Video: उंच उसळणारी लाट, काय तिचा थाट; गुहागरमधील 'बामणघळ' ठरतं पर्यटकांचं मोठं आकर्षण

By पंढरीनाथ कुंभार | Published: June 22, 2020 04:38 PM2020-06-22T16:38:05+5:302020-06-22T17:14:51+5:30

समुद्राचे पाणी गेली कित्येक वर्षे भरतीच्या वेळी काळ्या खडकांवर आदळून तब्बल ३० ते ४० फुट लांब आणि १५ ते २० फूट उंच अशी मोठी घळ तयार झाली आहे.

Bamanghal in Guhagar is a major tourist attraction | Video: उंच उसळणारी लाट, काय तिचा थाट; गुहागरमधील 'बामणघळ' ठरतं पर्यटकांचं मोठं आकर्षण

Video: उंच उसळणारी लाट, काय तिचा थाट; गुहागरमधील 'बामणघळ' ठरतं पर्यटकांचं मोठं आकर्षण

googlenewsNext

- संकेत गोयथळे

गुहागर : समुद्र आणि त्याच्या उंच उसळणाऱ्या लाटा हे साऱ्याच लोकांचे आकर्षण. कोकण किनारपट्टीवर कोठेही अशा उसळत्या लाटा लक्ष वेधून घेतात. पण गुहागरच्या बामणघळचं वैशिष्ट्य सर्वांहून वेगळं. दोन मोठाल्या खडकांमधली जागा म्हणजे ग्रामीण भाषेत घळ. भरतीच्या वेळी त्यात घुसणाऱ्या समुद्राच्या पाण्याची उसळणारी लाट हे पर्यटकांना वेड लावणारं दृश्य. 

गुहागर तालुक्यातील हेदवी येथील दशभूज गणेश सर्वश्रुत आहे. दहा हात असलेल्या गणपतीचं हे मंदिर जेवढे आगळे आणि प्रसिद्ध तेवढाच निसर्गाने देखणा समुद्र किनारा दिला आहे. समुद्राचे पाणी गेली कित्येक वर्षे भरतीच्या वेळी काळ्या खडकांवर आदळून तब्बल ३० ते ४० फुट लांब आणि १५ ते २० फूट उंच अशी मोठी घळ तयार झाली आहे. याला ‘बामणघळ’ या नावाने प्रसिद्धी मिळाली आहे.

हेदवीमध्ये आलेला प्रत्येक पर्यटक भाविक ही बामणघळ पाहिल्याशिवाय राहत नाही. २००८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनी या बामणघळची वाढती प्रसिद्धी पाहून तिथं प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या मोठ्या काळ्या खडपातून जाणारी अवघड वाट लक्षात घेऊन येथे पाखाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण जागेअभावी हे काम मागे पडले.

वर्षानुवर्षे काळ्या दगडात (खडकात किंवा खडपात) भरतीच्या वेळी पाणी विशिष्ट ठिकाणी आदळून भली मोठी घळ निर्माण झाली आहे. या घळीमध्ये जोरदार थडकणारे पाणी थांबून त्यानंतर तब्बल २५ ते ३० फूट वर उंच उसळी घेते. हा नजारा पाहण्यासारखा असतो.

निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. गुहागरपासून हेदवी फक्त २४ किलोमीटर अंतरावर आहे. तर गणपतीपुळेपासून जयगड फेरीबोटमार्गे ५० किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटनाची आवड असली तर हे ठिकाण आपल्या यादीत आत्ताच नोंदवून ठेवा.

Web Title: Bamanghal in Guhagar is a major tourist attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.