Mukkabaaz Movie Review : बॉक्सिंगमध्ये नव्हे जातीय राजकारणात भरकटला ‘मुक्काबाज’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 02:25 PM2018-01-11T14:25:07+5:302018-01-11T20:57:37+5:30

‘काही चांगले सीन्स असतानाही नॉकआउट चित्रपट बनत नाही’ याचा प्रत्यय ‘मुक्काबाज’ या चित्रपटात येतो. कारण स्वॅगवाला अभिनेता असतानाही हा चित्रपट फारसा प्रभाव पाडताना दिसत नाही. चित्रपट म्हणून बघितले तर ‘मुक्काबाज’ नक्की काय आहे हे सांगणे अवघड जाते. क्रीडापट, रोमॅण्टिक लव्हस्टोरी, गॅँगस्टरचा संघर्ष आणि सुडाचा प्रवास या सर्वांची सरमिसळ म्हणजेच हा चित्रपट असावा, असे वाटते. त्यामुळेच या चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीचे विषम प्रमाण क्षणोक्षणी दिसते. मग प्रेक्षकांचा गोंधळ झाला तर नवल वाटू नये.

Mukkabaaz Movie Review : बॉक्सिंगमध्ये नव्हे जातीय राजकारणात भरकटला ‘मुक्काबाज’! | Mukkabaaz Movie Review : बॉक्सिंगमध्ये नव्हे जातीय राजकारणात भरकटला ‘मुक्काबाज’!

Mukkabaaz Movie Review : बॉक्सिंगमध्ये नव्हे जातीय राजकारणात भरकटला ‘मुक्काबाज’!

googlenewsNext
Release Date: January 11,2018Language: हिंदी
Cast: जिमी शेरगिल, रवि किशन, विनीत कुमार सिंग, जोया हुसेन, नवाजुद्दीन सिद्दीकी
Producer: अनुराग कश्यपDirector: अनुराग कश्यप
Duration: २ तास ३५ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत 

‘काही चांगले सीन्स असतानाही नॉकआउट चित्रपट बनत नाही’ याचा प्रत्यय ‘मुक्काबाज’ या चित्रपटात येतो. कारण स्वॅगवाला अभिनेता असतानाही हा चित्रपट फारसा प्रभाव पाडताना दिसत नाही. चित्रपट म्हणून बघितले तर ‘मुक्काबाज’ नक्की काय आहे हे सांगणे अवघड जाते. क्रीडापट, रोमॅण्टिक लव्हस्टोरी, गॅँगस्टरचा संघर्ष आणि सुडाचा प्रवास या सर्वांची सरमिसळ म्हणजेच हा चित्रपट असावा, असे वाटते. त्यामुळेच या चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीचे विषम प्रमाण क्षणोक्षणी दिसते. मग प्रेक्षकांचा गोंधळ झाला तर नवल वाटू नये. 

मुक्काबाजचे कथानक श्रावण सिंग (विनित कुमार सिंग) याच्या अवतीभोवती फिरते. बरेलीसारख्या लहान शहरात हा नायक राष्टÑीय स्तरावरचा मुष्टीयौद्धा होण्यासाठी प्रयत्न करीत असतो. श्रावणचे हे सगळे प्रयत्न स्थानिक बॉक्सिंग असोसिएशनचा प्रमुख भगवानदास मिश्रा (जिमी शेरगिल) याच्याशी संबंधित असते. श्रावणला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली भगवानदास त्याच्याकडून इतर कामे करून घेत असतो. याला श्रावण विरोध करतो. त्याचा परिणाम दोघांमधील संघर्षात होतो. पर्यायाने श्रावण पुढे प्रत्येक निवड चाचणीतून बाहेर फेकला जात असतो. या अडचणीत आणखी एक भर पडते, ती त्याच्या प्रेयसीची. तिचे नाव सुनैना (जोया हुसेन), ती भगवानदासची पुतणी असते. श्रावण आणि सुनैना एकमेकांच्या प्रेमात पडतात. सुनैनाच्या वडिलांचे म्हणणे असते की, श्रावणने लग्नाची परवानगी घेण्याअगोदर नोकरी मिळवावी. स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळविण्यासाठी श्रावणला अनेक सामन्यांतून जायचे असते. त्यासाठी भगवानदासची मर्जी मिळवणे त्याला गरजेचे असते. पण भगवानदास त्याचा झालेला अपमान विसरलेला नसतो. तो श्रावणचे करिअर संपविण्याचे ठरवितो. 

