पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गाेन्नत’ उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:15+5:302021-05-06T04:34:15+5:30

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष भरलेच नाहीत. ...

Mention of 'Classed' on the progress sheets of students from 1st to 4th | पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गाेन्नत’ उल्लेख

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गाेन्नत’ उल्लेख

Next

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष भरलेच नाहीत. बहुतांश शाळांमधून ऑनलाईन अध्यापन सुरू होते. मात्र ज्या ठिकाणी मोबाईल रेंजच नाही, त्या गावातून शिक्षक पालकांच्या संमतीने प्रत्यक्ष अध्यापन करीत होते. दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रगतिपत्रक देण्यात येत होते. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना ‘वर्गोन्नत’ म्हणून प्रगतिपत्रावर शेरा दिला जाणार आहे.

विद्यार्थी शाळेत गेलेलेच नाहीत. त्यामुळे शाळेतर्फे कोणतेच उपक्रम राबविण्यात आलेले नाहीत. वार्षिक परीक्षा तर रद्दच करण्यात आल्या. त्यामुळे तोंडी, लेखी परीक्षा घेतलेल्या नाहीत. शिवाय काैशल्यपूर्ण उपक्रमही राबविले गेले नसल्यामुळे मुलांचे आकारिक किंवा सकारित मूल्यमापन करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे शाळांना एक ते चार वर्गातील मुलांचे निकालपत्र तयार करताना त्यावर ‘वर्गोन्नत’चा उल्लेख करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, त्याप्रमाणे जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रगतिपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणेच मुलांच्या गुणपत्रकावर ‘वर्गोन्नत’चा उल्लेख करण्यात येत आहे.

गतवर्षी मार्चमध्ये शाळा बंद केल्या होत्या, त्यावेळी परीक्षा न घेता मुलांना पास करण्यात आले होते. परंतु वर्षभरातील विविध उपक्रमांवरून मुलांचे मूल्यमापन करून गुणपत्रक तयार करून देण्यात आले होते. यावेळी केवळ अध्यापनच असल्याने गुणपत्रकावर ‘वर्गोन्नत्’चा उल्लेख केला जाणार आहे. शारीरिक शिक्षण, काैशल्यपूर्ण उपक्रम वर्षभर काहीच राबविण्यात आलेले नाही. शिवाय उंची, वजन, शाळेतील उपस्थितीचे दिवस, प्राप्त श्रेणी या उल्लेखाशिवाय बदललेले नवे प्रगतिपत्रक मुलांना प्राप्त होणार आहे.

प्रगतिपत्रकच बदलणार

सहामाही व वार्षिक परीक्षेनंतर मुलांचे गुणपत्रक आकारिक, सकारित मूल्यमापनानंतर तयार केले जाते. त्यामध्ये विषयनिहाय गुण व प्राप्त श्रेणीचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुलाचे वजन, उंची, शाळेतील महिनानिहाय उपस्थितीचे दिवस याचाही उल्लेख केला जातो. मात्र यावर्षी विद्यार्थी घरीच असल्याने उंची, वजन घेण्यात आलेले नाही. ऑनलाईन उपस्थिती असली तरी, त्याचा उल्लेख प्रगतिपत्रकावर असणार नाही. शिवाय विषयवार प्राप्त गुणानुसार श्रेणी दिली जात असली तरी, यावर्षी श्रेणी न देता ‘वर्गोन्नत’चा उल्लेख होणार आहे.

................................

पहिलीत गेलो, परंतु आमचे स्वागत झाले नाही. खाऊही मिळाला नाही. आईच्या मोबाईलवर गुरुजी अभ्यास पाठवायचे, आई माझ्याकडून मूळाक्षरे, अंक गिरवून घेत असे. मला आता मूळाक्षरे, अंक लिहिता येतात. व्हाॅट्‌स ॲपवर पाठविलेल्या कविता पाठ झाल्या आहेत. परंतु मला आता शाळेत जायचे आहे. कोराेना संपला की शाळेला जायचे, असे आई सांगते. पण मला घरात अभ्यासाचा कंटाळा आला आहे.

- दीपेश रामाणी, विद्यार्थी

वर्षभर आम्ही घरात आहोत. अभ्यासासाठी मोबाईलवर बघून बघून डोळे दुखतात. शाळेत बाई आम्हाला अभ्यासाबरोबर विविध खेळही खेळायला शिकवतात. व्यायामाचे प्रकार, तसेच बैठे व मैदानी खेळ शिकवतात. कार्यानुभवाच्या तासाला तर कागदी, तसेच मातीपासून विविध वस्तू तयार करायला शिकवतात. मात्र यापैकी वर्षभर काहीच झाले नसल्याने शाळेची प्रखर आठवण येते. जूनमध्ये शाळा सुरू व्हायला हवी.

- नाैमान खान, विद्यार्थी

शाळेत शिक्षक रागावतात व अभ्यास करवूनही घेतात. शारीरिक शिक्षणाचा, खेळाचा, कार्यानुभवाचा तास तर आम्हाला हवा-हवासा वाटतो. घरी राहून नवीन काहीच शिकता आले नाही. वर्षभर अभ्यासासाठी आई, बाबांची भुणभुण ऐकू आली. कितीही अभ्यास केला तरी आई-बाबांचे समाधान होत नाही. आता तरी काेरोना जायला हवा. आम्हाला आमची शाळा हवी. मित्र, बाई, गुरुजी हवे आहेत. आमची शाळा आम्हाला प्रिय आहे.

- आर्या खेडेकर, विद्यार्थी

वर्षभर पहिली ते चाैथीपर्यंतची मुले घरी होती. ऑनलाईन अध्यापन सुरू होते. कोरोनाच्या सद्यस्थितीत परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. मूल्यमापनच नाही, त्यामुळे प्रगतिपत्रकावर ‘वर्गोन्नत’चा उल्लेख असणार आहे. नेहमीप्रमाणे उपस्थिती, श्रेणी, उंची, वजन याचा काहीच उल्लेख असणार नाही.

- एस. जे. मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी

Web Title: Mention of 'Classed' on the progress sheets of students from 1st to 4th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.