Khandaani Shafakhana Movie Review : sonakshi sinha's fabulous performance | Khandaani Shafakhana Movie Review : लैंगिक समस्यांवर खुलेपणाने भाष्य करणारा खानदानी शफाखाना
Khandaani Shafakhana Movie Review : लैंगिक समस्यांवर खुलेपणाने भाष्य करणारा खानदानी शफाखाना
Release Date: August 02,2019Language: हिंदी
Cast: सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, कुलभुषण खरबंदा, अन्नू कपूर, बादशहा
Producer: भुषण कुमार, महावीर जैन, मृगदीप सिंग लाम्बा, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमारDirector: शिल्पी दासगुप्ता
Duration: २ तास १८ मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देसेक्स या विषयावर खुलेपणाने चर्चा करणारा हा चित्रपट असला तरी या चित्रपटात कोणताच अश्लीलपणा नाहीये, ही या चित्रपटाची एक जमेची बाजू आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने खूपच चांगले काम केले आहे.

प्राजक्ता चिटणीस

बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून खूपच वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवले जात आहेत. विकी डोनर, शुभ मंगल सावधान या चित्रपटांद्वारे समाजात खुलेपणाने चर्चा न केल्या जाणाऱ्या लैंगिक समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे आणि आता खानदानी शफाखाना हा चित्रपट देखील त्याच पठडीतील आहे. 

बेबी (सोनाक्षी सिन्हा) ही पंजाबमधील एका शहारात आपल्या आई आणि भावासोबत राहात असते. मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी काकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न तिला सतत सतावत असतो. ती एमआर म्हणून नोकरी करत असते तर तिचा भाऊ (वरुण शर्मा) अतिशय आळशी असून घर चालवायचे, पैसे कमवायचे या गोष्टीशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी बेबीवर असते. बेबीचा मामा (कुलभुषण खरबंदा) खानदानी शफाखाना हे क्लिनिक चालवत असतो. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या या क्लिनिकची जबाबदारी ते बेबीच्या खांद्यावर सोपावतात. तसेच त्यांची काही प्रॉपर्टी देखील तिच्या नावावर करतात. पण तिने सहा महिने क्लिनिक चालवले तरच तिला प्रॉपर्टी मिळेल अशी अट त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेली असते. घरात सुरू असलेल्या आर्थिक संकटांमुळे बेबी हे क्लिनिक चालवायचे ठरवते. एक मुलगी असल्याने हे क्लिनिक चालवताना तिला किती समस्यांचा सामना करावा लागतो आणि ती या सगळ्यावर कशाप्रकारे मात करते हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते. 

चित्रपटाची कथा ही हटके असून ती चांगल्याप्रकारे मांडण्यात आलेली आहे. केवळ चित्रपट खूपच संथ आहे. तसेच चित्रपट पाहाताना पुढे काय होणार याची कल्पना आधीच येत असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता राहात नाही. चित्रपट काही ठिकाणी उगाचच ताणला असल्याचे देखील जाणवते. चित्रपटाची लांबी काही मिनिटांनी कमी करता आली असती. चित्रपटाची गाणी देखील ओठावर रुळत नाहीत. पण बेबीने क्लिनिक चालवायचा निर्णय घेतल्यानंतर लोक तिच्याकडे कशा नजरेने पाहातात, एका मुलीशी लैंगिक आजारावर कसे बोलायचे असा प्रश्न पडत असल्याने तिच्या रुग्णांची तिच्याशी बोलताना अवस्था कशी होते, तिच्याशी बोलताना ते लाजत असल्याने ते प्रत्यक्ष न बोलता सांकेतिक भाषेत तिच्याशी बोलतात या गोष्टी चित्रपटात खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आल्या आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एक सामाजिक संदेश देत चित्रपटाचा शेवट करण्यात आला आहे. सेक्स या विषयावर खुलेपणाने चर्चा करणारा हा चित्रपट असला तरी या चित्रपटात कोणताच अश्लीलपणा नाहीये, ही या चित्रपटाची एक जमेची बाजू आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने खूपच चांगले काम केले आहे. तिने तिच्या एकटीच्या खांद्यांवर हा चित्रपट पेलला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटाद्वारे बादशहा आणि प्रियांश जोरा अशा दोन नवोदित कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. प्रियांशने त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. पण बादशहाचा अभिनय तितकासा मनाला रुचत नाही. कुलभुषण खरंबदा, अन्नू कपूर यांनी खूपच चांगले काम केले आहे. वरुण शर्माने त्याच्या कॉमिक टायमिंगने खळखळून हसवले आहे. पण त्याच्या वाट्याला तुलनेने छोटी भूमिका आली आहे. 

एकंदरीत सोनाक्षीचा अभिनय आणि एक वेगळा विषय कशाप्रकारे हाताळण्यात आला आहे हे पाहाण्यासाठी खानदानी शफाखाना नक्कीच पाहा...


Web Title: Khandaani Shafakhana Movie Review : sonakshi sinha's fabulous performance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.