इरसालपणाची खुमासदार 'भानगड'...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2016 12:46 PM2016-12-12T12:46:48+5:302017-01-06T17:29:41+5:30

बोभाटा चित्रपटाचा रिव्ह्यू.

इरसालपणाची खुमासदार 'भानगड'...! | इरसालपणाची खुमासदार 'भानगड'...!

इरसालपणाची खुमासदार 'भानगड'...!

googlenewsNext
Release Date: January 06,2017Language: मराठी
Cast: दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम,संजय खापरे,कमलेश सावंत,तेजा देवकर,इ.
Producer: साईनाथ राजाध्यक्ष , महेंद्रनाथDirector: अनुप जगदाळे
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
 
क गाव बारा भानगडी, असे बऱ्याचदा म्हटले जाते आणि त्याची आठवण 'झाला बोभाटा' हा चित्रपट करून देतो. व्यक्ती तितक्या प्रकृती, असे वर्णन करता येईल अशी गावातली इरसाल माणसे आणि त्यांनी घातलेला सावळागोंधळ म्हणजे हा चित्रपट आहे. अर्थात, या प्रकाराला विनोदी तडका असणार हे वेगळे सांगायला नको. त्याप्रमाणेच, या गावात एका प्रकरणाचा पार बोभाटा होतो आणि त्यातून काय धमाल उडते हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आहे. 

       या चित्रपटातले गाव हे कायम आदर्श गाव पुरस्कार मिळवणारे आहे. पण तेरड्याचा रंग तीन दिवस, या उक्तीप्रमाणे पुरस्कार सोहळा आटोपल्यावर या गावाचा चेहरा पार बदलून जातो आणि अस्वच्छता, भ्रष्टाचार, पाणीटंचाई आदी समस्या पुन्हा डोके वर काढतात. व्यसनमुक्तीला तर हरताळ फासला जातो. या गावाची गाडी सुरळीत व्हावी म्हणून या गावातले अप्पा सतत झटत असतात. पण त्यांचे उपदेश गावकऱ्यांच्या पचनी काही पडत नाहीत. मग अप्पा अनेक युक्त्या लढवतात आणि एके दिवशी अप्पांना गावातल्या एका प्रसंगावरून एक भन्नाट कल्पना सुचते. गावातल्या देवळाजवळ एक 'भानगड' होऊ घातली असल्याचे अप्पा हेरतात आणि पुढे त्याचा पार बोभाटा होतो. 

       चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी, या चित्रपटाचे पटकथा व संवादलेखक अरविंद जगताप यांच्या साथीने यातून एक भन्नाट अतरंगी प्रकार देण्याचा प्रयत्न केला आहे. जेवणाच्या थाळीत तोंडीलावण्याचे जे काम असते; ते इथे अधिकच चवदार झाले आहे. दोन घटका फूल टू टाईमपास करण्याचा या जोडगोळीचा मनसुबा चित्रपटातल्या कलावंतांनीही वाया जाऊ दिलेला नाही. पण चित्रपटाच्या पूर्वार्धात जी काही गंमत भरून राहिली आहे; ती उत्तरार्धात मात्र ओसरली आहे. त्यामुळे चित्रपटाचा आलेख खाली येतो. काही प्रसंग यापूर्वी पडद्यावर पाहिल्याचे विसरता येत नाही आणि अतिरंजितपणाचा तडकाही थोडा जास्त झाल्याचे जाणवते. बाकी कथेला चटपटीत संवादांची दिलेली फोडणी खुमासदार आहे आणि चित्रपट कंटाळवाणा होणार नाही याची घेतलेली खबरदारीही स्पष्ट दिसते.   

       दिलीप प्रभावळकर यांनी अप्पांच्या भूमिकेत 'न बोलूनही' बरेच काही साध्य केले आहे. मर्यादित संवाद हाती असताना, केवळ मुद्राभिनय आणि देहबोलीवर भूमिका तारून नेण्याची कसरत त्यांनी केली आहे. अर्थात, त्यांच्यासाठी तो डाव्या हातचा मळ आहे, हे विसरता येत नाही. कमलेश सावंत यांनी सरपंचाच्या भूमिकेत दमदार बॅटिंग केली आहे. भाऊ कदम आणि संजय खापरे यांना यात वेगळे काही करण्यास वाव नसला तरी त्यांनी योग्य ते रंग भरले आहेत. मयुरेश पेम याने नव्या पिढीतला गावरान हिरो फर्मास रंगवला आहे. तेजा देवकर (राणीसाहेब), मोनालिसा बागल (प्रिया), दिपाली अंबेकर (देवकी) यांच्यासह इतर कलावंतांची योग्य साथ चित्रपटाला मिळाली आहे. थोडक्यात काय तर, डोक्याला बिलकूल शॉट न देता घटकाभर निव्वळ करमणूक करणारा हा चित्रपट असल्याने, या 'भानगडीत' एकदा नाक खुपसायला काही हरकत नाही. 
 

Web Title: इरसालपणाची खुमासदार 'भानगड'...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.