गणेशमूर्तीचा मोबदला म्हणून अजूनही दिले जाते भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:11 PM2020-08-14T12:11:31+5:302020-08-14T12:13:46+5:30

मेहरून नाकाडे  रत्नागिरी : बलुतेदारी पध्दत आता कालबाह्य झाली असली तरी आजही ग्रामीण भागात काही व्यवहारांमध्ये धान्याच्या मोबदल्यात वस्तूंची ...

Rice is still given in return for Ganesh idols | गणेशमूर्तीचा मोबदला म्हणून अजूनही दिले जाते भात

गणेशमूर्तीचा मोबदला म्हणून अजूनही दिले जाते भात

Next
ठळक मुद्देशिपोशीतील नागवेकर कुटुंबाचा तीन पिढ्यांपासूनचा वारसा आजही कायमपूर्वी मोबदल्याचा भात आणावे लागत असे बैलागाडीतून

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : बलुतेदारी पध्दत आता कालबाह्य झाली असली तरी आजही ग्रामीण भागात काही व्यवहारांमध्ये धान्याच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत आहे. पूर्वी गणेशमूर्ती बनवणाऱ्यांना मोबदला म्हणून शेतकरी धान्य देत. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील मूर्तिकार नागवेकर कुटुंबाने तीन पिढ्यांपासून हा वारसा आजही जपला आहे. या गावात मूर्तीसाठी पैसे न देता आजही भात दिले जात आहे.

शिपोशी येथील वामन जनार्दन नागवेकर यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू केला. मूर्तिशाळेत १५० ते १७५ गणेशमूर्ती तयार करण्यात येत असत. त्यावेळी गावातील तसेच बाजूच्या केळवली, सालपे गावातील शेतकरी गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती घरी घेऊन जात असत. मात्र, त्यासाठी पैसे न देता त्याऐवजी भात देण्यात येत असे.

शंभर टक्के लोक त्यावेळी भातच देत असत. आठ पायली ते मणभर भात देण्यात येत असे. भात कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या सणाला गावातील शेतकरी वामन नागवेकर यांना बोलावून भात देत असत. त्यामुळे खंडीभर भात गोळा होत असे. बैलगाडीतून भात घरी आणला जात असे.

वामन यांच्याकडून सुरू झालेली ही प्रथा त्यांचे पुत्र दत्ताराम यांनीही जपली होती. आता तर दीपक यांची तिसरी पिढी या प्रथेचे पालन करीत आहे. काळाच्या ओघात भात देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीही दहा ते बारा लोक पैसे न देता, भातच देत आहेत.

नागवेकर कुटुंबियांनाही पैशांऐवजी भातच घेणे आवडते. त्यामुळे गावठी भात उपलब्ध होतो. आजही दीपक यांच्याकडे शाडूच्या मातीपासून १५० गणपती तयार केले जातात. सध्या त्यांच्याकडील गणेशमूर्तींचे रंगकाम सुरू आहे. कारखान्यातील कलाकार रंगकामाचा शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत.

यावर्षी कोरोनामुळे बहुसंख्य मंडळींचे रोजगार गेले आहेत. नोकरी गेल्याने मुंबईकर गावीच थांबले असून, शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीच्या मोबदल्यात भात देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, रंग व साहित्याचा वापर केला जात आहे. मात्र भातावरचे गणपती ही प्रथा नागवेकर कुटुंबियांनी जपली आहे.

 

Web Title: Rice is still given in return for Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.