मात्र लकीचा मित्र त्याला जियाने कानशीलात लगावली, त्याचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त करतो. या बदलाच्या नादात त्यांच्यामध्ये पैज लागते की लकीने जियाला प्रपोझ करायचे .लकी तिला प्रपोझ करायला जातो आणि तिच्या बॉयफ्रेंडचा मार खाऊन परत येतो. इतके सगळे होऊन देखील लकीचे जियावरील प्रेम कमी होत नाही. पण, मित्राच्या सांगण्यावरून लकी आपल्यामागे लागला आहे असे जियाला वाटते आणि तीसुद्धा लकीला धडा शिकवण्यासाठी शक्कल लढवते. जिया आणि लकी यांच्यातील जवळीक वाढावी यासाठी संकेत गोव्याला पिकनिक ठरवतो. पिकनिकला जिया आणि लकी एकमेकांच्या जवळ येतात का? लकी ही पैज जिंकणार का, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

'लकी' चित्रपटाची सुरूवात होते सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत व तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रीत झालेल्या 'खोल लकी तुझ्या जीवनाची गाथा...' या गाण्याने आणि लकी आपली गाथा सांगायला सुरूवात करतो. काहीही गरज नसताना हे गाणे सिनेमात टाकण्यात आल्याचे भासते. दिग्दर्शकाने सिनेमा विनोदी ढंगात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही प्रसंगात हा प्रयत्न फोल ठरल्याचे दिसून येते. तसेच लकीचे दोन वडील दाखवले असून ही गोष्टदेखील चित्रपट पाहताना खटकते. या चित्रपटाच्या उत्तरार्धात कथानक थोडेसे भरकटलेले वाटते. प्रेम व सेक्सने बदला या गोष्टींना दुय्यम स्थान देत निरोध (कंडोम)लाच जास्त महत्त्व दिल्याचे जाणवते. राजकीय गुंड्यांचे मागे लागणे व तिचा बॉयफ्रेंडने गोव्यात येणे आणि गुंडाच्या हातून मार खाऊन रुग्णालयात दाखल होणे. रुग्णालयातील टॉयलेटमध्ये निरोध वेडिंग मशीन असणे अशा बऱ्याच गोष्टी सिनेमा पाहताना खटकतात. निरोधच्या शोधात लकीला भेटलेली वेगवेगळी माणसे त्याला आपसूकच काय शिकवून जातात हे पडद्यावर पाहणे मजेशीर ठरते. कलाकारांच्या अभिनयाबाबत बोलायचे तर अभय महाजन, दीप्ती सती, मयूर मोरे या कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे. कलाकारांचा अभिनय, गाणी व विजय सोनी यांची सिनेमॅटोग्राफी चित्रपटाच्या जमेची बाजू ठरते. संजय जाधवच्या इतर सिनेमांप्रमाणे लकी सिनेमाबाबतही खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट काही अंशी रसिकांची निराशा करू शकतो, असे दिसत आहे. कथानक फसले असले तरी लकीचा अनलकी प्रवास रुपेरी पडद्यावर एकदातरी पाहायला हरकत नाही.

Web Title: Luckee Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.