Valentine Day: 'विल यू बी माय व्हेलेंटाईन' म्हणण्याआधी 'या' गोष्टींचं भान असू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 07:44 PM2021-02-12T19:44:22+5:302021-02-13T16:30:13+5:30

Valentine Day : व्यक्तिस्वातंत्र्याचा नुकताच अनुभव झालेल्या पौगंडावस्थेतल्या व तरुणाईतल्या काही मुला-मुलींना अशा प्रसंगी मोकळीक व स्वैराचार यातली धूसर रेखा लक्षात येत नाही.

valentine Day young generation should alert about social security | Valentine Day: 'विल यू बी माय व्हेलेंटाईन' म्हणण्याआधी 'या' गोष्टींचं भान असू द्या!

Valentine Day: 'विल यू बी माय व्हेलेंटाईन' म्हणण्याआधी 'या' गोष्टींचं भान असू द्या!

Next

सध्या तरुणाईमध्ये चॉकलेट डे (chocolate day), रोज डे (rose day), प्रपोज डे (propose day), व्हॅलेन्टाईन्स डे (Valentine Day ) इत्यादी दिवस विदेशी संस्कृतीचे अनुकरण करून साजरे करण्याकडे कल झाला आहे .सोशल मीडियाचा प्रभाव, बदलणारी जीवनमूल्ये व मोकळी संस्कृती याचे हे एक प्रतिक आहे . व्यक्तिस्वातंत्र्याचा नुकताच अनुभव झालेल्या पौगंडावस्थेतल्या व तरुणाईतल्या काही मुला-मुलींना अशा प्रसंगी मोकळीक व स्वैराचार यातली धूसर रेखा लक्षात येत नाही.

आपल्या समवयस्कांवर छाप टाकण्याच्या नादात अशी काही मंडळी प्रणयाराधनेला सुरुवात करतात. आव्हान स्वीकारण्यासाठी , मानसिक परिपक्वता नसली तरी बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंड असणे हे जरुरीचे समजले जाते. विरुद्ध लिंगाच्या एखाद्या व्यक्तीशी ओळख, मैत्री होताच कधीकधी विवेकबुद्धी गहाण ठेवली जाते . अशा व्यक्तीचे ध्यान आकृष्ट करून घेण्यास व तिच्या पसंतीस आपण उतरावे म्हणून धडपड केली जाते; एवढेच नव्हे तर पैजाही लावल्या जातात. अन कधी कधी भावनिक जवळीकीपेक्षा शारीरिक जवळीक साधली जाते. सळसळणार्‍या तारुण्याच्या भरात आपण काय करत आहोत याचे भान मुला-मुलींना राहत नाही. अन त्यामुळे काही दुर्दैवी तरुण-तरुणी प्रेमाच्या या खेळात स्वविनाशाच्या गर्तेत सापडतात.

शारीरिक आकर्षणामुळे चुंबन, आलिंगन आदी पाय-या पार करून शरीर सुखाचा अनुभव घेण्यासाठी एकांत साधला जाऊ शकतो. त्यातच या गोड क्षणांची साक्ष म्हणून आपले त्यावेळचे एकांतातले फोटोज, व्हिडीओ, सेल्फी आदी काढण्याचे सुचवले जाते. एकांतातले सोनेरी वाटणारे क्षण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होतात. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. काही वेळेला सोशल मीडियाच्या प्रभावामुळे प्रत्यक्ष जवळीक न साधता ही आपापल्या बेडरूममध्ये बसून आपले एकांतातले नग्न अथवा कामुक व्हिडिओ व छायाचित्रे शेअर करण्याबद्दल तथाकथित बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड अन्वये सुचवले जाते. अनाठाई विश्वासाचे पोटी अथवा सारासार बुद्धी गहाण टाकून काही जण असे व्हिडिओ व छायाचित्रे त्वरित शेअर देखील करतात. पण त्यानंतर चालू होते ती मात्र न संपणारी होरपळ व ब्लॅकमेल. असे फोटो व व्हिडिओ जगजाहीर करण्याची धमकी देऊन सततचे आर्थिक व लैंगिक शोषण घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या शिवाय ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड विश्वास टाकला व आपले सर्वस्व त्याचेवर उधळले अशाच व्यक्तीने आपला विश्वासघात केल्याचे बघून अत्यंत विफलता येते. भय, दबाव अथवा हताशपणाच्या गर्तेत सापडलेली अशी काही तरुण मुले-मुली ब्लॅकमेलर्सच्या मागण्या पुरवण्यासाठी चोरी, आर्थिक गुन्हे अथवा ड्रग्स च्या जाळ्यात गेल्याचीही उदाहरणे आहेत. तिथूनच त्यांच्या आयुष्याची घसरण चालू होते व वेळ प्रसंगी ती घातक हल्ले , खून अथवा आत्महत्या यात परावर्तित होऊ शकते. या चक्रव्यूहात न सापडण्यासाठी सुरवातीपासूनच विचारपूर्वक व विवेकाचे भान ठेवून वर्तन असावे.

