राजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:24 PM2020-10-30T16:24:57+5:302020-10-30T16:25:13+5:30

rajapur, shiv sena, ratnagiri, politics मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.

Rajapur Shiv Sena factionalism on the stage | राजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

राजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

Next
ठळक मुद्देराजापूर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

राजापूर : मागील काही दिवस राजापूर तालुका शिवसेनेअंतर्गत खदखदत असलेल्या संघर्षाला अखेर तोंड फुटले आहे. तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सभापतींसह प्रशासनाला अंधारात ठेवून भू येथील पशुवैद्यकीय इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन परस्पर केल्याचा घणाघाती आरोप पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी केला आहे.

अनेक वर्षे तालुकाप्रमुख पदी असलेल्या कुवळेकर यांनी पक्षवाढीसाठी काहीच केले नाही. ते तालुकाप्रमुख नाहीत तर तालुका संघटनेला कायमचे बसणारे कुलूप असून, कुवळेकर यांना पदावरून तत्काळ दूर करावे व नवीन तालुकाप्रमुख नियुक्त व्हावा, यासाठी आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राजापूर तालुका शिवसेनेंतर्गत कमालीचा संघर्ष खदखदत असून, पक्षाच्या काही बैठकांदरम्यान जोरदार वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संघटनेंतर्गत सरळसरळ गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.

नुकताच भू येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनावरून सेनेतील वाद चव्हाट्यावर आला. राजापूरचे प्रभारी सभापती प्रकाश गुरव यांच्यासह प्रशासनालाच अंधारात ठेवून कुवळेकर यांनी दवाखान्याचे उद्घाटन परस्पर केल्याने गुरव संतापले आहेत. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पंचायत समितीमधील विकासकामांची भूमिपूजने किंवा उद्घाटनांचे अधिकार सभापती व प्रशासनाचे असताना तालुकाप्रमुखांनी हे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हस्तक्षेप करू देणार नाही

नुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेवरून झालेल्या वादालाही तालुकाप्रमुखच कारणीभूत होते. आपल्याला प्रभारी सभापतीपद मिळू नये, यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. आपण पंचायत समितीत असेपर्यंत तालुकाप्रमुख कुवळेकर यांना पंचायत समितीच्या कामात अजिबात हस्तक्षेप करू देणार नाही, असा इशारा प्रभारी सभापती गुरव यांनी दिला आहे.

तालुकाप्रमुख बदला

मागील दहा वर्षे प्रकाश कुवळेकर यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी काहीच केले नाही. उलट पक्षातील गटबाजी अधिक कशी वाढेल, यासाठीच प्रयत्न केल्याचा आरोप प्रभारी सभापती गुरव यांनी केला. आता तालुकाप्रमुख बदलणे गरजेचे असून, तेथे सक्षम व्यक्तीची निवड केली जावी, यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Rajapur Shiv Sena factionalism on the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.