corona virus-गणपतीपुळे परिसर प्रथमच निस्तब्ध,श्रींच्या मंदिराला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:37 PM2020-03-18T17:37:14+5:302020-03-18T17:39:52+5:30

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

The Ganapatipule campus is shut for the first time, lock the temple of Sri | corona virus-गणपतीपुळे परिसर प्रथमच निस्तब्ध,श्रींच्या मंदिराला कुलूप

corona virus-गणपतीपुळे परिसर प्रथमच निस्तब्ध,श्रींच्या मंदिराला कुलूप

googlenewsNext
ठळक मुद्देगणपतीपुळे परिसर प्रथमच निस्तब्ध,श्रींच्या मंदिराला कुलूपसमुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट, व्यापाऱ्यांची दुकाने बंदच

गणपतीपुळे : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

दररोज हजारो भाविक भेट देत असलेले गणपतीपुळे देवस्थान मंगळवारपासून बंद झाल्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात काही प्रमाणात आलेल्या भाविकांना मंदिरात श्री गणेशाचे दर्शन न मिळाल्यामुळे घोर निराशा झाल्याचे चित्र दिसून आले.

कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गणपतीपुळे मंदिर जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सर्वच व्यावसायिकांनी प्रतिसाद दर्शवित आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. तसेच समुद्र चौपाटीवरील ही वॉटरस्पोर्ट, मोटार बाईक, शहाळी विक्रेते, फोटोग्राफर व इतर सर्वच व्यावसायिकांनीही बंदमध्ये सहभागी होऊन कोरोनाविषयी विशेष खबरदारी घेतली आहे.

त्याशिवाय गणपतीपुळे परिसरातील खासगी हॉटेल्स-लॉजिंग व्यावसायिकांना जयगड पोलीस स्थानक व गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाची सविस्तर माहिती घेऊनच खबरदारी घ्यावी, असे संबंधित व्यावसायिकांना सांगण्यात आले आहे.

मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गणपतीपुळे परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.

मोफत प्रसाद वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे मंदिर देवस्थान समितीकडून बंद ठेवण्यात आले असले तरी मंदिर परिसरातून दर्शन घेणाऱ्या भाविकांना मोफत लाडू प्रसादाचे वाटप देवस्थान समितीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दर्शनाची संधी बंद झाल्याने आलेल्या भाविकांना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच उभे राहून दर्शन घेतल्यानंतर बुंदी लाडूचा प्रसाद देण्यात येत आहे.

सूचना फलक

संस्थान श्री देव व गणपतीपुळे पंच कमिटीकडून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या निर्णयाला भाविक, पर्यटक व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे. यासाठी मंदिर परिसरात व मोरया चौकातील देवस्थानच्या स्वागत कमानीजवळ सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा हाहाकार लक्षात घेता आपण सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

 

Web Title: The Ganapatipule campus is shut for the first time, lock the temple of Sri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.