संसारात भांडणे टाळायची आहेत? मग जोडीदाराची रास तपासून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 12, 2021 12:22 PM2021-01-12T12:22:39+5:302021-01-12T12:23:46+5:30

आपल्या राशीला अनुकूल राशीचा जोडीदार निवडून सप्तपदी घेतली, तर भविष्यातील वादावाद टाळता येतील.

Want to avoid quarrels in the relationship? Then check your partner's zodiac sign! | संसारात भांडणे टाळायची आहेत? मग जोडीदाराची रास तपासून घ्या!

संसारात भांडणे टाळायची आहेत? मग जोडीदाराची रास तपासून घ्या!

Next

संसार म्हटला की भांडण होतच राहणार. परंतु, सतत भांडत राहणे म्हणजे संसार नाही ना? 'कधी तिने मनोरम रुसणे, रुसण्यात उगीच ते हसणे' इथवर लटका राग असेल, तर 'ऋणानुबंधांच्या गाठी' जन्मभर टिकतील. परंतु, दोघांनी भांडणात तलवारी उपसल्या, तर नात्याचा खून झालाच म्हणून समजा. यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला विवाहपूर्व सूचना देते. त्यानुसार आपल्या राशीला अनुकूल राशीचा जोडीदार निवडून सप्तपदी घेतली, तर भविष्यातील वादावाद टाळता येतील. चला तर जाणून घेऊया, आपल्या राशीला कोणत्या राशीचा जोडीदार चालणार नाही ते!

कर्क आणि सिंह रास :
ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास गृहकलहाला खतपाणी मिळेल. या राशींच्या व्यक्ती लग्नामुळे एकत्र आल्या, तरी त्यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे त्यांचे नाते परस्परांशी बांधले जाणार नाही. कर्क राशीचे लोक नात्याबद्दल सजग असले, तरी सिंह राशीचा वरचढ स्वभाव नात्यात अहंभाव निर्माण करतो. त्यामुळे प्रेमाला थारा मिळत नाही.

कुंभ आणि मकर रास : 
कुंभ आणि मकर राशीचे लग्न जुळल्यास वरवर पाहता जोडी उत्तम असेल, दिसेल. परंतु दोघांचे आपापल्या क्षेत्रातील, स्वभावातील, कामातील मतभेद यांचा परिणाम नात्यातील मतभेद वाढवण्यास हातभार लावतो आणि दरदिवशी भांडणाला कारण मिळते. मकर राशीचे लोक अतिसंवेदशील, तर कुंभ राशीचे लोक अति तटस्थ असतात. दोन्ही राशींनी स्वभावाची दोन टोवंâ गाठल्यामुळे नातेही दुभंगू लागते.

मिथुन आणि कन्या रास :
मिथुन राशीचे लोक भावुक असतात, तर कन्या राशीचे तटस्थ आणि संशयी वृत्तीचे असतात. मिथुन राशीच्या लोकांना प्रेमाच्या मोबदल्यात कन्या राशीकडून रुक्ष अनुभव मिळाल्याने ते सतत नाराज राहतात. याउलट कन्या राशीचे लोक मिथुन राशीचा जोडीदार असल्यास त्याचा विचार न करता त्याला सोडून आपल्या आयुष्यात पुढे निघून जातात.

वृषभ आणि तुळ रास :
वास्तविक पाहता वृषभ आणि तुळ राशीचे लोक नाते, प्रेम, कौटुंबिक संबंध याबाबत नेहमी जागरुक असतात. याच कारणामुळे त्यांचे परस्पराबद्दल प्रेम आणि ओढ त्यांचे नाते मजबूत ठेवते. परंतु, काही काळानंतर दोन्ही राशींमध्ये या गुणाचा अभाव निर्माण होऊन दोन्ही राशी दुरावतात आणि नात्यांमध्ये दरी निर्माण होत, विलग होतात.

मीन आणि वृश्चिक रास : 
ज्योतिषशास्त्रानुसार मीन आणि वृश्चिकची जोडी आदर्श मानली जाते. परंतु, राशीचे गुण आडवे येतात आणि नात्यात कटुता निर्माण करतात. मीन राशीचे लोक अति संवेदनशील आणि प्रेमळ असतात, याउलट वृश्चिक राशीचे लोक प्रेमळ असूनही प्रेम व्यक्त करण्यात हलगर्जीपणा करतात. तसेच त्यांच्या संशयी स्वभावामुळे मीन राशीचे लोक दुखावले जातात आणि याच कारणामुळे या दोन राशींमध्ये प्रेमाच्या जागी विसंवादाची  किंवा अबोल्याची पोकळी निर्माण होते व त्याचे पर्यवसान नाते तुटते.

कर्क आणि धनु रास :
कर्क आणि धनु राशीचे एकत्र येणे तसे दुर्मिळच! कारण, या राशींचे गुण परस्परविरुद्ध आहेत. धनु राशीचे लोक काटेकोर आणि वेळेला महत्त्व देणारे असतात, तर कर्क राशीच्या लोकांना वेळेचा, परिस्थितीचा काही परिणाम होत नाही. ते आपल्याच तंद्रित असतात. या कारणामुळे धनु राशीला कर्क राशीशी जुळवून घेणे अशक्य ठरते. परिणामी, या दोन्ही राशी एकत्र येत नाहीत.

Web Title: Want to avoid quarrels in the relationship? Then check your partner's zodiac sign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.