रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:12 PM2019-09-18T18:12:48+5:302019-09-18T18:14:11+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून सरकारकडून मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला दिली.

Ratnagiri too Tourism District, Mumbai-Goa Highway Tourism Life Line | रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरीही पर्यटन जिल्हा मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून सरकारकडून मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला दिली.

भाजप सरकारची महाजनादेश यात्रा मंगळवारी रात्री ९ वाजता रत्नागिरीत दाखल झाली. जयस्तंभ येथे महाजनादेश यात्रेचे आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरजवळील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे, नरेंद्र पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, तसेच मान्यवर नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या पाच वर्षांच्या राज्यातील सत्ताकाळात आमच्या सरकारने जनतेच्या विकासकामांबाबत ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. ग्रामसडक योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १६३९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी शहरासाठी राज्य सरकारने ६३ कोटींच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी मंजुरी दिली आहे. त्या योजनेचे काम सुरू आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालयही साकारत आहे.

चौपदरीकरणाला वेग!

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या पावसामुळे काही प्रमाणात मंदावले आहे. मात्र, पाऊस संपताच हे काम अधिक वेगाने सुरू केले जाणार आहे. हा महामार्ग म्हणजे कोकणातील पर्यटनासाठी लाईफ लाईन ठरणार असून कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न यापुढेही सुरूच राहील.

रत्नागिरी-नागपूर महामार्ग

मिऱ्या रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे जिल्ह्यात ६८ किलोमीटरचे काम आहे. या कामासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जयगड-डिंगणी गुडस रेल्वे मार्ग, चिपळूणहून साताऱ्यासाठी मार्ग याबाबत कार्यवाही सुरू आहे. जनतेच्या विकासासाठी भाजप सरकार कटीबध्द राहणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर रत्नागिरीतून विमानसेवाही नजिकच्या काळात सुरू होईल, असे ते म्हणाले.

पुन्हा राज्यात भाजपला जनादेश!

गेल्या पाच वर्षामधील जी विकासाची कामे भाजप महायुती सरकारने केली आहेत ती राज्यातील जनतेसमोर आहेत. मराठा आरक्षण कायदा केला आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात विकासाचा धडाका लावला आहे. देशातील कोणतीही व्यक्ती बेघर राहू नये, ही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी २०२१ पर्र्यंत राज्यातील कोणीही व्यक्ती बेघर असणार नाही. प्रत्येकाचे स्वत:चे घर असेल, यासाठी सरकार काम करणार आहे. जशी केंद्रात पुन्हा जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता सोपवली आहे तशीच राज्यातही पुन्हा भाजपकडेच जनता सत्ता सोपवेल, जनादेश भाजपलाच देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॉँग्रेस करतेय पाठराखण

या देशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशनिष्ठेवर शंका घेत काही अपप्रवृत्ती सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासायचे काम करतात. अशा लोकांचा मी निषेध करतो. तसेच अशा अपप्रवृतींची पाठराखण करण्याचे काम देशातील अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉँग्रेस पक्षाकडून केली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनीही आपले विचार मांडले.

Web Title: Ratnagiri too Tourism District, Mumbai-Goa Highway Tourism Life Line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.