Ratnagiri city president by election Congress and shivsena alliance | रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुक: काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?
रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुक: काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

रलागिरीच्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेनेचे राहुल पंडित यांनी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पद रिक्त असलेल्या काळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नगरसेवक बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता येत्या २९ डिसेंबरला थेट नगराध्यक्ष निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप प्रताप तथा बंड्या साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व भाजपचे जिल्हा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मनसेचे रूपेश सावंत व अपक्ष मुकुंद जोशी हेसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीतर्फे अर्ज भरण्याऐवजी मिलिंद कीर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना शहर विकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी व अन्य घटक पक्षांचा पाठिंबा राहणार आहे.

काँग्रेसने या निवडणुकीत प्रथम आघाडीपासून अलिप्तता दाखवित स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर स्वतंत्र उमेदवार उभा करण्यास काँग्रेसमधील एक गटाने विरोध केला. हा गट महाविकास आघाडीच्या दिशेने जात शिवसेनेकडे झुकत असल्याचे दिसताच जिल्हाअध्यक्ष विजय भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना काँग्रेस पाठिबा देत असल्याचे पत्र दिले आहे.

लांजावर ठरणार: 17 ची बैठक महत्वाची

राष्ट्रवादीला पाठींबा दिल्यानंतर काँग्रेसने पुन्हा भूमिका बदलली आहे. राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा किंवा नाही, याबाबतचा निर्णय लांजा नगर पंचायत निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या निर्णयावर अवलंबून आहे. 17 डिसेंबरला काँग्रेस व राष्ट्रवादीची या विषयावर संयुक्त बैठक होणार असून, त्यावेळी रत्नागिरीत राष्ट्रवादीला पाठींबा द्यायचा की नाही, हे ठरणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा घेता काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका गटाचे सहकार्य शिवसेनेचे उमेदवार बंडया साळवी यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी काँग्रेसमधील ही गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Ratnagiri city president by election Congress and shivsena alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.