Prasthanam Movie Review : Ali Fazal and Sanjay dutt's one of the best performance | Prasthanam Movie Review : राजकारणाच्या पटलावरचा खेळ
Prasthanam Movie Review : राजकारणाच्या पटलावरचा खेळ
Release Date: September 20,2019Language: हिंदी
Cast: संजय दत्त, मनिषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, सत्यजीत दुबे, चाहत खन्ना आणि अली फजल
Producer: मान्यता दत्तDirector: देव कट्टा
Duration: 2 तास 21 मिनिटेGenre: नाटक

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देसंजय दत्तने या चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका खूपच चांगल्याप्रकारे वठवली आहे. संजयच्या कमबॅकसाठी हा चित्रपट नक्कीच फायदेशीर ठरेल.

राजनीती, सत्याग्रह असे पॉलिटिकल ड्रामावर आधारित चित्रपट आपल्याला अलीकडच्या काळात पाहायला मिळाले आहेत. प्रस्थानम हा चित्रपट देखील याच साच्यातील असून सत्ता, पैसा मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती काय काय करतो हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.

बलदेव प्रताप सिंग (संजय दत्त) हा मुरलेला राजकारणी असतो. त्याचे लग्न सुक्मिनी (मनिषा कोईराला) सोबत झालेले असते. मनिषाला पहिल्या पतीकडून आयुष (अली फजल) आणि पलक (चाहत खन्ना) अशी दोन मुले असतात तर संजय आणि मनिषा यांना विवान (सत्यजीत दुबे) हा मुलगा असतो. आपला राजकीय वारसा केवळ आयुष सांभाळू शकतो याची खात्री बलदेव प्रताप सिंगला असल्याने तो आपली राजकीय कामं त्याला सोपावत असतो. पण विवानला राजकारणात रस असतो. वडिलांचा राजकीय वारसा मलाच मिळावा असे त्याला वाटत असते. पण विवान हा केवळ मित्रांसोबत दंगामस्ती करण्यात रमत असतो. तसेच तो दारू, ड्रग्सच्या अधीन गेलेला असतो. त्यामुळे त्याला राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बलदेव करतो. पण त्याचदरम्यान बलदेवच्या अतिशय जवळचा मानल्या जाणाऱ्या बादशहाच्या (जॅकी श्रॉफ) मुलीवर विवान बलात्कार करतो आणि तिला मारून टाकतो. या सगळ्यात बलदेव विवानला वाचवतो का, विवान आणि आयुषमध्ये राजकीय वारसदार म्हणून बलदेव कोणाच्या नावाची घोषणा करतो. तसेच केवळ राजकारणामुळे किती जणांचा बळी जातो हे सगळे तुम्हाला प्रस्थानम या चित्रपटात पाहायला मिळते.

प्रस्थानम हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट प्रस्थानमचा रिमेक आहे. संजय दत्तच्या या चित्रपटाची आणि मुळ चित्रपटाची कथा अगदी सारखीच असल्याने दाक्षिणात्य चित्रपट पाहिलेल्यांना या चित्रपटाच्या कथेत काहीच नावीन्य वाटणार नाही. पण हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर आता पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच निर्माण होते. कारण या चित्रपटात खूपच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. केवळ हा चित्रपट काही ठिकाणी खूपच ताणल्यासारखा वाटतो. तसेच मध्यांतरापर्यंत चित्रपट खूपच संथ वाटतो. मध्यांतरापर्यंत केवळ व्यक्तिरेखांची ओळख दाखवण्यातच वेळ घालवण्यात आला आहे. तसेच चित्रपटात काही व्यक्तिरेखा उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. आयुषची प्रेयसी या चित्रपटात दाखवण्यात आली नसती तरी चालली असती असे चित्रपट पाहाताने जाणवते. तसेच काही व्यक्तिरेखांना लेखकाने योग्य न्याय दिलेला नाहीये.

संजय दत्तने या चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका खूपच चांगल्याप्रकारे वठवली आहे. संजयच्या कमबॅकसाठी हा चित्रपट नक्कीच फायदेशीर ठरेल. तसेच जॅकी श्रॉफने चांगले काम केले आहे. पण त्याची व्यक्तिरेखा चित्रपटात योग्यप्रकारे मांडण्यात आलेली नाही. तसेच मनिषा कोईरालाच्या भूमिकेला देखील तितकासा वाव देण्यात आलेला नाही. पण तरीही मनिषाच्या वाट्याला आलेली भूमिका तिने चांगल्याप्रकारे सादर केली आहे. चंकी पांडेने साकारलेला खलनायक चांगलाच लक्षात राहातो. तसेच चाहत खन्ना आणि सत्यजीत दुबेने देखील चांगला अभिनय केला आहे. पण खरी दाद अली फजलला द्यावी लागेल. तो आयुष हा भूमिका अक्षरशः जगला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले झाले आहे. पण चित्रपटातील एकही गाणे ओठावर रुळत नाही. तसेच गाणी चित्रपटात कुठेही टाकण्यात आली आहेत. राजनीती की गद्दी विरासत में नही काबिलियत से मिलती है, सिम्पथी है या शहानपती है पब्लिक को सोचना है यांसारखे चित्रपटाचे संवाद चांगलेच जमून आले आहेत. एक पॉलिटिकल ड्रामा पाहायचा असेल तर प्रस्थानम हा चित्रपट नक्कीच पाहा... 

Web Title: Prasthanam Movie Review : Ali Fazal and Sanjay dutt's one of the best performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.