सोशल मीडियावर इतर वेळेस देखील काय भान ठेवावे ?
सर्वप्रथम लक्षात ठेवावे की सोशल मीडिया आपल्यासाठी आहेत आपण त्यांचे साठी नव्हे. आपली वैयक्तिक माहिती , आर्थिक व कौटुंबिक माहिती तसेच खाजगी छायाचित्रे इत्यादी जग जाहीर किंवा शेअर करण्यासाठी नव्हेत. सोशल नेटवर्कवर तुमच्या स्वप्नातली राजकुमारी अथवा राजकुमार भासणाऱ्या व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली म्हणजे ती शहानिशा न करता त्वरित स्वीकारायलाच हवी अशातला भाग नाही . पौगंडावस्था; किशोरावस्था अथवा तरुणाईतल्या नाजूक मानसिक अवस्थेतील काही व्यक्तींवर दबाव आणून अथवा त्यांना आमिष दाखवून; फशी पाडून त्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण करणाऱ्या टोळ्या देखील अस्तित्वात आहेत. अनेक संभावित गुन्हेगार समाजातील घटक बनूनच  पण उजळ माथ्याने आपली कृष्णकृत्ये बेडरपणे करत असतात. आपल्या सावजाला ते अश्या  कोंडीत पकडतात, कि त्यांना कसलेही  भय राहत नाही.

हे सर्व टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीपूर्वक व विचारपूर्वक करायला हवा. अनावश्यक माहिती व फोटोज सोशल मीडिया वर पोस्ट करू नयेत . आपले प्रोफाईल लॅाक करण्याची सुविधा असते; त्याचा लाभ घ्यावा. आवश्यकता नसल्यास आपला वेबकॅम बंद ठेवावा .सकृतदर्शनी विदेशात असलेल्या राजबिंड्या व उमद्या दिसणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून सोशल मीडियावर लग्नाचे प्रपोजल आले तर हुरळून जाऊ नका. तुम्हाला उंची भेटवस्तू पाठवल्याचे सांगून तथा ती वस्तू कस्टम मध्ये अडकल्याचा बहाणा करून; कस्टम ड्यूटी भरून ती सोडविण्याच्या आमिषाने तुमच्याकडून हजारो- लाखो रुपये उकळले जाऊ शकतात. आपली बँकिंग, वैयक्तिक वा आर्थिक माहिती , पासवर्ड, कार्ड नंबर्स इत्यादी तपशील ज्ञात व विश्वासू व्यक्तींखेरीज कोणासही अजिबात पुरवू नये.

आणि हो ...तरूणाईच्या उन्मादात वा आवेगात निष्काळजीपणामुळे आपल्या हातून घडू नये अशी एखादी घटना घडली असेल आणि मग कोणी ज्ञात अथवा अज्ञात व्यक्ती आपल्यावर दबाव टाकत असतील तर त्याची माहिती आपल्या जवळच्यांना म्हणजे वडीलधाऱ्यांना- आई-वडिलांना , भावंडांना अवश्य द्यावी. तुमचे हातून घडलेल्या चुकिपासुन संभाव्य अनर्थ न होण्यासाठी ते तुम्हाला अवश्य मदत करतील. ब्लॅकमेलर , सायबर गुन्हेगार जर अनैतिक कृत्ये करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असतील तर त्याची माहिती पुराव्यांसकट पोलिसांना त्वरित द्यावी.

- श्री.  निरंजन उपाध्ये
( लेखक 'वर्ल्डलाईन' या नामांकित व अग्रणी ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग कंपनी मध्ये कार्यरत असून फ्रॉड तथा रिस्क मॅनेजमेन्ट विभागाची  जबाबदारी सांभाळतात . सायबर गुन्हे , आर्थिक गुन्हे व सुरक्षा या विषयांतील ते तज्ञ समजण्यात येतात . पोलीस व  न्यायसंस्था यांना सायबर व आर्थिक गुन्ह्यांविरोधी प्रशिक्षण देखील ते वेळोवेळी देत असतात.)
 

Web Title: valentine Day young generation should alert about social security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.