My Birthday Song Review : भरकटलेला माय बर्थडे साँग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 12:03 PM2018-01-19T12:03:37+5:302023-08-08T19:16:16+5:30

माय बर्थडे साँग या चित्रपटात संजय सुरी आणि नोरा फतेही यांच्या मुख्य भूमिका आहेत. समीर सोनी या अभिनेत्याने एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

My Birthday Song Review: Launched My Birthday Song | My Birthday Song Review : भरकटलेला माय बर्थडे साँग

My Birthday Song Review : भरकटलेला माय बर्थडे साँग

Release Date: January 19,2018Language: हिंदी
Cast: संजय सुरी, नोरा फतेही
Producer: संजय सुरीDirector: समीर सोनी
Duration: १ तास ३५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
>काही चित्रपट पाहात असताना त्या चित्रपटात काय सुरू आहे हेच आपल्याला कळत नाही. कथा कोणत्या दिशेने जात आहे याचा काहीही थांगपत्ताच लागत नाही. तसाच काहीसा हा माय बर्थडे साँग हा चित्रपट आहे. हा चित्रपट सुरू झाल्यानंतर काही मिनिटानंतर या चित्रपटाचा नायक झोपेतून उठताना आपल्याला दिसतो. पण पुढे काय सुरू आहे हे आपल्याला काहीच कळत नाही. त्याला काही वाईट स्वप्न पडले आहे का? की काही खरंच घडले आहे. जर हे सगळे स्वप्न होते तर त्या गोष्टी प्रत्यक्षात कशा काय घडत आहेत यांसारखे अनेक प्रश्न आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीलाच पडतात. समीर सोनी या अभिनेत्याने एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. पण हा चित्रपट पाहाताना आपण प्रचंड कन्फ्युज होतो. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्याचे म्हटले जात होते. पण हा चित्रपट पाहाताना आपण एखाद्या भूलभूलैय्यामध्ये अडकलो आहोत असेच आपल्याला वाटते. चित्रपटाला जी काही वळणं मिळतात, त्यामुळे चित्रपटात काही रहस्यमय आहे असे आपल्याला वाटतच नाही. 
बर्थडे साँग या चित्रपटाची कथा राजीव कौल (संजय सुरी) भोवती फिरते. तो एका भल्यामोठ्या जाहिरात कंपनीचा मालक असतो. अतिशय श्रीमंत असलेल्या राजीवच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. राजीवचा ४० वा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी त्याच्या पत्नीने एक पार्टी ठेवलेली असते. पण त्याच्या पत्नीची आजी अचानक आजारी पडल्यामुळे तिला आजीकडे जावे लागते आणि त्यामुळे राजीव एकटाच सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार करतो. याच पार्टीमध्ये राजीव सँडी (नोरा फतेही)ला भेटतो. सँडीला त्याने त्याच्या आयुष्यात कधीही पाहिलेले नसते. ती विक्रम नावाच्या तिच्या एका मित्रासोबत पार्टीला आलेली असते. सँडीला पाहाताच क्षणी राजीव तिच्या प्रेमात पडतो आणि सँडीलाही तो आवडतो. पार्टीमध्ये ते जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबतच घालवतात. राजीवची पत्नी आणि मुलं घरी नसल्याने सँडी ती रात्र राजीवच्या घरी त्याच्यासोबत घालवायची ठरवते. सगळे गेल्यावर राजीव आणि सँडी एकमेकांच्या खूपच जवळ येतात. पण त्याचवेळी सँडीच्या डोक्यावर कोणीतरी काचेचा ग्लास मारतो आणि त्यात तिच्या डोक्याला प्रचंड दुखापत होऊन तिचा मृत्यू होतो. या सगळ्या घटनेमुळे राजीव प्रचंड घाबरतो आणि खूप दारू पितो, तसेच काही गोळ्या घेऊन झोपून जातो. पण सकाळी उठल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. कारण तो उठल्यानंतर तिथे सँडीची डेडबॉडी नसते. उलट सगळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात काहीच घडले नाही, केवळ आपण स्वप्न पाहिले होते असे समजून राजीव खूश होतो. पण जसजसा दिवस पुढे जातो, तसतसे पार्टीत त्याला त्याच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या खऱ्या असल्याचे त्याच्या लक्षात येते. तसेच त्याच्या एका जाहिरातीच्या कॅम्पेनसाठी तो सँडीसारख्या दिसणाऱ्याच मुलीची निवड करतो आणि एवढेच नव्हे तर या मुलीसोबत त्याचे काही काळ अफेअर देखील असते. 
राजीवने स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींप्रमाणे खऱ्या आयुष्यात देखील गोष्टी घडत आहेत हे कळल्यावर राजीव घाबरतो आणि संध्याकाळच्या पार्टीत तू कोणत्या मैत्रिणीला घेऊन येणार आहेस का असे विक्रमला फोन करून विचारतो. त्यावर मी एका मैत्रिणीला घेऊन येणार आहे असे विक्रम सांगतो. विक्रमने हे सांगितल्यावर क्षणाचाही विलंब न लावता राजीव सँडीला भेटण्यासाठी तिच्या हॉटेल रूमवर जातो. पण सँडीची हत्या झालेली असते. सँडीची हत्या झालेली आहे हे पाहाताच राजीव तिथून पळून जातो. पण पळताना तो त्याचा मोबाईल तिथे विसरतो. मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यास सँडीच्या खुनाचा संशय राजीववर येऊ शकतो असे राजीवला वाटल्याने तो मोबाईल घ्यायला परत जातो. पण यावेळी तिथे काहीच घडलेले नसते. त्यामुळे हा चित्रपट पाहाताना आपल्याला चित्रपटात काय घडत आहे हे काहीच कळत नाही. चित्रपटाच्या कथानकाला अनेक वळणं मिळत असली तरी त्याचा कथेशी कुठेच संबंध लागत नाही. कधी चित्रपटात त्याची पत्नी त्याला फसवतेय असे आपल्याला वाटते तर कधी त्याचे मित्र त्याच्याशी खोटं बोलत आहेत असे वाटते. तसेच तो झोपेच्या गोळ्या घेत असल्याचे देखील दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या सगळ्या त्याच्या भ्रामक कल्पना आहेत का असे चित्रपट पाहाताना अनेकवेळा वाटते. तसेच राजीवचे वडील आणि त्याची सावत्र आई यांच्यात सतत भांडणे दाखवली आहेत. त्यामुळे चित्रपटात कशाचा काहीच संबंध नसल्याचे जाणवते. चित्रपट मध्यांतरापर्यंत येवढा भूलभूलैय्या बनतो की, चित्रपट पाहाण्यात काहीच रस उरत नाही. 
संपूर्ण चित्रपटात संजय सुरी अतिशय दुःखी असलेला पाहायला मिळतो. तसेच इतर व्यक्तिरेखा देखील काहीशा निराशच वाटतात. तसेच चित्रपटात काय सुरू आहे हे काहीच कळत नाही. या सगळ्यामुळे हा चित्रपट तुम्ही टाळला तर उत्तमच.
 
 

Web Title: My Birthday Song Review: Launched My Birthday Song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.