सावधान! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट खचतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:01 PM2021-11-17T16:01:42+5:302021-11-17T16:02:56+5:30

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे रखडलेले आहे. पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.

Parashuram Ghat on Mumbai Goa National Highway | सावधान! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट खचतोय

सावधान! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट खचतोय

googlenewsNext

संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे रखडलेले आहे. पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़  त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे़  या भागात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई - गोवामहामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या वादामुळे परशुराम घाटातील काम स्थगित ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नाही.

जमीन मालक, खोत व कुळांनी आपापसात तोडगा काढावा. पावसाळ्यानंतर काम सुरू करू, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. तसेच कूळ ८० टक्के, खोत १० टक्के व देवस्थान १० टक्के अशा पद्धतीने मोबदल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून कूळ व देवस्थानसाठी ९०- १० चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या दोन्ही प्रस्तावांवर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पेढे व परशुरामच्या ग्रामस्थांनी पुन्हा चौपदरीकरणास तीव्र विरोध केला. त्यानंतर आजतागायत परशुराम घाटातील कामाला सुरुवात झालेली नाही. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग काेसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त हाेत आहे. सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, पावसामुळे हा भाग आणखीन ठिसूळ हाेऊन ढासळण्याचा धाेका वाढला आहे.

घाटात नेहमी दरड कोसळणाऱ्या ठिकाणापासून पुढे ४०० मीटरपर्यंत कल्याण टोलवेजकडे तर त्या पूर्वीचा भाग  चेतक इन्फ्राकडे आहे. परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापासून चौपदरीकरणाचे आले आहे. त्यापुढील काम रखडले असून, तेच अधिक धोकादायक बनले आहे. गत वर्षी परशुराम घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसळली होती. मात्र, आता मोठ्या वळणावर रस्ता खचला आहे़  त्यामुळे या भागातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.

केवळ ५ मिनिटात स्थगिती

विशेष म्हणजे प्रामुख्याने हा भाग चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. कल्याण टोलवेज कंपनीमार्फत हे काम केले जात आहे. गेल्या तीन वर्षापासून मोबदल्याच्या वादावरून चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी एकदा पोलीस फौजफाट्यात काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने कामास ५ मिनिटांत स्थगिती मिळाली.

घरांना धोका

पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पायथ्यालगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच तेथील सहा घरांना फटका बसला. मात्र, अजूनही हा धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूला मोठी वस्ती आहे़ या घरांसाठी दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. त्यामुळे या प्रश्नी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस निर्णय देण्याची मागणी केली जात आहे.


आतापर्यंत परशुराम घाटासंदर्भात अनेक आश्वासने दिली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी कूळ व देवस्थानसाठी दिलेल्या ९०-१० च्या प्रस्तावावरही मंत्रालयात चर्चा झाली. परंतु त्यावर अंतिम निर्णय दिला गेला नाही. त्यातच कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने या विषयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता शेतकरी न्यायालयात दाद मागण्याच्या मानसिकतेत आहेत. - प्रवीण पाकळे, अध्यक्ष, संघर्ष समिती, पेढे-परशुराम.

Web Title: Parashuram Ghat on Mumbai Goa National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.