या अडचणीतून मार्ग काढत असतानाच नायक बरेलीऐवजी बनारसमधील सामने खेळतो. तिथे त्याच्यावर बॉक्सिंगचे प्रशिक्षक असलेल्या कुमारची (रविकिशन) नजर पडते. तो त्याला प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देऊ इच्छितो. तो तसे करतोही. सुनैनाचे पालक त्याला पाठिंबा देतात, त्याचबरोबर भगवानदासचे मन वळविण्याचाही प्रयत्न करतात. परंतु भगवानदास आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सुनैनाचे आई-वडील त्याच्यासोबतचे नाते तोडतात. 

याठिकाणी चित्रपट लव्हस्टोरी/क्रीडापटावरून जातीय संघर्षावर जातो. भगवानदास कुमारला खालच्या जातीतला म्हणून त्याच्यावर एका जमावाकडून हल्ला करवतो. त्याच्यावर गोमांस खाल्ल्याची तक्रारही दाखल करतो. पुढे श्रावण रेल्वेत नोकरी मिळवतो पण, शिपाईच्या नोकरीत त्याचे मन लागत नाही. या चित्रपटात जातीय राजकारण, आरक्षण याच्यावर बराच वेळ घातला आहे. एकदा कुमारला आयसीयूत दाखल करावे लागत असते. श्रावणही जखमी झोलला असतो तेव्हा चित्रपट आणखी एक वळण घेतो. येथे सुडाचा प्रवास सुरू होतो. भगवानदास त्याच्या भावाची बायको आणि सुनैनाचे अपहरण करतो. तो त्याच्या भावाचे पाय तोडतो. त्याचबरोबर त्याच्या पत्नीला धमकाविताना म्हणतो की, मी तुझी मुलगी सुनैनाला अमली पदार्थ देईल, जर तुला हे नको असेल तर त्याच्याच जातीतला अन् त्याच्या निवडीतल्या मुलाशी तिचं लग्न करून दे. श्रावणला आता बॉक्सिंगच्या राष्टÑीय सामन्यातच नाही तर सुनैनालाही शोधायचे असते. 

चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या भागात पाणी डोक्यावरून जाते. तर दुसºया अर्ध्या भागात प्रेक्षक गोंधळात जातो. या चित्रपटाची अडचण अशी आहे की, यात खूप गुंतागुंत आहे. सामाजिक, सांस्कृतिक संघर्ष दाखविताना अनुराग कश्यपने फारच गुंतागुंत करून टाकली आहे. भगवानदास एका दृश्यात श्रावणला त्याचे मूत्र पिण्यास सांगतो. तर एका दृश्यात श्रावणचा बॉस त्याच्या पॅण्टमध्ये लघवी करतो. तसेच त्याचे चित्रण करतो. या गोष्टी अतिरंजीत आहेत. नवाजुद्दीन सिद्दिकी तर अशा कपड्यात दाखविला आहे की, ते अतीच वाटते. 

एकूणच चित्रपटाचे कथानक अगदीच दुबळे आहे. विनित कुमार सिंगने कथानकावर त्याच्या अभिनयाची छाप पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. पण तोही काही ठिकाणी चुकलेला आहे. त्याच्या वडिलांशी तो उद्धटपणे बोलतो, पण त्याच्या बॉससमोर तो अगदीच शांत राहतो. रवि किशनने मात्र चांगली भूमिका निभावली आहे. जिमी शेरगिलसोबतचे त्याचे संवाद बºयापैकी चांगले आहेत. मात्र अशातही पात्र अपेक्षित अशी छाप सोडत नाहीत. खलनायक म्हणून भगवानदासच्या भूमिकेत त्याचा जातीयवाद आणि हुकूमशाही स्वभाव जिमी शेरगिलने बºयापैकी साकारला आहे. भगवानदाससारखा बाहुबली इतक्या प्रमाणात त्याची ऊर्जा हिंसेत, अन्यायात घालवितो, यावर विश्वास बसत नाही. एका टप्प्यावर तर सारख्या-सारख्या त्याच भूमिका करून जिमी शेरगिलही कंटाळलेला वाटतो. 

सुनैना हे पात्रसुद्धा प्रत्येक टप्प्यावर दुबळेच वाटले आहे. श्रावण तिच्यावर प्रेम का करतो? तिला का सहन करतो? आणि तिच्यावर एवढा जीव का ओवाळून टाकतो? हेही लक्षात येत नाही. स्त्रीवादी वक्तव्य करताना तिला अतिरंजीत करण्यात आले आहे. प्रियकर एवढा अडचणीत असतानाही त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी शोधण्याचा ती प्रयत्न करताना दिसत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा चित्रपट लवकरच तुम्हाला टीव्हीवर बघता येईल. 

Web Title: Mukkabaaz Movie Review : बॉक्सिंगमध्ये नव्हे जातीय राजकारणात भरकटला ‘मुक्काबाज’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.