अर्जुना नदीवरील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी सज्ज, या पुलामुळे ११ धोकादायक वळणे कमी झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:49 PM2022-05-17T17:49:01+5:302022-05-17T17:59:03+5:30

हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे.

Work on the highest bridge on the river Arjuna near Rajapur has been completed in the four laning of the Mumbai Goa highway | अर्जुना नदीवरील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी सज्ज, या पुलामुळे ११ धोकादायक वळणे कमी झाली

अर्जुना नदीवरील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी सज्ज, या पुलामुळे ११ धोकादायक वळणे कमी झाली

googlenewsNext

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले आहे. सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

नोव्हेंबर २०१८ मध्ये या पुलाची प्रत्यक्ष उभारणी सुरू झाली. मात्र, भूसंपादनातील अडचणी आणि कोरोना काळातील शिथिलता यामुळे हा पूल मार्गी लागण्यास मे २०२२ उजाडले आहे. सध्यस्थितीत पुलाच्या उभारणीचे काम मार्गी लागून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाऊन हा पूल दुहेरी वाहतुकीस सज्ज होणार आहे.

केसीसी बिल्डकॉन कंपनीमार्फत वाटूळ ते तळगाव या सुमारे ३३.५ किलोमीटर अंतराचे महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. अर्धा नदीपात्रात आणि अर्धा जमिनीवर असा हा महामार्गावरील पहिला आणि एकमेव पूल आहे. लवकरच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण होणार आहे.

वाटूळ, ओणी, राजापूर, हातिवले, कोंड्ये, पन्हळे या ठिकाणी अंडरपास करण्यात आले आहेत. हातिवले येथे टोलनाका असून, येथे १७ लेनची निर्मिती करण्यात आहे.

वाटूळ ते तळगाव या दरम्यान लहान मोठ्या १० पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वाटूळ व राजापूर येथे दोन मोठे पूल बांधण्यात आले आहेत. वाटूळ येथील पूल ६६ मीटर लांबीचा आहे. तर, अर्जुना नदीवर हा पूल २८० मीटर लांब व सुमारे ३० मीटर रुंदी व २७ मीटर उंच गडर पद्धतीने उभारण्यात आला आहे. प्रोजेक्ट मॅनेजर मनोजकुमार व मॅनेजर अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले.

Web Title: Work on the highest bridge on the river Arjuna near Rajapur has been completed in the four laning of the Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.