Ratnagiri Zilla Parishad Announces Ideal Teacher Award | रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

ठळक मुद्देसंतोष काशिराम चव्हाण यांना विशेष पुरस्कार १३ सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील १० शिक्षकांची नांवे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली़ यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील संतोष काशिराम चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विशेष पुरस्कार बहाल करण्यात आला आहे़.

यावेळी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे उपस्थित होते़. दि़ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो़.

दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात़.

यंदाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील २४ शिक्षकांना प्रस्ताव सादर केले होते़ त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातून केवळ एका शिक्षकाचा समावेश होता़ या शिक्षकांच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मुलाखती घेतल्या होत्या़.

प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांमध्ये सर्वोत्कृष्ठ काम केलेल्या १० शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली़. त्यानंतर ती यादी कोकण आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती़.

आयुक्तांच्या मंजुरीनंतर बुधवारी अध्यक्षा साळवी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर केली़. यामध्ये मंडणगड - अमरदीप बळीराम यादव, दापोली - दीपिका दिपक मर्चंडे, खेड - अनंत सीताराम मोहिते, चिपळूण- दीपक नंदकुमार मोने, गुहागर- सुरेंद्र सदानंद चिवेलकर, संगमेश्वर- रसिका रविकांत शिंदे, रत्नागिरी- प्रकाश रघुनाथ पवार, लांजा- नरेंद्र गंगाराम पवार, राजापूर- संदीप बाळकृष्ण परटवलकर यांचा समावेश आहे.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रोख रक्कम ५०० रुपये, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे़. हा पुरस्कार वितरण सोहळा दि़ १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे़.


Web Title: Ratnagiri Zilla Parishad Announces Ideal Teacher Award
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.