​102 not out review : उतारवयातील धमाल कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 09:46 AM2018-05-04T09:46:32+5:302018-05-04T15:22:56+5:30

‘१०२ नॉट आऊट’ ही गोष्ट आहे दोन म्हाताऱ्यांची... एक बाप दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) जो १०२ वर्षांचा आहे आणि दुसरा त्याचा मुलगा बाबूलाल वखारिया (ऋषी कपूर) जो ७५ वर्षांचा आहे.

​102 not out review : उतारवयातील धमाल कथा | ​102 not out review : उतारवयातील धमाल कथा

​102 not out review : उतारवयातील धमाल कथा

googlenewsNext
Release Date: May 04,2018Language: हिंदी
Cast: अमिताभ बच्चन, ऋषी कपूर
Producer: ट्रीटॉप एन्टरटेन्मेंट, बेचमार्क पिक्चर्स, सोनी पिक्चर्स, एन्टरटेन्मेंट फिल्म्स इंडियाDirector: उमेश शुक्ला
Duration: 101 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत

वृद्ध जीवनावर खूप नाटकं आणि सिनेमा आजवर आपण पाहिले आहेत. उतारवायत करावा लागणारा संघर्ष, मुला-नातवंडांकरता खस्ता खाऊन दमलेले शरीर आणि ढळते आरोग्य, जुन्या आठवणी आणि मुलाकडून असलेल्या अपेक्षांच्या आधारावर जगत असलेले आपले हळवे मन यांसारख्या विषयांवर अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवण्यात आले आहेत. 
वृद्धत्व सर्वांनाच सुखाचे किंवा समान मिळते असे नाही. खरे तर ‘१०२ नॉट आऊट’ ही गोष्ट आहे दोन म्हाताऱ्यांची... एक बाप दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) जो १०२ वर्षांचा आहे आणि दुसरा त्याचा मुलगा बाबूलाल वखारिया (ऋषी कपूर) जो ७५ वर्षांचा आहे. या दोघांच्या आपल्या वयाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. एका बाजूला आहे दत्तात्रय, १०२ वर्षांचा होऊनही त्याला ११८ वर्षांच्या एका चायनीज म्हाताऱ्याचा रेकॉर्ड मोडण्याची महत्त्वकांक्षा आहे. जगाकडे बघण्याची त्याची नजर खूप सहज आणि मजेशीर आहे. आपल्या जीवनात प्रत्येक गंमती आणि आनुभवाचा आस्वाद घेत दत्तात्रय आपल्या जीवनाचा आनंद लुटत असतो. दुसऱ्या बाजूला असतो त्यांचा मुलगा बाबूलाल. तो आपले घर, घराची देखरेख, औषधे, मेडिकल चेक अप या आपल्या कोंदट आयुष्यात गुंतलेला असतो. दत्तात्रयला आपल्या मुलाचा खूपच कंटाळा आलेला असतो. दीर्घ आयुष्याकरता त्याला आजूबाजूला सतत हसरे सुखी चेहरे हवे असतात. आपला रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या मार्गात बाबूलाल हा सर्वात मोठा अडथळा आहे असे त्यला वाटत असते. म्हणून तो बाबूलालला वृद्धाश्रमात ठेवण्याचा बेत रचतो. माझ्या अटी पाळ अथवा वृद्धाश्रमात जा... असे दत्तात्रय बाबूलालला बजावतो. त्यामुळे हा कटकट्या बाबूलाल आपल्या मनाविरुद्ध लहरी वडिलांच्या अटी पूर्ण करायला तयार होतो. पण बाबूलाल सारख्या शिस्तप्रिय माणासाल या अटी खूपच जाचक वाटत असतात. आपल्या मुलाची अशी परीक्षा घेण्यामागे दत्तात्रयचे खरे कारण काय असते? या अटी पूर्ण करताना बाबू आपल्या आयुष्याबद्दल काय शिकतो? अशा गंमतीचा ‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट आहे. 
‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटातील अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेची पिकू या चित्रपटातील व्यक्तिरेखेसोबत तुलना केली जात आहे हे साहजिकच आहे. खरं म्हटले तर पिकूच्या तुलनेत ‘१०२ नॉट आऊट’ थोडा फिकाच पडतो. ‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट एका नाटकावरून बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटातील अनेक दृश्यं ही नाटकासारखीच चित्रीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी संवाद आणि अभिनय यावर जास्त लक्ष केंद्रित करून जागा अथवा वातावरणाचा उपयोग केलेला नाही. यामुळे चित्रपट पाहाताना आपण एखादी मालिका पाहात असल्यासारखे आपल्याला वाटते. कथेला हलकाफुलका लूक देण्याच्या प्रयत्नामध्ये विषयाची खोली गाठता आलेली नाही. पिकू या चित्रपटाचा जो गाभितार्थ होता, तो या चित्रपटात दिसत नाही. कथा जरी सक्षम नसली तरी ‘१०२ नॉट आऊट’ मधील परफॉर्मन्स अव्वल आहेत. बाप आणि मुलाच्या भूमिकेमध्ये ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची केमिस्ट्री उत्कृष्ट रंगली आहे, अमर अकबर अॅन्थोनी, नसीब, कुलीच्या काळापासून या दोघांचे असलेले कॉमिक टायमिंग आजही जसेच्या तसे आहे. दत्तात्रयची काही कारण नसताना बाबूची टर घेणे. पण त्याचवेळी त्याचे मुलावरचे प्रेम आणि माया हे खूप विनोदी आणि मनोरंजकपणे दाखवण्यात आले आहे. काही दृश्य पाहाताना नक्कीच डोळ्यात पाणी येते. वृद्धत्व हे शरीरापेक्षा मनात असते. मुलं आणि कर्तव्य यांच्या कचाट्यातून सुटल्यानंतर त्यांच्याकडून प्रेमाच्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या सुखाची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारली पाहिजे. जीवनात मिळालेले प्रत्येक सुख आणि अनुभवाचा आस्वाद स्वच्छंदपणे घेतला पाहिजे असा या चित्रपटाद्वारे हलकाफुलका संदेश देण्यात आला आहे. हा चित्रपट जरुर पाहावा, जमलं तर आईवडिलांना घेऊन नक्कीच जा... 

Web Title: ​102 not out review : उतारवयातील धमाल कथा

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.