Saheb Biwi aur Gangster 3 film review: रूक्ष आणि क्लिष्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 01:46 PM2018-07-27T13:46:19+5:302023-08-08T20:09:54+5:30

आधीच्या दोन भागांप्रमाणेच ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हाही अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा चित्रपट आहे, हे नव्याने सांगायला नकोच.

Saheb Biwi aur Gangster 3 film review | Saheb Biwi aur Gangster 3 film review: रूक्ष आणि क्लिष्ट!!

Saheb Biwi aur Gangster 3 film review: रूक्ष आणि क्लिष्ट!!

Release Date: July 27,2018Language: हिंदी
Cast: संजय दत्त, चित्रांगदा सिंग, माही गिल, जिमी शेरगिल
Producer: राहुल मित्राDirector: तिग्मांशू धूलिया
Duration: २ तास २० मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत


2011 मध्ये प्रदर्शित झालेला तिग्मांशू धूलिया यांचा ‘साहेब, बीवी और गँगस्टर’ हा गुरुदत्त यांच्या ‘साहेब, बीवी और गुलाम’च्या धर्तीवर साकारलेला चित्रपट. सत्तेचा भुकेला एक रंगेल राजा, त्याचे प्रेम जिंकू पाहणारी पण राजाकडून कायम अवहेलना झेलणारी एक एकाकी राणी आणि त्या राणीला जिवापाड जपू पाहणारा तिचा गुलाम असे गुरूदत्तच्या कथेतील त्रिकूट. गुरूदत्त यांनी पडद्यावर रंगवलेल्या याच कथेतील ‘गुलाम’ गाळून तिग्मांशू धूलिया यांनी त्याजागी एक गँगस्टर आणला आणि बदलत्या काळासह ‘साहेब, बीवी और गँगस्टर’ हा चित्रपट पडद्यावर आणला. पुढे याचा दुसरा भाग आला आणि आज याच चित्रपटाची तिसरी आवृत्ती म्हणजे, ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’रिलीज झाला. आधीच्या दोन भागांप्रमाणेच ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हाही अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा चित्रपट आहे, हे नव्याने सांगायला नकोच.
एकापेक्षा एक भ्रष्ट आणि सत्तालोलूप लोक, सत्ता आणि पैसा कमावण्याच्या त्याच्या डोक्यातल्या एकापेक्षा एक वरचढ योजना असे सगळे या चित्रपटात आहे. ‘साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न’ या दुस-या भागाची कथा जिथे संपते, तिथून ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ची कथा सुरु होते. माधवी (राणी- माही गिल) आता एक प्रभावी राजकीय महिला नेता बनलेली असते. लोकांचे पैशाचे आणि संपत्तीचे वाद निकाली काढणे, राजकीय वाटाघाटींमध्ये पुढाकार घेणे अशा कामातून तिने राजकारणात आपला  दबदबा निर्माण केलेला असतो. पण यासोबतचं तिच्या व्यभिचाराचे किस्सेही प्रसिद्ध असतात. घराचा अख्खा कारभार आणि सवत रंजना (सोहा अली खान) अशी सगळी सूत्रे ती आपल्या हातात घेते. आदित्य प्रताप सिंग (राजा, जिमी शेरगिल) तुरुंगात खितपत पडलेला असतो. पण तिथून बाहेर पडल्यावर आपल्या पत्नी आणि कुटुंबापेक्षा शत्रूंवर सूड उगवून गेलेले वैभव परत कसे मिळवायचे, या स्वप्नरंजनात तो मश्गुल असतो. इकडे रंजनाचे दारूचे व्यसन इतके वाढते की, तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. याच समीकरणात उदय प्रताप सिंग (गँगस्टर, संजय दत्त) याची एन्ट्री होते. उदय प्रताप सिंग एका राज्याचा राजकुमार असूनही त्याचा रागीत स्वभाव आणि अविवेकीपणामुळे हद्दपार झालेला असतो. उदय प्रताप लंडनमध्ये एक नाईट क्लब चालवत असतो. रशिय रौलेट हा गेम जिंकून (हा एक अतिशय धोकादायक असा रशियन गेम आहे. या गेममधील बंदुकीत केवळ एक गोळी असते. खेळाडू बंदुकीचा सिलेंडर फिरवतो आणि बंदुक आपल्या कानशीलाला लावून ट्रिगर दाबतो.)  उदयप्रतापने लंडनचा हा नाईटक्लब जिंकलेला असतो. लग्न झालेले असूनही त्याचे सुहानी (चित्रांगदा सिंह) नावाच्या डान्सरवर प्रेम असते. या नाईटक्लबमध्ये उदयच्या हातून रागाच्या भरात एक अपघात होतो आणि तो भारतात परततो. भारतात त्याला आपल्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटा हवा असतो. पण त्याचे वडिल आणि भाऊ त्याला विरोध करतात. याचदरम्यान योगायोगाने त्याची नि माधवीची ओळख होते आणि पुढे घनिष्ठ मैत्रीही. ह्या मैत्रीपोटी माधवी उदयला एका खोट्या खुनाच्या प्रकरणातून वाचवते आणि या मोबदल्यात उदय सहजासहजी पूर्ण करू शकणार नाही, अशी किंमत मागते. उदय व माधवी कसे एकत्र येतात, सत्तेपोटी कोण कुणाचा वापर करून घेतो, हीच या चित्रपटाची कथा आहे आणि मुळात ही कथाच या चित्रपटासाठी डावी ठरलीय.
‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ची अति क्लिष्ठ कथा डोके जड करते. चित्रपटाचा गाभा आणि मध्यवर्ती कथा उलगडण्यातचं चित्रपटाचा बराच भाग खर्ची पडतो. सतराशे साठ व्यक्तिरेखा आणि या प्रत्येक व्यक्तिरेखेची पार्श्वभूमी पाहता पाहता वैताग येतो. रंजनाचा विश्वासू नोकर आणि त्याची इंग्लिश बोलणारी मुलगी दीपल, रंजनाचे वडिल, त्यांचा स्त्रीलंपट पुतण्या, उदय प्रतापचे भ्रष्ट वडिल व भाऊ आणि त्यांची आई अशा अनेकांचा भूतकाळ सांगता सांगता चित्रपटाचा मध्यांतर होतो आणि मध्यवर्ती कथाचं विसरली जाते. आदित्य प्रताप सिंग आणि माधवीचे गुंतागुंतीचे संबंध आणि त्यांचे परिस्थितीसापेक्ष बदलणे हे एवढे सोडले तर कथेत कुठलेच स्थैर्य नाही. अभिनयाची गोष्ट कराल तर जिमी आणि माही यांनी आपआपल्या व्यक्तिरेखा कोळून प्यायल्या आहेत. पण संजय दत्त आणि चित्रांगदा हे दोघेही चित्रपटाच्या चौकटीत कुठेचं बसत नाहीत. खूप सा-या व्यक्तिरेखा आणि अनपेक्षित वळणांमुळे कथा हळूहळू निरस वाटू लागते. मध्यांतरानंतर तर हा चित्रपट वैताग आणतो. चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेची नैतिकता अतियश साशंक असल्यामुळे माधवी वगळता कथेतील अन्य कुठल्याही पात्राशी एकरूप होता येत नाही. फ्रान्चाईजी चालवण्याच्या नादात दिग्दर्शकाने जबरदस्तीची कथा आणली आणि त्यात जबरदस्तीची नाट्यमय वळणं गोवलीत, असेच चित्रपट पाहताना जाणवते. एकंदर काय तर चित्रपट टाळला तरी चालू शकेल.

Web Title: Saheb Biwi aur Gangster 3 film review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.