Daddy movie review : अर्जुन रामपालही डॅडीला वाचवू शकला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 05:29 AM2017-09-08T05:29:58+5:302023-08-08T19:47:32+5:30

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या जीवनावर आधारित डॅडी चित्रपट आहे.

Daddy movie review: Arjun Rampal could not save Daddy | Daddy movie review : अर्जुन रामपालही डॅडीला वाचवू शकला नाही

Daddy movie review : अर्जुन रामपालही डॅडीला वाचवू शकला नाही

Release Date: September 08,2017Language: हिंदी
Cast: अर्जुन रामपाल,राजेश शृंगारपुरे,ऐश्वर्या राजेश
Producer: ऋत्वीज पटेलDirector: अशीम अहलुवालिया
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>प्राजक्ता चिटणीस

अरुण गवळीच्या आयुष्यावर डॅडी हा चित्रपट असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. अर्जुन रामपाल अरुण गवळीच्या भूमिकेत चांगलाच भाव खावून गेला आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही अर्जुनने साकारलेला अरुण गवळी आपल्या लक्षात राहातो.
चित्रपटाची सुरुवातच आमदाराच्या खुनाने होते. आमदाराचा खून झाल्यानंतर पोलिसांची सूत्रं हलू लागतात आणि अरुण गवळीच्या भूतकाळातील सगळ्या केसेसच्या फाईल पोलिस इन्सपेक्टर विजयकर (निशिकांत कामत) उघडतो आणि त्यातून भूतकाळ सुरू होतो. एका मिल मजदूराचा मुलगा अरुण (अर्जुन रामपाल) छोट्या मोठ्या चोऱ्या करत असतो. अरुणचा मित्र बाबू (आनंद इंगळे), रामा (राजेश शृंगारपूरे) आणि अरुण हे तिघे मिळून या चोऱ्या करत असतात. ते अट्टल गुन्हेगार नसतात. पण रामाच्या भावाचा खून होतो आणि रामाच्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे तिघे एकाचा खून करतात. या खुनाच्या केसमध्ये पोलिस अरुणला अटक करतात. अरुण आता पोलिसांच्या कचाट्यात सापडणार असे आपल्याला वाटत असतानाच तो त्या केसमधून सहिसलामत बाहेर पडतो. कारण कोणीही साक्षीदार त्याला ओळखत नाही. अरुणला ओळखू नये असे मक्सूद (फरहान अख्तर)नेच सगळ्याना सांगितलेले असते. मक्सूद अरुणला वाचवण्याच्या बदल्यात अरुण, बाबू, रामा आणि विजय (पूर्णानंद) यांना एक खून करायला लावतो आणि या घटनेनंतर अरुण, बाबू, रामा आणि विजय गुन्हेगारी विश्वाकडे वळले जातात. अरुण, बाबू, रामा मिळून एक गँग तयार  करतात तर दुसरीकडे अरुणला त्याच्या चाळीतील एक मुस्लिम मुलगी (ऐश्वर्या राजेश) आवडत असते. तो तिच्यासोबत लग्नदेखील करतो. अरुण हा एकाच मुलीच्या प्रेमात वेडा झालेला असतो तर दुसरीकडे त्याचा मित्र बाळा आणि रामा हे दोघेही बाईलवेडे असतात. दारू, बाई हेच त्यांचे जग असते. हे तिघे गुन्हेगारी विश्वात आपली जागा बनवण्याच्या प्रयत्नाच असतानाच विजय बाबूचा खून करतो, तर रामा पोलिस एन्काऊंटरमध्ये मारला जातो. रामाचा खून झाल्यानंतर गँगची सूत्रं स्वीकारण्याशिवाय अरुणकडे पर्यायच उरत नाही. अरुणच्या लोकांना मक्सूददेखील मारत असतो. त्यामुळे अरुण मक्सूदला मारायचा प्रयत्न करतो. त्यानंतर मक्सूद दुबईला पळतो तर अरुण पोलिसांच्या हाती सापडतो. त्यानंतर पुढे अरुणचे काय होते? एक साधा मुलगा डॅडी कसा बनतो हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते. 
डॅडी या चित्रपटातील मक्सूद ही व्यक्तिरेखा ही दुसरी कोणीही नसून दाऊद आहे. त्याच्या एकंदर देहबोलीवरून आपल्याला ते लगेचच कळते. पण दिग्दर्शकाने दाऊदचे नाव घेणे टाळले आहे. अरुण गवळीच्या आयुष्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. अनेक पुस्तकात, सोशल मीडियात आपल्याला अरुण गवळीविषयी वाचायला मिळते. त्यामुळे चित्रपट पाहाताना आपल्याला काही वेगळे पाहायला मिळतंय असे काहीच वाटत नाही. याउलट अरुण गवळीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चित्रपटात मांडलेल्या नाहीत असे वाटते. तसेच चित्रपटात अनेकवेळा अरुण गवळीला नायक बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच इन्सपेक्टर विजयकरची आई त्याला सांगते, मिलचा संप झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अरुण वाईट गोष्टींकडे वळला. तसेच मीडियात अरुण गवळीला रॉबिनहूड म्हटले जाते तर रामाच्या खुनाच्या आधी अरुणने हे गुन्हेगारी विश्व सोडण्याचे ठरवलेले असते. पण रामाच्या खुनामुळे त्याला या क्षेत्राकडे पुन्हा वळण्याशिवाय पर्याय राहात नाही असा चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे दिग्दर्शकाला चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना काय सांगायचे आहे तेच कळत नाही. 
डॅडी हा चित्रपट पाहाताना उगाच ताणल्यासारखा वाटतो. तसेच गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपट असूनही आमदाराचा खून सोडला तर कोणतेच दृश्य अंगावर येत नाही. अॅक्शनमध्ये हा चित्रपट कुठेतरी कमी पडल्यासारखा वाटतो. तसेच चित्रपटात भूतकाळ सांगणारे अनेक कथाकार असल्याने चित्रपट आपल्या मनावर तितकासा प्रभाव पाडत   नाही. आपण कथेत गुंतायच्या आतच ती कथा संपते आणि दुसरा कथाकार येऊन पुढची कथा सांगू लागतो. त्यामुळे भावनिकदृष्ट्या आपण कथेशी जोडले जात नाही.
या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे अर्जुन रामपालने साकारलेला डॅडी. या चित्रपटात प्रत्येक दृश्यात तो अरुण गवळीच भासतो. त्याच्यासोबतच राजेश शृंगारपूरे, निशिकांत कामत आणि ऐश्वर्या राजेशने यांचा अभिनय ही दर्जेदार केला आहे. आनंद इंगळेची भूमिका छोटी असली तरी त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. फरहान अख्तर दाऊदच्या भूमिकेत उठून दिसत नाही. दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने सत्तर, ऐशींचे दशक लोकांसमोर अगदी योग्यप्रकारे मांडले आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांची वेशभूषा, केशरचना आपल्याला सत्तरीच्या दशकात घेऊन जाते. तसेच या चित्रपटात अनेक रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण केले आहे. त्यामुळे तो काळ आणि तो परिसर खूपच चांगल्याप्रमाणे दिग्दर्शकाने उभा केला आहे. तसेच जिंदगी मेरा डान्स डान्स हे आयटम साँगदेखील त्या काळाची आठवण करून देते. 
अर्जुन रामपालचा अभिनय पाहायचा असल्यास डॅडीला नक्कीच भेट द्या. 

Web Title: Daddy movie review: Arjun Rampal could not save Daddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.