हातखंबा येथे ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, वेंगुर्ल्याचे दाेघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 07:17 PM2022-01-17T19:17:17+5:302022-01-17T19:17:43+5:30

रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते.

9 live village bombs seized at Hatkhamba | हातखंबा येथे ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, वेंगुर्ल्याचे दाेघे ताब्यात

हातखंबा येथे ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, वेंगुर्ल्याचे दाेघे ताब्यात

googlenewsNext

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथून रत्नागिरी तालुक्यात गावठी बाॅम्ब विक्रीसाठी आलेल्या दोघांना जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गाेवा महामार्गावरील हातखंबा येथे केली.

याप्रकरणी पोलीस हेडकाॅन्स्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (वय २२), श्रीकृष्ण केशव हळदणकर (वय २६, रा. गावडेश्वर मंदिर) या दाेघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

वेंगुर्ले येथून दोन तरुण गावठी बाॅम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ६ वाजल्यापासून पोलिसांनी हातखंबा येथे सापळा लावला होता. सायंकाळी पालीहून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी (एमएच ०७, एपी-२७००) भरधाव वेगाने येत होती. ही दुचाकी पाेलिसांनी थांबविली. मात्र, रामा पालयेकर व श्रीकृष्ण हळदणकर हे दाेघे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यात नऊ जिवंत गावठी बाॅम्ब आढळले.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बाॅम्बशोधक नाशक पथकाला बाेलावून जिवंत बाॅम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा केला. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विक्रीचा डाव उधळला

वेंगुर्ला येथून जिवंत गावठी बाॅम्ब घेऊन आलेले तरुण रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. बाॅम्बची विक्री हाेण्याआधीच पोलिसांच्या पथकाने त्यांचा डाव उधळून लावला.

टोळीच्या मुळापर्यंत जाणार का?

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गावठी बाॅम्ब जिल्ह्याबाहेरून पुरविले जात असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस या टोळीच्या मुळापर्यंत जाणार का? रत्नागिरी तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार रोखणार का? हेच पाहायचे आहे.

Web Title: 9 live village bombs seized at Hatkhamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.