farzand movie review : इतिहास पडद्यावर जिवंत करणारा फर्जंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:05 AM2018-05-31T10:05:04+5:302023-08-08T19:47:32+5:30

शिवाजी महाराजांची रणनीती, गनिमी कावा, त्यांनी लढलेल्या लढाया याविषयी आपण आजवर ऐकले, वाचले आहे. त्यांची ही रणनीती, गनिमी कावा, त्या काळात कोणत्या शस्त्रांचा वापर केला जायचा हे खूपच छान पद्धतीने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने फर्जंद या चित्रपटात दाखवले आहे.

Farzand movie review: Living screener Ferganda | farzand movie review : इतिहास पडद्यावर जिवंत करणारा फर्जंद

farzand movie review : इतिहास पडद्यावर जिवंत करणारा फर्जंद

Release Date: June 01,2018Language: मराठी
Cast: चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, प्रसाद ओक, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, गणेश यादव, प्रवीण तरडे, अस्ताद काळे, हरिश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखिल राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देशपांडे, समीर धर्माधिकारी
Producer: अनिरबान सरकारDirector: दिग्पाल लांजेकर
Duration: २ तास ३५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>प्राजक्ता चिटणीस

महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर योद्धा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमाने मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांना या लढाईत त्यांच्या अनेक मावळ्यांनी साथ दिली. त्यांच्या मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शालेय जीवनापासूनच शिकवला जातो. त्यांनी त्यांच्या शौर्यांनी अनेक गड कसे मिळवले, आपल्या जनतेचे रक्षण कसे केले हे आपण आजवर वाचले आहे. फर्जंद या चित्रपटात शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी  पन्हाळा गड कशाप्रकारे सर केला हे दाखवण्यात आले आहे. हा गड केवळ ६० मावळ्यांनी अतिशय कमी युद्ध शस्त्र असताना देखील केवळ साडे तीन तासात जिंकला. त्यांच्यासमोर अडीज हजारांचे मुघलाचे सैन्य असले तरी ते थोडे देखील डगमगले नाहीत. शिवाजी महाराजांच्या याच लढाईची आणि कोंडाजी फर्जंद या मावळ्याची शौरगाथा सांगणारा चित्रपट म्हणजे फर्जंद. फर्जंदबद्दल तशी सामान्यांना खूपच कमी माहिती आहे. इतिहासात त्याचा खूपच कमी उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. त्याने पन्हाळा गड मिळवण्यासाठी किती शर्थीचे प्रयत्न केले. हा शूरवीर कसा होता हे आपल्याला या चित्रपटातून जाणता येते. 
शिवाजी महाराजांची रणनीती, गनिमी कावा, त्यांनी लढलेल्या लढाया याविषयी आपण आजवर ऐकले, वाचले आहे. त्यांची ही रणनीती, गनिमी कावा, त्या काळात कोणत्या शस्त्रांचा वापर केला जायचा हे खूपच छान पद्धतीने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने फर्जंद या चित्रपटात दाखवले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पडद्यावर साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. पण दिग्पालने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. फर्जंद हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे हे एकाही दृश्यात आपल्याला  जाणवत नाही हेच त्याचे यश आहे.
शिवाजी महाराजांचे किल्ले, शिवरायांचा दरबार, तो काळ लोकांसमोर मांडण्यासाठी चित्रपटात वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटात वीएफएक्समुळे तो काळ जशाच्या तसा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यामुळे चित्रपट पाहाताना नकळतपणे आपण देखील त्या काळात जातो. तसेच चित्रपटाचे संवाद, या चित्रपटात वापरलेली भाषा आपल्याला त्या काळाची नक्कीच आठवण करून देते. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची रंगभूषा, वेशभूषा मस्त जमून आली आहे. तसेच या चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारची अनेक शस्त्रे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहाताना मराठी चित्रपटसृष्टीत आजवर कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटावर इतकी मेहनत घेण्यात आली नव्हती असेच वाटते. या चित्रपटात अनेक साहसी दृश्यं आहेत. ही दृश्ये देखील बॉलिवूडच्या तुलनेची आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ही साहसी दृश्ये पाहाताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाचे पार्श्वसंगीत, चित्रपटाची गाणी अफलातून आहेत. कोणतेही गाणे चित्रपटात उगाचच टाकले आहे असे वाटत नाही. 
या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने ही भमिका पडद्यावर अक्षरशः जिवंत केली आहे. तसेच बर्हिजी नाईक यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकने या चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याने सगळ्याच व्यक्तिरेखांना खूपच छान न्याय दिला आहे. समीर धर्माधिकारीने साकारलेला बेशक खान प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहातो. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊ, गणेश यादव यांनी तानाजी मालुसरे, अजय पुरकर यांनी मोत्याजी मामा, निखील राऊतने किसना, प्रवीण तरडे यांनी मारत्या रामोशी, आस्ताद काळेने गुंडोजी, हरिश दुधाडेने गणोजी, राहुल मेहेंदळेने अनाजी पंत, मृण्मयी देशपांडेने केसर, अंशुमन विचारेने भिकाजी या भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या कलाकारांनी चित्रपटात इतके चांगले काम केले आहे की, या व्यक्तिरेखा त्यांच्याशिवाय दुसरा कोणता कलाकार चांगला साकारूच शकला नसता असे आपल्याला जाणवते. चित्रपटाच्या कास्टिंगसाठी दिग्दर्शकाचे करावे तितके कौतुक कमी आहे. तसेच चित्रपटात अनेक कलाकार असले तरी प्रत्येक व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यात आला आहे. या चित्रपटात आपले विशेष लक्ष वेधून घेतो तो म्हणजे फर्जंदच्या भूमिकेत असलेला अंकित मोहन. अंकितने या भूमिकेत त्याला झोकून दिले आहे असे म्हणावे लागेल. अंकित हा अमराठी असला तरी त्याच्या संवादातून, देहबोलीतून हे आपल्याला थोडे देखील जाणवत नाही. केवळ चित्रपटाचे संकलन तितकेसे चांगले झाले नसल्याचे काही वेळा जाणवते. तसेच चित्रपटाची लांबी थोडी कमी करता आली असती असे वाटते. पण काहीही असले तरी शिवरायांचा इतिहास या चित्रपटाच्या टीमने पडद्यावर अक्षरशः जिवंत केला आहे. या चित्रपटाची सिनेमेटॉग्राफी देखील खूपच छान झाली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक पान असलेला हा फर्जंद चित्रपटगृहातच जाऊन नक्कीच पाहाण्यासारखा आहे. 

Web Title: Farzand movie review: Living screener Ferganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.